आश्रमशाळेत अंमलबजावणीचा अंधार   

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 31 मार्च 2017

अलिबाग - तालुक्‍यातील कोळघर सरकारी आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. जीर्ण इमारती, तुटलेल्या खिडक्‍या, बंद फडलेले सौरबंब, शौचालये-स्नानगृहांची कमतरता अशा एक ना अनेक अडचणींचा सामना करीत आदिवासी विद्यार्थी येथे शिक्षण घेत आहेत. 

अलिबाग - तालुक्‍यातील कोळघर सरकारी आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. जीर्ण इमारती, तुटलेल्या खिडक्‍या, बंद फडलेले सौरबंब, शौचालये-स्नानगृहांची कमतरता अशा एक ना अनेक अडचणींचा सामना करीत आदिवासी विद्यार्थी येथे शिक्षण घेत आहेत. 

समाजातील दुर्बल, आदिवासी घटकांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी सरकार विविध उपाययोजना आखते; परंतु त्याची योग्य अंमलबजावणी होत नाही, याचे मूर्तिमंत उदाहरण म्हणून कोळघर येथील आदिवासी आश्रमशाळेकडे पाहता येईल. विद्यार्थ्यांना अत्याधुनिक तर सोडाच, पण मूलभूत सुविधाही सरकारने धडपणे पुरविल्या नसल्याचे दिसून येते.  १९७२ मध्ये सुरू झालेल्या या आश्रमशाळेत अलिबाग, पेण, रोहा परिसरांतील ४७५ आदिवासी मुले-मुली शिक्षण घेत आहेत. त्यापैकी ४४८ जण येथेच राहतात. या शाळेत पहिली ते दहावीपर्यंत शिक्षण दिले जाते; पण ही मुले ज्या वातावरणात शिकत आहेत, ते पाहिल्यावर याला विकास म्हणायचा का, असा प्रश्‍न निर्माण होतो. ज्या खोलीत राहायचं त्याच खोलीत शिकायचं, तेथेच कपडे वाळत घालायचे, तेथेच जेवायचे, तेथेच अभ्यास करायचा आणि तेथेच झोपायचे... इमारत कधी कोसळेल याचा नेम नाही, अशा अवस्थेत ते दिवस कंठत आहेत. 

स्नानगृह, शौचालयांची कमतरता 
कोळघर आश्रमशाळेच्या ४७५ विद्यार्थ्यांपैकी २८१ मुले व १६७ मुली येथेच राहतात. मुलींसाठी १२ स्नानगृहे व १० शौचालये आहेत; मात्र शाळेला ४५ वर्षे उलटूनही मुलांसाठी एकही स्नानगृह व शौचालय नाही. त्यामुळे मुलांना परिसरातील नदीचा आसरा घ्यावा लागतो. 

सौरबंब बंद 
विद्यार्थ्यांना स्नानासाठी गरम पाणी मिळत नाही. आदिवासी विकास विभागाने लाखो रुपये खर्चून दोन वर्षांपूर्वी शाळेकरिता चार सौरबंब पुरवले, मात्र ते नादुरुस्त असल्याचे दिसून येते. मुलांसाठी स्नानगृह नसल्याने ते नदीच्या पाण्यात स्नान करतात. सौरबंब बंद असल्याने मुलींनाही थंड पाण्यानेच स्नान करावे लागते. 
 

इमारती जीर्ण 
कोळघर येथे पूर्वी शेतीशाळा होती. या शाळेच्या इमारतीतच १९७२ मध्ये सरकारी आश्रमशाळा सुरू करण्यात आली. इमारतींना जवळपास ५० वर्षांहून अधिक काळ झाला असून, इमारती जीर्ण झाल्या आहेत. काही इमारतींचा पाया खचला आहे, तर काहींचे छत पडण्यास आले आहे. दरवाजे-खिडक्‍यांची दूरवस्था झाली आहे. शाळेच्या प्रशासनाने सार्वजनिक बांधकाम विभागाकडे इमारतींच्या डागडुजीची मागणी करूनही दुर्लक्ष होत आहे. 

कोळघर आश्रमशाळेतील इमारतींची डागडुजी, तसेच मुलांसाठी शौचालये व स्नानगृह बांधण्यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागासोबत संपर्क साधला आहे. नवीन इमारतीचे बांधकामही प्रगतिपथावर आहे. लवकरच येथील विद्यार्थ्यांना अत्याधुनिक सोयी-सुविधा मिळतील. नवीन इमारतीचे काम त्वरित पूर्ण करावे, यासाठी आमचा बांधकाम विभागाकडे सातत्याने पाठपुरावा सुरू आहे.
- एम. आर. फसाळे, मुख्याध्यापक. 

Web Title: Ashram School of implementation of darkness