मळगावात स्फोटके जप्त

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 11 फेब्रुवारी 2017

संबंधित चालकाने स्फोटके वाहतूक करण्यासाठी आवश्‍यक असलेला पास तसेच अधिकृत परवानगी घेतली नव्हती. त्यामुळे निवडणुकांच्या पार्श्‍वभूमीवर ही कारवाई केली

सावंतवाडी - जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकांच्या पार्श्‍वभूमीवर येथील पोलिसांनी तब्बल 70 हजाराची स्फोटके जप्त केली. यात सुमारे सव्वाचार लाखाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. ही कारवाई आज सकाळी साडेसातच्या सुमारास मळगाव येथे झाराप-पत्रादेवी महामार्गावर करण्यात आली.

मुस्ताक पिरमुहम्मद झाकीर (रा. कागल, कोल्हापूर) असे ताब्यात घेण्यात आलेल्या व्यक्तीचे नाव आहे. कोल्हापूर येथून सावंतवाडीच्या दिशेने स्फोटके वाहतूक होत असल्याची माहिती अज्ञाताने येथील पोलिसांना दिली होती. यानुसार येथील पोलिस ठाण्याचे निरीक्षक शंकर पाटील, त्यांचे सहकारी सहायक पोलिस निरीक्षक जयदीप कळेकर, हवालदार प्रमोद काळसेकर, अमर नारनवर आदींनी त्या ठिकाणी सापळा रचला. मिळालेल्या टीपनुसार समोरून येणारा टेम्पो त्यांनी तपासला असता गाडीत सुमारे 70 हजार रुपयाची स्फोटके आढळून आली. त्यामुळे संबंधित गाडी जप्त करून या प्रकरणी झाकीर याला ताब्यात घेण्यात आले.

याबाबत माहिती पोलीस निरीक्षक पाटील यांनी दिली. ते म्हणाले, ""टेम्पो ताब्यात घेतला. संबंधित चालकाने स्फोटके वाहतूक करण्यासाठी आवश्‍यक असलेला पास तसेच अधिकृत परवानगी घेतली नव्हती. त्यामुळे निवडणुकांच्या पार्श्‍वभूमीवर ही कारवाई केली. ती स्फोटके तालुक्‍यातील एका क्रशरवर नेण्यात येत होती. यात साठ हजार रुपये किमतीच्या स्फोटकासह 15 हजाराचे इलेक्‍ट्रिक डिटोनेटर्ससह साडेतीन लाख रुपयाची दारू असा सव्वाचार लाखाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.''
या प्रकरणी अटक केलेल्या झाकीर याची न्यायालयाने जामिनावर मुक्तता केली.

"ती' स्फोटके खासगी जागेत हलविली
या कारवाईत जप्त करण्यात आलेली स्फोटके ठेवण्यासाठी पोलिसांकडे सुरक्षित जागा नाही. त्यामुळे आकेरी येथिल एका खासगी व्यक्तीच्या गोडावूनमध्ये ती स्फोटके ठेवण्यात येणार आहेत. तशी न्यायालयाकडून आवश्‍यक ती परवानगी घेण्यात आली आहे, असे पोलिसांकडून सांगण्यात आले.

Web Title: ammunition seized