सामाजिक न्यायासाठी कटिबद्ध : अखिल भारतीय अधिवक्‍ता परिषद

article on All India Advocates Council
article on All India Advocates Council

२६ जून १८७४ रोजी राजर्षी शाहू छत्रपतींचा जन्म झाला. १८९४ ते १९२२ या काळात त्यांनी उत्तम लोकाभिमुख प्रशासनाचा वस्तुपाठ घालून दिला. वंचित घटकातील विद्यार्थी प्रशिक्षण, निवासाची सोय, शिष्यवृत्ती, वंचितांना रोजगार प्रदानासाठी शाहू मिल स्थापना, राजाराम कॉलेज स्थापना, सर्व समाजासाठी वैदिक ज्ञानाचे भांडार खुले केले. अस्पृश्‍यता निवारण, देवदासी निर्मूलन व महिला विकासासाठी सुधारणा, शेतीविषयक सुधारणा, जलसिंचन व संवर्धन योजना, नवीन न्यायिक सुधारणा केल्या. छत्रपती शाहू महाराजांशी सन १९१७ ते १९२१ या काळात आलेल्या संपर्कामुळे भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर या सुधारणांच्या जाणिवेने प्रभावित झाले. राज्यघटनेत वंचितांना विशेष अधिकार देण्याच्या तरतुदी याच सामाजिक चळवळीचा परिपाक आहेत.

अखिल भारतीय अधिवक्‍ता परिषद ही १९९२ सालापासून न्याय व्यवस्थेमध्ये भारतीय जीवनमूल्यांच्या आधारे योग्य व समाजोपयोगी बदल घडवून आणण्यासाठी वकिलांची संघटना आहे. भारतीय जनतेच्या गरजा लक्षात घेऊन न्यायव्यवस्थेत सुटसुटीतपणा आणण्यासाठी संघटना प्रयत्न करते. यंदाचे वर्ष हे अ. भा. अधिवक्‍ता परिषदेचे संस्थापक, ज्येष्ठ अधिवक्‍ता, रा. स्व. संघाचे तपस्वी प्रचारक, भारतीय मजदूर संघ संस्थापक माजी खासदार मा. दत्तोपंत ठेंगडी यांचे जन्मशताब्दी वर्ष आहे. त्यांचे जीवनकार्य हे खरं ‘सामाजिक न्याय’ या विषयासाठी झगडणाऱ्या, अनेक क्षेत्रांमध्ये शोषित व पीडित घटकांसाठी संघटना उभारून लढा देणाऱ्या एका कुशल संघटकाचे आदर्श उदाहरण आहे. गेल्या २८ वर्षांत संपूर्ण भारतभर या संघटनेचा विस्तार झाला. संघटनेने न्यायव्यवस्थेत प्रादेशिक भाषांचा वापर, पक्षकारांना जलद न्याय, न्याय व्यवस्थेतील अनिष्ट व कालबाह्य गोष्टींमध्ये बदल आणि ती सामान्याला परवडणारी बनवणे, यासाठी अनेक उपक्रम राबवले. प्रसंगी न्यायालयीन लढा देऊन प्रबोधनाचे कार्य 
केले आहे.

रत्नागिरीत जिल्हा शाखा सुरू
रत्नागिरीत अ. भा. अधिवक्‍ता परिषदेची जिल्हा कार्यकारिणी स्थापन होऊन २५ फेब्रुवारी २०२० रोजी तीन वर्षे पूर्ण झाली. या काळात जिल्हाभर अनेक उपक्रम राबविले. प्रत्येक तालुक्‍यात अधिवक्‍ता परिषदेचे वकील कार्यकर्ते सामाजिक प्रबोधन, वकील बंधूंसह न्यायव्यवस्थेच्या उत्थानाचे कार्य करतात. अनेक वकील संघटनेतर्फे समाजहित जपण्यासाठी आणि वंचित वर्गाला न्याय मिळण्यासाठी प्रयत्नशील आहेत. स्वातंत्र्यपूर्व काळातील लोकमान्य टिळक, स्वा. सावरकर, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांसारख्या कायदेतज्ञांप्रमाणे आजही वकिलांनी समाज उत्थानासाठी जीवन समर्पित करावे, असे आवाहन परिषदेने केले आहे.

