रत्नागिरीत कोरोना चाचणी प्रयोगशाळा मंजूर 

Approved Corona Testing Laboratory At Ratnagiri
Approved Corona Testing Laboratory At Ratnagiri

रत्नागिरी - कोरोना चाचणी प्रयोगशाळा जिल्हा शासकीय रुग्णालयात उभारण्यात येणार आहे. दोन दिवसांपूर्वीच शिवसेनेचे उच्च व तंत्रशिक्षणंत्री उदय सामंत यांनी पत्रकार परिषदेत ही घोषणा केली होती. आज पालकमंत्री ऍड. अनिल परब यांनी ट्‌वीट केले की, जिल्ह्याला कोरोना चाचणी प्रयोगशाळा मंजूर झाली असून, ती वालावलकर रुग्णालयात होणार आहे. यामुळे लॅबबाबत संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले असतानाच जिल्हा प्रशासनाने स्पष्टीकरण देत जिल्हा रुग्णालयातच लॅब मंजूर झाल्याचे सांगून संभ्रम संपवला. 

जिल्ह्यात मोठ्या संख्येने मुंबई, पुणेकर आदी ठिकाणच्या चाकरमान्यांचा मोठ्या प्रमाणात भरणा होत आहे. सुमारे 70 हजारांवर गेल्या आठ ते दहा दिवसांमध्ये चाकरमानी जिल्ह्यात दाखल झाले आहेत. रेड झोनमधून आल्याने अनेकांना क्वारंटाईन करून ठेवण्यात येत आहे. अनेकांचे स्वॅब घेतले जात आहेत, मात्र मिरज येथील प्रयोग शाळेने जिल्ह्याचे स्वॅब घेण्यास नकार दिला होता. त्यामुळे नमुन्यांचे तत्काळ अहवाल मिळणे अशक्‍यप्राय झाले. त्या लॅबवरील वाढता ताण लक्षात घेऊन जिल्ह्यासाठी स्वतंत्र लॅब असावी, या मागणीने जोर धरला. त्यानुसार खासदार, आमदारांनी लॅबबाबत मागणी केली.

वालावलकर रुग्णालयात लॅब प्रस्तावित होती, परंतु ते खासगी रुग्णालय असल्याने कोरोनानंतर त्याचा उपयोग सर्वसामान्य रुग्णांना होणार नाही. सर्वसामान्यांना त्याचा भविष्यातही फायदा व्हावा, हा दृष्टिकोन समोर ठेवून जिल्हा शासकीय रुग्णालयातच लॅब उभारण्याचा निर्णय घेतला. त्यासाठी 1 कोटी 7 लाख रुपये मंजूर आहे. येत्या आठ ते पंधरा दिवसांत लॅब उभा केली जाईल, असे दोन दिवसांपूर्वीच उदय सामंत यांनी पत्रकार परिषदेत स्पष्ट केले. 

जिल्ह्याचे पालकमंत्री ऍड. अनिल परब यांनी याबाबत ट्‌वीट केले की, कोरोना चाचणी प्रयोगशाळा रत्नागिरी जिल्ह्यासाठी मंजूर झाली आहे. ती वालावलकर रुग्णालयात होणार आहे. प्रयोगशाळेबाबत दोन्ही मंत्र्यांच्या परस्पर विधानामुळे संभ्रम निर्माण झाला होता, मात्र जिल्हा प्रशासनाने आणि ऍड. परब यांनी तो लगेच दूर केला. नमुने मिरज येथे पाठविण्यात येत असल्याने अहवाल येण्यास विलंब होत होता. ही दिरंगाई टाळण्यासाठी एक स्वतंत्र चाचणी केंद्र रत्नागिरीत व्हावे, अशी मागणी होती. त्याला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मंजुरी दिल्याबद्दल त्यांचा मनापासून आभारी आहे, असे परब यानी म्हटले. 

जिल्हाधिकाऱ्यांनी मानले आभार 

रत्नागिरीसह सिंधुदुर्ग आणि रायगड या जिल्ह्यांतील कोविड-19 रुग्णांचे स्वॅब तपासणीसाठी खूप अडचणी येत होत्या. हजारो रुग्णांचे स्वॅब हे मिरज आणि कोल्हापूर येथे पाठविले जात होते, परंतु मिरज आणि कोल्हापूर येथे मर्यादित क्षमता असल्याने रत्नागिरी, सिंधुदुर्ग आणि रायगड येथील रुग्णांचे स्वॅब आठ-आठ दिवस प्रलंबित असायचे. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी या प्रश्‍नाची दखल घेत ही लॅब मंजूर करण्याचे आदेश मुख्य सचिव अजोय मेहता यांना दिले. येत्या पंधरा दिवसांत लॅब कार्यान्वित होईल, अशी खात्री आहे. ही लॅब मंजूर करण्यासाठी पाठपुरावा करणारे सर्व लोकप्रतिनिधी आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे जिल्हाधिकारी लक्ष्मीनारायण मिश्रा यांनी आभार मानले. 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com