वाजपेयींचा चिपळूण दौरा अजूनही स्मरणात

मुझफ्फर खान
शुक्रवार, 17 ऑगस्ट 2018

चिपळूण - देशाचे माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी १९७० मध्ये चिपळुणात आले होते. येथील युनायटेड इंग्लिश स्कूलच्या मैदानावर त्यांची ऐतिहासिक सभा झाली होती. ‘एकच पुढारी, अटलबिहारी, आले चिपळूणमध्ये‘ या गाण्याने त्यांचे जंगी स्वागत झाले होते. त्या काळातील आज हयात असलेल्या अनेकांच्या तोंडावर ते गीत आणि अटलबिहारी वाजपेयी यांच्या आठवणी कायम आहेत.

चिपळूण - देशाचे माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी १९७० मध्ये चिपळुणात आले होते. येथील युनायटेड इंग्लिश स्कूलच्या मैदानावर त्यांची ऐतिहासिक सभा झाली होती. ‘एकच पुढारी, अटलबिहारी, आले चिपळूणमध्ये‘ या गाण्याने त्यांचे जंगी स्वागत झाले होते. त्या काळातील आज हयात असलेल्या अनेकांच्या तोंडावर ते गीत आणि अटलबिहारी वाजपेयी यांच्या आठवणी कायम आहेत.

जनसंघाचे सुरेश साठे यांनी आठवणींना उजाळा दिला. ते म्हणाले, १९७१ मध्ये होणाऱ्या लोकसभा निवडणुकीची १९६९ मध्ये तयारी सुरू होती. त्या काळात संघाचे केवळ चारच सदस्य संसदेत होते. यातील उत्तमराव पाटील व प्रेमजीभाई आसर हे दोन सदस्य महाराष्ट्रातील होते. १९७१ च्या निवडणूक प्रचारासाठी अटलजींचा रत्नागिरी दौरा झाला. ते एसटीने आले होते.

त्यांची पहिली सभा रत्नागिरीला आणि दुसरी चिपळूणला झाली. चिपळुणात रात्री ९ वाजता झालेली सभा ऐतिहासिकच झाली. ती यशस्वी करण्यासाठी प्रेमजीभाई आसर, अप्पा जोग, तात्यासाहेब नातू, बाळासाहेब थत्ते, राजाभाऊ घाग आदींनी रात्रंदिवस मेहनत घेतली. वाजपेयी यांना मराठी समजायचे. ते वाचायचे पण बोलता येत नव्हते. त्यांच्या स्वागतासाठी विष्णू तांबडे, वसंत कानिटकर यांनी पार्टीचे स्वागत गीत तयार केले होते. 

रायगडचे प्रसिद्ध शाहीर मालुसरे यांनाही बोलविण्यात आले होते. त्यांच्या स्वागतासाठी पॉवरहाउसपासून सुहासिनी उभ्या होत्या. निवडणूक प्रचारासाठी चिपळूणवासीयांनी जमा केलेली ७ लाख ५० हजार रुपयांची थैली (निधी) त्यांच्याकडे सुपूर्द केली. खासदार प्रेमजीभाई आसर त्यांच्याबरोबर सावलीने असायचे. आपल्या भाषणात त्यांनी ‘प्रेमजीभाई दिल्लीला आले आणि माझे चांगले मित्र झाले’ या शब्दात आसर यांचे कौतुक केले होते. अप्पा जोग यांच्या घरी रात्रीचे जेवण आणि मुक्काम झाला. सकाळी त्यांनी कार्यकर्त्यांच्या भेटी घेतल्या.  

 अनेक मंडळी चिपळुणात...
वाजपेयी यांची रायगडमध्ये सभा होणार नव्हती.त्यामुळे रायगडसह कोकण आणि पश्‍चिम महाराष्ट्रातील अनेक मंडळी त्यांना भेटण्यासाठी चिपळुणात आली होती. माजी मुख्यमंत्री बॅ. अब्दुल रेहमान अंतुले यांची भेट झाल्यानंतर ते कराडला रवाना झाले. मात्र त्यांच्या दौऱ्याच्या आठवणी आजही चिपळुणातील नागरिकांच्या स्मरणात आहेत.

Web Title: Atal Bihari Vajpayee Memory