प्रमुख सामाजिक उपक्रम
जागतिक महिला दिनानिमित्त वरवडे येथे १५० बचत गट सदस्य व मच्छीमार महिलांना कायदेविषयक मार्गदर्शन, बुरंबी (ता. संगमेश्‍वर) येथे १५० ग्रामस्थांना सरकारी योजनांच्या माहितीसह कायदेविषयक मार्गदर्शन, सायबर लॉ, नवीन कायदेविषयक मार्गदर्शन, मराठी भाषा संवर्धन दिन व सर्व न्यायालयात मराठी भाषा वापर होण्यासाठी विविध कार्यक्रम. गोगटे कॉलेज येथे ३०० विद्यार्थिनींना स्वसंरक्षण प्रशिक्षण, स्वसंरक्षण अधिकार मार्गदर्शन दिले. प्रेमाच्या जाळ्यात अडकून फसलेल्या युवतींना समुपदेशन व मदत, संविधान दिनानिमित्त दि यश फाउंडेशन कॉलेज ऑफ नर्सिंग येथे मार्गदर्शन, विधी महाविद्यालयात विद्यार्थी मार्गदर्शन. कोकण प्रांत अधिवक्‍ता परिषद अधिवेशनात उच्च न्यायालयातील न्यायमूर्तींद्वारे पूर्णवेळ प्रशिक्षणात जिल्ह्यातील १८ वकिलांचा सहभाग. लखनौ येथे संघटनेच्या राष्ट्रीय अधिवेशनात जिल्ह्यातील वकिलांनी सहभाग घेतला. संघटना सामान्य माणसाला स्वस्तात, परिपूर्ण न्याय मिळावा, यासाठी वकिलांना सक्रिय करत आहे. प्रत्येक तालुक्‍यात असे उपक्रम व्हावेत, असा प्रयत्न आहे. न्यायव्यवस्थेचे केंद्र सर्वसामान्य जनता व्हावी, याचा वसा सर्व वकिलांनी घेतला तर हे कार्य आनंददायी होईल.

मागण्यांचा पाठपुरावा
जिल्ह्यात कायमस्वरूपी सहकार न्यायालय, कौटुंबिक न्यायालय, औद्योगिक न्यायालय, महाराष्ट्र महसूल न्यायाधीकरण, मुंबई व महसूल आयुक्‍त कोकण विभाग यांचे महिन्यातून एकदा महसूल वाद निवारणासाठी रत्नागिरीत शिबिर, सर्व न्यायिक आस्थापना एकाच इमारतीत याव्यात, महसुली खटले निकाली करण्यासाठी स्वतंत्र न्यायिक अधिकारी नेमावेत, ग्राहक न्यायालयाचे प्रत्येक तालुक्‍यात शिबिर व्हावे, कोल्हापूर खंडपीठ लवकरात लवकर व्हावे, देशातील रिक्‍त न्यायिक अधिकारी पदे त्वरित भरावीत, महिला आयोगाचे रत्नागिरीत शिबिर व्हावे, या मागण्यांसाठी उच्च न्यायालयाकडे पाठपुरावा सुरू आहे.

कोविड व लॉकडाउन

अलीकडे संघटनेने कोविड योद्ध्यांचा सन्मान केला. कोविड दक्षतेसाठी न्यायालयात कर्मचारी, पक्षकार व वकिलांना हॅंडवॉश वाटप केले. दत्तोपंत ठेंगडी लेक्‍चर सिरीज, वालावलकर लेक्‍चर सिरीजद्वारे लॉकडाउन काळात जिल्ह्यातील २५० वकिलांचे ४० विविध विषयांवरील ऑनलाईन प्रशिक्षण झाले.


 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com