विधानसभेसाठी चिपळुणातून बाळ माने निश्‍चित

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 28 जुलै 2018

राजापूर पालिकेची निवडणूक झाल्यानंतर मानेंचा मोर्चा चिपळूणकडे वळला आहे. नुकतीच त्यांनी येथील कार्यकर्त्यांची बैठक घेतली. या बैठकीत कार्यकर्त्यांना विधानसभा निवडणुकीच्या तयारीला लागण्याची सूचना करण्यात आली. बैठकीत ठरल्यानुसार बुथ कमिट्या सक्षम करण्यावर भाजपचा भर असणार आहे. पक्षाच्या कामाचा आढावा घेणे तसेच कार्यकर्त्यांच्या समस्या सोडविण्यासाठी माने यापुढे दर गुरुवारी चिपळूणला थांबणार आहेत. 

चिपळूण : भाजपचे जिल्हाध्यक्ष बाळ माने यांची चिपळूण विधानसभा मतदार संघातून उमेदवारी निश्‍चित झाली आहे. बाळ मानेंसह येथील कार्यकर्त्यांना वरिष्ठ नेत्यांकडून निवडणुकीच्या कामाला लागण्याची सूचना झाली आहे. त्यामुळे आगामी निवडणुकीत शिवसेना, राष्ट्रवादीसह भाजप असे तीन मजबूत पर्याय मतदारांसमोर असणार आहेत. 

चिपळूण विधानसभा मतदार संघातून शिवसेनेकडून विद्यमान आमदार सदानंद चव्हाण, राष्ट्रवादी काँग्रेसकडून माजी जिल्हाध्यक्ष शेखर निकम यांची उमेदवारी निश्‍चित झाली आहे. सेना - भाजपची युती न झाल्यास भाजपचा उमेदवार कोण असेल याची सर्वांना उत्सुकता होती. देवरुख, संगमेश्‍वरमधील काही लोकसेवक भाजपच्या तिकीटावर निवडणूक लढविण्यासाठी इच्छुक आहेत. मात्र, जिल्हाध्यक्ष बाळ मानेंची दोन वर्षांपासून चिपळूण मतदारसंघात पेरणी सुरू आहे.

चिपळूण पालिका व देवरूख नगरपंचायतीमध्ये भाजपचा नगराध्यक्ष निवडून आल्यापासून मानेंचा आत्मविश्‍वास वाढला आहे. कारण दोन्ही शहरांमध्ये भाजपचा नगराध्यक्ष निवडून आणण्यासाठी त्यांनी महत्त्वाची भूमिका घेतली होती. 
पक्षाध्यक्ष अमित शाह यांच्या मुंबई दौर्‍यानंतर भाजपने राज्यात स्वबळाची तयारी सुरू केली आहे. या पार्श्‍वभूमीवर बाळ माने यांना चिपळूण मतदारसंघाकडे लक्ष देण्याची सूचना करण्यात आली.

राजापूर पालिकेची निवडणूक झाल्यानंतर मानेंचा मोर्चा चिपळूणकडे वळला आहे. नुकतीच त्यांनी येथील कार्यकर्त्यांची बैठक घेतली. या बैठकीत कार्यकर्त्यांना विधानसभा निवडणुकीच्या तयारीला लागण्याची सूचना करण्यात आली. बैठकीत ठरल्यानुसार बुथ कमिट्या सक्षम करण्यावर भाजपचा भर असणार आहे. पक्षाच्या कामाचा आढावा घेणे तसेच कार्यकर्त्यांच्या समस्या सोडविण्यासाठी माने यापुढे दर गुरुवारी चिपळूणला थांबणार आहेत. 

“कार्यकर्त्यांनी एकदिलाने काम केले म्हणून चिपळूण पालिका व देवरूख नगरपंचायतीमध्ये यश मिळाले. स्वबळावर लढण्याची वेळ आली तर जिल्ह्यात भाजपकडे उमेदवार तयार असले पाहिजे. केवळ लढण्यासाठी नाही तर जिंकण्यासाठी निवडणूक लढवली पाहिजे. असा पक्षाकडून सांगितले गेले आहे. त्यामुळे जिथे शक्यता आहे तेथे सक्षम उमेदवार पक्षाकडून दिला जाईल. कार्यकर्त्यांची मागणी व पक्षाचा निर्णय यावर चिपळुणातील माझी उमेदवारी अवलंबून आहे.” 

- बाळ माने, जिल्हाध्यक्ष, भाजप

Web Title: Assembly Election Bal Mane Name Confirm