अटलजींच्या पदस्पर्शाने पावन झालेला साखरपा येथील वाडा

संदेश सप्रे
शुक्रवार, 17 ऑगस्ट 2018

देवरूख - कोल्हापूरची सभा घेऊन ते कोकणात आले. साखरप्यातील एका प्रसिद्ध चौसोपी वाड्यात त्यांनी पाहुणचार घेतला आणि रत्नागिरीत गेले. १९८३ - ८४ ची ही गोष्ट. आज अटलजी आपल्यातून गेल्यावर ही घटना साक्षात अनुभवणाऱ्या ज्येष्ठ पत्रकार दिनेश गुणे यांनी या आठवणींना उजाळा दिला.

देवरूख - कोल्हापूरची सभा घेऊन ते कोकणात आले. साखरप्यातील एका प्रसिद्ध चौसोपी वाड्यात त्यांनी पाहुणचार घेतला आणि रत्नागिरीत गेले. १९८३ - ८४ ची ही गोष्ट. आज अटलजी आपल्यातून गेल्यावर ही घटना साक्षात अनुभवणाऱ्या ज्येष्ठ पत्रकार दिनेश गुणे यांनी या आठवणींना उजाळा दिला.

अटलजींच्या पदस्पर्शाने पुनीत झालेला साखरपा येथील तो चौसोपी वाडा आज भलेही रंगरूपाने बदलला असेल. मात्र या वाड्यातील त्यांच्या आठवणी कायमस्वरूपी राहतील, हे नक्की.
दिनेश गुणेंनी जागवलेल्या आठवणीत, १९८३-८४ ला महाराष्ट्र दौऱ्यावर असणारे अटलजी कोल्हापुरातील रात्रीची सभा संपवून पहाटे रत्नागिरीकडे निघणार, असा निरोप मिळाला. सर्व तयारी झाली. अटलजींसोबत प्रकाश जावडेकर होते. साखरपा हे माझं आजोळ. सरदेशपांडे यांचा चौसोपी वाडा हे येथील प्रसिद्ध ठिकाण. याच आमच्या आजोळात अटलजींचे पाय लागावेत, अशी सर्वांची इच्छा. मोठा भाऊ रमेशने प्रकाशजींना निरोप पाठवला आणि अटलजींना थोडा वेळ आमच्याकडे थांबण्याची विनंती केली. ते नक्की झालं आणि सगळा साखरपा अटलजींच्या स्वागतासाठी सज्ज झाला. 

वाड्यावर तयारी झाली. साडेपाच वाजता माधव सरदेशपांडे, केशव सरदेशपांडे, तेव्हाचे सरपंच बाबीशेठ गांधी, समाजवादी नेते नाना शेट्ये अशी मोजकी माणसे स्वागताला तयार होती. काही वेळात गाड्यांचा लहानसा ताफा आला. जावडेकर लगबगीने खाली उतरले. त्यांनीच आणलेला हार-तुरा देत आम्ही अटलजींचे स्वागत केले. लगेच सारा लवाजमा वाड्यात आला. वाड्याचा दिमाख पाहून अटलजी भारावले आणि काही वेळातच त्यांनी सगळा वाडा फिरून पाहिला. नक्षीदार कलाकुसरीने नटलेल्या देवघरासमोर थांबत त्यांनी महालक्ष्मीला नमस्कार केला. ओटीवर येत उपस्थितांबरोबर गप्पा मारल्या. गप्पा होताना दुग्धपान झाले. परिसराची माहिती घेताना त्यांनी दाखवलेला साधेपणा आमच्या मनात घर करून गेला.

आठवण आजन्म राहील
 काही वेळांतच अटलजींचा ताफा रत्नागिरीकडे रवाना झाला आणि त्यांना निरोप देताना सर्वानाच गहिवरून आले. आज अटलजींना कायमचा निरोप देताना माझ्या मनात बसलेली ही आठवण आजन्म राहणार आहे.

Web Title: Atal Bihari Vajpayee Memory Sakharpa