एटीएममधून अजूनही केवळ दोनच हजार

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 3 जानेवारी 2017

चिपळूण - एक जानेवारीपासून एटीएममधून पैसे काढण्याची मर्यादा अडीज हजारावरून साडेचार हजार रुपयापर्यंत वाढवण्यात आल्याची घोषणा रिझर्व्ह बॅंकेने मावळत्या वर्षात केली. मात्र शहरातील बहुतांशी एटीएममधून साडेचारऐवजी केवळ दोन हजार रुपये मिळाल्याने खातेधारकांना निराश व्हावे लागले. सोमवारी एटीएममध्ये पैसे भरल्यानंतर मंगळवारपासून एटीएमची परिस्थिती सुरळीत होण्याची शक्‍यता वर्तवली जात आहे.

चिपळूण - एक जानेवारीपासून एटीएममधून पैसे काढण्याची मर्यादा अडीज हजारावरून साडेचार हजार रुपयापर्यंत वाढवण्यात आल्याची घोषणा रिझर्व्ह बॅंकेने मावळत्या वर्षात केली. मात्र शहरातील बहुतांशी एटीएममधून साडेचारऐवजी केवळ दोन हजार रुपये मिळाल्याने खातेधारकांना निराश व्हावे लागले. सोमवारी एटीएममध्ये पैसे भरल्यानंतर मंगळवारपासून एटीएमची परिस्थिती सुरळीत होण्याची शक्‍यता वर्तवली जात आहे.

चिपळुणातील अनेक बॅंकांचे एटीएम मशीन बंद आहेत. जी चालू आहेत तेथून केवळ २ हजार रुपयाच्या नोटा मिळत आहेत. शनिवारी महिना अखेर आणि रविवारी बॅंकांना सुटी होती. त्यामुळे एटीएममध्ये पुरेसे पैसे जमा झाले नाहीत. आजपासून बॅंका सुरू झाल्या. एटीएममध्ये पैसे भरणारी एजन्सी किंवा बॅंकेचे कर्मचारी यांनी ११ नंतर पैसे भरण्यास सुरवात केली. सायंकाळपर्यंत एटीएम मशीनमध्ये पुरेसे पैसे साठतील, त्यानंतर परिस्थिती हळूहळू सुधारेल, असा अंदाज आहे. नोटाबंदीच्या ५० दिवसांत एटीएममधून पैसे काढण्याची मर्यादा अडीच हजार होती. मात्र एटीएममध्ये पैशाचा ठणठणाटच आणि पाचशे रुपयांच्या नोटांच्या तुटवड्यामुळे खातेधारकांच्या हाती केवळ दोन हजार रुपयांची नोटच लागली. एटीएम मशीनच्या बाहेर ‘केवळ दोन हजार रुपयाच्या नोटा मिळतील’ असे सूचना फलक लावलेले होते. रिझर्व्ह बॅंकेने १ जानेवारीपासून एटीएममधून पैसे काढण्याची मर्यादा अडीच हजार रुपयांनी वाढवली तरीसुद्धा एटीएममधून पुन्हा केवळ दोनच हजार रुपये मिळाल्याने खातेधारकांच्या पदरी निराशा आली. काही एटीएममध्ये पाचशेच्या नोटा मिळाल्या.

बॅंकेतील रांगेत उभे न राहता व्यवहार करण्यासाठी कॅशलेस ही पद्धत अगदी सोपी आहे. ग्राहकांची माहिती घेऊन आम्ही ती स्कॅन करून बॅंकेच्या मुख्यालयात पाठवतो. तेथून प्रतिसाद मिळाल्यानंतर तत्काळ ग्राहकांची सेवा सुरू केली जाते. यासाठी जाणारा वेळ नक्कीच जास्त असला तरी ग्राहकांनी समजून घेतले पाहिजे.
- विनायक लेले, योगेश लेले- बॅंक ऑफ इंडिया कर्मचारी, चिपळूण

बॅंकेच्या नियमांमुळे ग्राहक चक्रावले
कॅशलेस व्यवहारासाठी बॅंकांकडून ग्राहकांना वेगवेगळे नियम सांगितले जात आहेत. त्यामुळे ग्राहकही चक्रावले आहेत. तुमच्या खात्यात अमुक सुविधा नाही, तमुक सुविधा असल्याचे सांगितले जाते. अनेक वर्ष नियमित व्यवहार करणारे ग्राहक कॅशलेस व्यवहारासाठी बॅंकांकडे गेल्यानंतर त्यांचे व्यवहार रोखले जात आहेत. त्यांना ऐनवेळी केवायसीसाठी ओळखपत्र, आधार कार्ड व फोटो मागवण्यात येत आहेत. त्यांच्याकडून फार्म भरून घेतल्यानंतरही खात्यावरील व्यवहार सुरळीत होत नाहीत.

Web Title: atm withdrawl currency