आशा कर्मचाऱ्यांनी ओरोसमध्ये रोखला महामार्ग

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 7 ऑगस्ट 2018

सिंधुदुर्गनगरी - आमच्या मागण्या मान्य करा नाहीतर खुर्च्या खाली करा, राज्य सरकार हाय-हाय अशा घोषणा देत आशा गट प्रवर्तक कर्मचाऱ्यांनी आज ओरोस फाटा येथे मुंबई - गोवा महामार्ग रोखून धरत जेलभरो आंदोलन केले.

सिंधुदुर्गनगरी - आमच्या मागण्या मान्य करा नाहीतर खुर्च्या खाली करा, राज्य सरकार हाय-हाय अशा घोषणा देत आशा गट प्रवर्तक कर्मचाऱ्यांनी आज ओरोस फाटा येथे मुंबई - गोवा महामार्ग रोखून धरत जेलभरो आंदोलन केले. पोलिस प्रशासनाच्यावतीने आंदोलक आशा कर्मचाऱ्यांना ताब्यात घेत प्रतिबंधात्मक कारवाई केली.

आशा व गट प्रवर्तक कर्मचाऱ्यांच्या विविध प्रलंबीत मागण्यांकडे लक्ष वेधण्यासाठी सिंधुदुर्ग जिल्हा आशा वर्कर्स युनियनच्यावतीने जेलभरो आंदोलनाचा इशारा दिला होता. त्यानुसार संघटनेचे नेते कॉ. सुभाष निकम व विजयाराणी पाटील यांच्या नेतृत्वाखाली आज ओरोस फाटा येथे मुंबई-गोवा महामार्ग रोखला. पाचशेहून अधिक आशा कर्मचारी महामार्गावर ठाण मांडून बसल्याने वाहतूक ठप्प झाली.

यावेळी पोलिस प्रशासनाच्यावतीने रास्ता रोको करणाऱ्या आशा कर्मचाऱ्यांना ताब्यात घेत त्यांच्यावर प्रतिबंधात्मक कारवाई केली. जिल्ह्यातील आशा व गटप्रवर्तक कर्मचाऱ्यांनी मोठ्या संख्येने सहभागी होत आजचे जेलभरो आंदोलन यशस्वी केले.

या आहेत प्रमुख मागण्या

  • राष्ट्रीय आरोग्य अभियान कायम करा
  • आशा कर्मचाऱ्यांना आरोग्य सेवक म्हणून सेवेत कायम करा
  • सार्वजनिक आरोग्याच्या पायाभूत सोईसुविधामध्ये सुधारणा करा
  • गटप्रवर्तक व आशांना दरमहा 18000 रूपये वेतनासह पेन्शन सुरू करा.
  • प्रत्येक प्राथमिक आरोग्य केंद्रात आशांसाठी स्वतंत्र विश्रांती कक्ष निर्माण करा

पोलिस प्रशासनासाठी ठरली रंगीत तालीम
जिल्ह्यात 9 आॅगस्ट रोजी होणाऱ्या मराठा समाजाच्या जेलभरो आंदोलनापूर्वी आज झालेले आशा व गटप्रवर्तक कर्मचाऱ्यांचे जेलभरो आंदोलन पोलिस प्रशासनासाठी रंगीत तालीम ठरली. पाचशेहून अधिक कर्मचाऱ्यांना रास्ता रोकोपासून रोखताना पोलिस कर्मचाऱ्यांची धावपळ झाली. पोलिस प्रशासनाची वाहने कमी पडली. यावरून 9 आॅगस्टच्या आंदोलनासाठी पोलिसांना आणखी तयारी करावी लागणार हे स्पष्ट झाले. 

Web Title: Asha workers agitation in Oros