अनामिका नदी कोरडी, शेतकऱ्यांच्या "या' मागण्या

anamika rivers water problem konkan sindhudurg
anamika rivers water problem konkan sindhudurg

कुडाळ (सिंधुदुर्ग) - वेतोरे येथील अनामिका नदी पूर्णतः आटली आहे. भाजीपाला व इतर लागवड हेच येथील शेतकऱ्यांच्या उपजीविकेचे साधन आहे. नदीचे पात्र कोरडे पडल्याने शेतकरी आर्थिक संकटात सापडले आहेत. त्यामुळे कायमस्वरूपी बंधारे व नदीतील गाळ काढण्यात यावा, अशी मागणी ग्रामस्थांमधून होत आहे. 

बहुतांशी एप्रिल-मेमध्ये जिल्ह्यात प्रत्येकाला पाणीटंचाईला सामोरे जावे लागते. शहरी भागाबरोबरच ग्रामीण भागातही पाण्याची तीव्र टंचाई जाणवते. कोकण परिसरात पावसाचे प्रमाण अधिक असले तरी तीव्र उतारामुळे डोंगराच्या भागात सध्या पाण्याची टंचाई जाणवत आहे. वेंगुर्ले तालुक्‍यातील वेतोरे येथील अनामिका नदी पूर्णतः आटल्याने तेथील शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे. या समस्येवर मात करण्यासाठी ठिक-ठिकाणी कायमस्वरूपी बंधारे व नदीतील गाळ काढावा, अशी मागणी वेतोरेवासीयांमधून होत आहे.

गेली कित्येक वर्षे मेहनत करणारे शेतकरी गावातील प्रत्येक वाडीत आहेत. गुरवटेंबवाडी, मिरमेवाडी, सबनीसवाडी, देऊळवाडी, दापटीवाडी, कोंडस्करवाडी, पालकरवाडी या वाड्यांतील शेतकरी अनामिका नदीच्या काठावर दोन्ही बाजूच्या शेतजमिनीत शेती करतात. नदीच्या दुतर्फा विहिरीही आहेत. हे शेतकरी विविध प्रकारची पिके घेतात. वांगी, भुईमूग, भाजीपाला, वाली आदी पिकांचे मोठ्या प्रमाणात उत्पादन घेण्यात वेतोरेतील शेतकरी प्रसिद्ध आहेत. वाल आणि मिरचीच्या शेतात भोपळ्यांचेही दुय्यम पीक घेतले जाते.

लागवड केलेल्या सर्व शेतजमिनीमध्ये इंजिनद्वारे पाणीपुरवठा करण्यात येतो. मिरची पिकासाठी तर दर चार दिवसांनी पाणी द्यावे लागते. वालीसाठी आठवड्याने तर कुळीथ पिकासाठी दर पंधरावड्याने पाणी द्यावे लागते. मिरची आणि वाल या पिकांना थेट पाणीपुरवठा केला जातो. नदी आता गाळाने भरली आहे. त्यामुळे पावसाळा संपताच नदीत पाणी राहत नाहीत ते वेगाने खाली समुद्राला जाऊन मिळते. अनामिका नदीवरील वनराई बंधारे कुचकामी ठरले असून कायमस्वरूपी बंधारे ठिकठिकाणी बांधल्यास आणि नदीतील गाळ काढण्याचे काम पूर्ण झाल्यास कायमस्वरूपी नंदनवन होऊ शकते. 

कोडींमध्ये गाळ 
वेतोरे परिसरात सुमारे 20 वर्षांपूर्वी अनामिका नदीच्या सर्व कोंडींना मे अखेरपर्यंत पाणी असायचे; परंतु अलीकडच्या काही वर्षात शेती पंपामध्ये बेसुमार वाढ झाल्याने मोठ्या प्रमाणावर होणाऱ्या पाण्याच्या उपशामुळे पाणी लवकर आटत आहे. मडवळ कोंड, सोमेश्‍वर मंदिरनजीकचा पूर्वीचा साना, पेकट्या आंब्याचा साना, भटाचा साना, म्हातार कोंड, भीमाची कोंड, शिरवण्याची कोंड यांसह इतर सर्व कोंडीमध्ये मोठ्या प्रमाणात गाळ साचून राहिल्याने पाण्याचे अपेक्षित प्रमाण राहत नाही. 

तत्काळ प्रयत्न व्हावेत! 
सर्व कोंडींचे सर्वेक्षण होऊन गाळ उपसण्याची मागणी वेतोरेवासीयांमधून होत आहे. ठिक-ठिकाणच्या कोंडींमध्ये भरलेला गाळ उपसल्यास मुबलक साठा येथे उपलब्ध होईल. पाणी टंचाई व बागायतींसह पिकांचे मोठ्या प्रमाणात होणारे नुकसान टाळता येईल. कपडे धुण्यासाठी आणि जनावरांना पिण्यासाठीही मुबलक पाणी मिळू शकेल. यासाठी वरिष्ठ पातळीवरून तत्काळ प्रयत्न व्हायला हवेत, अशी मागणी ग्रामस्थांमधून होत आहे. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com