'...तर तुमच्या पक्षाचे अस्तित्वच राहिले नसते' ; अमित शहा यांची मुख्यमंत्र्यांवर टीका

amit shah criticised on cm uddhav thackeray in sindhudurg
amit shah criticised on cm uddhav thackeray in sindhudurg

ओरोस (सिंधुदुर्ग) : महाराष्ट्रात तीनचाकी सरकार आहे. तिन्ही चाकांची तोंडे पूर्व, पश्‍चिम, उत्तर अशा वेगवेगळ्या दिशांकडे आहेत. तर दक्षिण दिशेतून अन्य कोणीतरी या सरकारला खेचत आहे. या सत्तेवर बसलेले बाळासाहेब यांची तत्त्वे धुळीस मिळवून सहभागी झाले आहेत. आम्ही त्यांच्या मार्गाने जाणार नाही. देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना आम्ही या मार्गाने गेलो असतो तर तुमच्या पक्षाचे अस्तित्व राहिले नसते, अशी टीका केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर केली. आमचा मार्ग राष्ट्रभक्ती, राष्ट्रकल्याण व अंत्योदयाचा आहे. त्याच मार्गाने आम्ही चालणार असल्याचेही यावेळी त्यांनी सांगितले. 

पडवे येथे माजी मुख्यमंत्री तथा भाजपचे नेते, खासदार नारायण राणे यांच्या एसएसपीएम लाईफटाईम मेडिकल कॉलेजच्या उद्‌घाटनप्रसंगी शहा बोलत होते. यावेळी मेडिकल कॉलेज संस्थापक खासदार राणे, विधानसभा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, गोव्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत, विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर, भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, राष्ट्रीय सरचिटणीस आमदार विनोद तावडे, आमदार रवींद्र चव्हाण, आमदार प्रसाद लाड, आमदार कालिदास कोळंबकर, आमदार नितेश राणे, नीलेश राणे, जिल्हा शिक्षण प्रसारक मंडळ अध्यक्षा नीलम राणे, जिल्हाध्यक्ष राजन तेली, कॉलेज डीन डॉ. हेरेकर, कृपाशंकर सिंह, आमदार निरंजन डावखरे, डॉ. मिलिंद कुलकर्णी, प्रमोद जठार आदी उपस्थित होते. 

शहा म्हणाले, 'महाराष्ट्रातील जनतेने युतीला जनाधार दिला होता; मात्र या पवित्र जनाधाराचा अनादर करीत सत्तेच्या लालसेने युती तोडली. भाजपने वचन पाळले नाही. बंद खोलीत मी शब्द दिल्याचे ते सांगतात; पण एवढे खोटे मला बोलता येत नाही. बिहारमध्ये भाजपच्या जागा जास्त आलेल्या असताना आम्ही शब्द दिल्याप्रमाणे नितीशकुमार मुख्यमंत्री बनले. जर मी शिवसेनेचा मुख्यमंत्री बनेल असा शब्द दिला होता, तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत राज्यभर झालेल्या प्रचार सभेवेळी आम्ही युतीची सत्ता आल्यावर फडणवीस मुख्यमंत्री होतील, असे जाहीर बोलत होतो, त्यावेळी का रोखले नाही?
 

सहकारात राजकारण आणू नका 

सहकारी संस्था या शेतकऱ्यांच्या हितासाठी बनविल्या आहेत. त्यात राज्य सरकारने राजकारण आणू नये. सिंधुदुर्गात नैसर्गिक आपत्ती आली. त्यावेळी इकडे न फिरकणारे मुख्यमंत्री भाजप कार्यकर्त्यांच्या साखर कारखान्यावर कारवाई करीत आहेत; परंतु यामुळे भाजपचे कार्यकर्ते घाबरणार नाहीत. ते अजून काम करतील, असेही शहा यांनी सांगितले. 

जनतेच्या सहकार्यामुळे कोरोना नियंत्रण 

यावेळी शहा यांनी, देशातील आरोग्य व्यवस्थेत झालेल्या बदलावर भाष्य केले. ते म्हणाले, 'कॉंग्रेसच्या काळात देशाचे आरोग्य बजेट 27 हजार 100 कोटींचे होते. आम्ही ते 94 हजार 494 कोटीवर नेले आहे. शिक्षण क्षेत्राचे बजेट वाढविताना त्यात पारदर्शकता आणली आहे. तुम्ही योग्यवेळी वैद्यकीय शिक्षण क्षेत्रात प्रवेश केला आहात. कोरोनामुळे वैद्यकीय क्षेत्रातील मर्यादा उघड झाल्या आहेत. आमच्या देशाच्या तुलनेत बलाढ्य समजले जाणारे देश कोरोना काळात मागे राहिले. आपला देश रिकव्हरीत पुढे असून मृत्यूची संख्या कमी आहे. हे यश केंद्र, राज्य सरकारबरोबर डॉक्‍टर व आरोग्य कर्मचारी तसेच जनतेच्या सहकार्यामुळे मिळाले आहे.'

राणेंवर अन्याय होणार नाही : शहा 

शहा म्हणाले, 'नारायण राणे आमच्या पक्षात आल्यावर अनेक प्रश्‍न उपस्थित केले गेले. मीडियानेही प्रश्‍न उपस्थित केला. मी त्यांना सांगतो, नारायण राणे संघर्ष करणारे नेते आहेत. ते अन्याय सहन करीत नाहीत. अन्यायावर मात करीत भविष्य घडवणारे ते आहेत. त्यामुळे आम्ही त्यांच्यावर अन्याय करणार नाही. त्यांचा सन्मान कसा करायचा हे भाजपला माहीत आहे.'

संपादन - स्नेहल कदम  

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com