कोकणात दोन खासदारांमध्ये जोरदार राडा, विनायक राऊत- नारायण राणेंच्या खडाजंगीनंतर कार्यकर्तेही भिडले 

सकाळ वृत्तसेवा
Thursday, 28 January 2021

दोन्ही नेत्यांमधील वाद टोकाला गेल्यानंतर सभाग्रहातील वातावरण तणावाचे बन

सिंधुदुर्ग : भाजप खासदार नारायण राणे आणि शिवसेना खासदार विनायक राऊत यांच्यातील वाद संपूर्ण महाराष्ट्राला परिचित आहेच. दोघेही एकमेकांवर टीका करण्याची एकही संधी सोडत नाहीत. त्यात नारायण राणे यांनी शिवसेना सोडल्यापासून ते सेनेवरही सतत टीका करत असतात. आजही हे दोघे समोरासमोर आले आणि वादाची ठिणगी पडली. दोघेही एकेनासे झाल्याने पालकमंत्री उदय सामंत यांनी मध्यस्ती करत विकापाला गेलेला वाद मिटविण्याचा प्रयत्न केला.   

सिंधुदुर्गमध्ये आज जिल्हा नियोजन बैठकीच्या निमित्ताने हे दोन नेते एकत्र आले होते. बैठकीत तिलारी धरणाचा डावा कालवा फुटल्याच्या मुद्द्यावरुन भाजप सदस्य राजन म्हापसेकर यांनी आपली भूमिका मांडली. परंतु, म्हापसेकर यांच्या भूमिकेवर शिवसेनेचे सदस्य बाबुराव धुरी यांनी आक्षेप नोंदवला. याज आक्षेपावरून राणे आणि राऊत  यांच्यामध्ये टोकाचा शाब्दिक वाद झाला. राणे-राऊत यांच्यामध्ये शाब्दिक वाद सुरू असतानाच दोन्ही नेत्यांच्या समर्थकांनीही सभागृहात राडा घातला. तिलारी धरणाचा डावा कालवा फुटल्याच्या विषयावरून राऊत-राणे या नेत्यांमध्ये वाद झाल्याचे सांगण्यात येत आहे. हा वाद टोकाला गेल्यानंतर पालकमंत्री उदय सामंत यांना मध्यस्थी करावी लागली. 

मंत्र्यांची मध्यस्ती
दोन्ही नेत्यांमधील वाद टोकाला गेल्यानंतर सभाग्रहातील वातावरण तणावाचे बनले. त्यावेळी पालकमंत्री उदय सामंत यांना मध्यस्थी केली. सामंत यांना तिलारी धरणाच्या फुटलेल्या कालव्याबद्दल संबंधित विभागाची बैठक घेऊन प्रश्न निकाली काढण्याचे आश्वासन दिले. सामंत यांनी आश्वासन दिल्यानंतर राऊत आणि राणे समर्थक शांत झाले.

दरम्यान, दोन्ही नेत्यांमधील शाब्दिक बाचाबाचीची आज दिवसभर जिल्ह्यात ठिकठिकाणी जोरोत सुरू होती.  

                       
संपादन - धनाजी सुर्वे 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: argument between narayan rane vinayak raut kokan political news