ग्रामीण भागातील अवैध दारू विक्री कोणी रोखेल काय?

Is any body can stop illegal sale of alcohol?
Is any body can stop illegal sale of alcohol?

सावंतवाडी - जिल्ह्यातील अवैध धंद्याना थारा देणार नसल्याचे नवनियुक्त पोलिस अधीक्षक दिक्षितकुमार गेडाम यांनी सांगितले असले तरी पाडलोस, न्हावेली, मडुरा, दांडेली, साटेली, मळगाव परिसरात छुप्या पध्दतीने अवैध दारु विक्री चालु आहे. धाड घालुनही जाग्यावर काहीच मिळत नसलेल्या या अवैध दारु धंद्याबाबत अधीक्षक गेडाम काय भुमिका घेतात याकडे लक्ष लागले आहे. दरम्यानजिल्ह्यातील अवैद्य धंद्यांवर आळा बसविणे त्यांच्यासमोर आव्हानच ठरणार आहे.

रत्नागिरी सिंधुदुर्गचे खासदार विनायक राऊत यांच्याकडे महिलांनी उध्वस्त होत असलेले संसाराचा विचार करुन अवैध दारुधंद्यावर आळा घालण्याची मागणी केली होती. तर जिल्हा दौऱ्यावर असताना गाव भेट कार्यक्रमात काही ग्रामस्थांनी चार दिवस पोलिसांचे अधिकार द्या आम्ही सर्व अवैध धंदे बंद करतो अशी मागणी केली होती. यावेळी खासदार राऊत यांनी आपण या प्रकरणात स्वतः लक्ष घालुन पोलिस विभागास सुचना देतो असे तोंडी सांगितले होते; परंतु अद्याप कोणत्याही प्रकारची कार्यवाही झाली नाही.

अवैध दारु विक्रीचे रॅकेट स्ट्रॉंग असल्याचे दिसून येते. या दारु धंद्यावर धाड घालुनही त्याजागी मात्र काहीच सापडत नाही यावरुन अवैध दारु विक्रेते पोलिसांना चकवा देण्यात यशस्वी ठरत आहेत. हरीयाणातील एका नागरीकांने दाखल केलेल्या जनहित याचिकेची दखल घेत 500 मीटर अंतरावरील बार व रेस्टॉरंटवर बंदी घालण्यात आली; परंतु दारु बंदीचा कोणताही ठोस परिणाम जिल्ह्यातील दारु धंद्यावर झाल्याचे दिसून येत नाही. परिणामी उलट जिल्ह्यातील दारु धंदा वाढला आहे. यात इन्सुली, सातार्डा, तेरेखोल या गोवा सीमेवरील चेकपोस्ट सतर्क होणे आवश्‍यक असताना बारबंदीनंतर दारुची छुप्या पद्धतीने होणारी वाहतुकीला आळा घालण्यास पोलिस प्रशासन कमी पडल्याचे बोलले जाते. बारबंदीनंतरही ग्रामीण भागात गोवा बनावटीची दारु येतेच कशी असा प्रश्‍न सर्वसामान्य नागरीकांना पडला आहे. सिंधुदुर्गात दारुच्या आहारी जावून अनेक मारामारी तर काही खुनाच्या घटनाही घटना घडल्या आहेत.

नुकतेच बदली करण्यात आलेले पोलिस अधीक्षक अमोघ गावकर यांनी धडक कारवाई करत अनेक अवैध धंद्यावर आळा बसविला होता. त्यांच्या बदलीनंतर जिल्ह्यात पुन्हा अवैध दारु, मटका व जुगाराची पाळे रुजू लागली. ही पाळेमुळे खणुन काढण्यात गेडाम कोणत्या नव्या युक्‍त्या वापरतात. याकडे जिल्ह्यातील नागरिकांचे लक्ष लागून राहिले आहे. नुकत्याच झालेल्या पत्रकार परिषदेत त्यानी जिल्ह्यातील मटका जुगार व अवैध दारु धंद्याचा शोध घेवून कारवाई करणार असल्याचे सांगितले आहे त्यामुळे नवनिर्वाचित सिंधुदुर्गात झालेल्या या पोलिस अधीक्षकाकडून अवैध धंद्यावर कायमचा आळा बसविण्यासाठी मोठा विश्‍वास निर्माण झाला आहे.

ग्रामभेतून मागणी; मात्र पोलिसांकडून दुर्लक्ष
जिल्ह्यात बऱ्याच ग्रामसभेत दारु धंद्यावर बंदी करण्याचे ठराव संमत करण्यात आले. तशी प्रतही तालुका पोलिस ठाण्याला देण्यात येतात; मात्र कोणत्याच प्रकारची ठोस कारवाई झाली नाही. ऐरवी जोमाने होत असलेल्या अवैध दारु विक्रीवर धाड टाकूनही पोलिसांना काहीच सापडत नसल्यामुळे ग्रामस्थांमधून आश्‍चर्य व्यक्त होत आहे.

जिल्ह्यातील विशेषत: गोवा सीमावर्ती भागातील काही गावात दारु धंदे जोमाने चालु आहेत. कारवाई झाली तरी पुन्हा या धंदा सुरू होतो. अशा काही धंद्याना खाकी वर्दीचे अभय असल्याचे ग्रामस्थांकडून बोलण्यात येते. दारु धंद्यावर धाड पडायची असल्याचे त्याची माहिती आधीच अवैध धंदे करणाऱ्यांना कशी मिळते. याविषयी आश्‍चर्य व्यक्त होत आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com