अनंत लाखण हा भाजपचा बहुजन चेहरा

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 5 जानेवारी 2017

मंडणगड - केंद्र-राज्याच्या सत्तेत असलेल्या भाजपला मंडणगड तालुक्‍यात पाय रोवण्यास अद्यापपर्यंत अपयश आले आहे; मात्र भाजपने इतर पक्षातील नेत्यांना आपली दारे सताड उघडी ठेवल्यानंतर ही स्थिती बदलण्याची शक्‍यता आहे. तालुक्‍यात शिवसेना रुजवणारे माजी सभापती अनंत लाखण यांनी आपल्या कार्यकर्त्यांसह भाजपमध्ये जाहीर प्रवेश केला आहे. लाखण यांच्याहाती कमळ देऊन भाजपने तालुक्‍यात ओबीसी कार्ड खेळले आहे; मात्र यानंतर तरी तालुक्‍यात कमळ फुलेल का, अशी शंका व्यक्‍त होत आहे.

तालुक्‍यात १९९० च्या कालखंडात अनंत लाखण यांनी शिवसेनेचा धनुष्यबाण हाती घेतला. त्यानंतर त्यांनी मागे वळून पाहिलेच नाही. शिवसेना तळागाळात पोचवण्याचे काम त्यांनी केले. पंचायत समिती सभापतिपदही भूषवले. दरम्यानच्या कालखंडात त्यांना डावलण्यात आल्याचे लक्षात आल्यावर त्यांनी सवतासुभा मांडला आणि नारायण राणे यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेसचा हात धरला; परंतु काँग्रेसच्या विचारधारेशी त्यांचे काही जमले नाही. 

त्यामुळे हाताला बाजूला सारत त्यांनी २००९ च्या विधानसभा निवडणुकीत अपक्ष उमेदवाराला हात दिला. परंतु तेथेही जम बसवता आला नाही. त्यानंतर राजकीय विजनवासात जाण्यापेक्षा त्यांनी पुन्हा एकदा धनुष्यबाण हाती घेतले. या वेळी अनंत गीते यांचा वरदहस्त त्यांच्यावर होता; परंतु शिवसेनेतही गट-तट निर्माण झाल्याने त्यांचे तत्कालीन आमदार सूर्यकांत दळवी यांच्यासोबतही फारसे जमले नाही. मात्र लाखण यांनी आता भाजपमध्ये प्रवेश केला आहे; परंतु ही वाट कमळ फुलाची नव्हे तर काट्याची आहे, अशा प्रतिक्रिया राजकीय वर्तुळात उमटू लागल्या आहेत. भाजप प्रवेश केल्यावर लाखण यांनी पक्ष तळागाळापर्यंत पोचवू, असे अभिवचन दिले आहे. मंडणगड तालुक्‍याला विकासाच्या वाटेवर अग्रेसर करावयाचे झाल्यास भाजप हाच सर्वोत्तम पर्याय आहे, असे सांगत त्यांनी आपल्या शेकडो कार्यकर्त्यांसह पक्षप्रवेश केला. गेल्या अनेक वर्षांपासून समाजातील विशिष्ट वर्गापुरता मर्यादित असलेला पक्ष ही भाजपची प्रतिमा आहे. लाखण यांच्या पक्षप्रवेशामुळे ती बदलू शकेल. 

गुडघे कोणासमोर कोण टेकणार?

गेल्या तीन वर्षांपासून बहुजन समाजातील नेतृत्व पुढे येत असून कुणबी, तेली, माळी, कोळी, वाणी, बौद्ध व मराठा असे बहुजन समाज तालुक्‍यात भारतीय जनता पक्षात समाविष्ट झाल्याने पक्ष लोकाभिमुख झाला आहे. तालुक्‍यातील ग्रामीण भागातील तळागाळात परिवर्तनाची लाट पोचवून जुन्या सहकारी मित्रांना गुडघे टेकण्यास भाग पाडणार, असे म्हणत नाव न घेता लाखण यांनी सेनेला सुनावले. असे असले तरी तालुक्‍यात शिवसेनेची पाळेमुळे घट्ट रुजली आहेत. त्यामुळे शिवसेना लाखणांपुढे हतबल होणार, की लाखण यांना सेनेपुढे गुडघे टेकावे लागणार, याचे उत्तर नजीकच्या काळात मिळेल.

Web Title: anant lakhan bjp candidate