ऍट्रॉसिटी कायदा अनुसुचित जाती जमातींसाठी वरदान - नागरी हक्क संरक्षण पोलिस अधिक्षक सुरेश मेंगडे

अमित गवळे
रविवार, 29 एप्रिल 2018

दारुबंदीसाठी पुढाकार घेवून शंभर टक्के दारु बंदी करणार्‍या महिला रणरागीनींचा सत्कार करण्यात आला. ऍट्रॉसिटी कायदा अनुसुचीत जाती जमातींसाठी वरदान ठरला आहे. 

पाली (जि. रायगड) - रायगड पोलिस दल व वीर योध्दा आदिवासी कातकरी सामाजिक संस्थेच्या वतीने आदिवासी समाज बांधवांचा मेळावा नुकताच संपन्न झाला. परळीतील रुता गावंड इंग्लिश मिडीयम स्कुल येथे हे मेळावा झाला. नागरी हक्क संरक्षण पोलीस अधिक्षक सुरेश मेंगडे हे या मेळाव्याचे प्रमुख मार्गदर्शक होते.

या मेळाव्यात दारुबंदीसाठी पुढाकार घेवून शंभर टक्के दारु बंदी करणार्‍या महिला रणरागीनींचा सत्कार करण्यात आला. ऍट्रॉसिटी कायदा अनुसुचीत जाती जमातींसाठी वरदान ठरला आहे. समाजाच्या मुख्य प्रवाहापासून वर्षानुवर्ष दूर राहिलेल्या आदिवासी कातकरी समाज बांधवांना समाजाच्या मुख्य प्रवाहात आणून त्यांचा शैक्षणिक, सामाजिक व आर्थीकदृष्ट्या उत्कर्ष साधणे गरजेचे आहे. याकरीता आदिवासी बांधवांनी शिक्षणाचे महत्व जाणून घेवून उच्चशिक्षीत झाले पाहिजे. असे नागरी हक्क संरक्षण पोलिस अधिक्षक सुरेश मेंगडे (कोकण परिक्षेत्र) यांनी सांगितले. तसेच आदिवासी बांधवांच्या सर्वांगिण उन्नत्तीसह नागरी हक्क संरक्षणासाठी पोलिस प्रशासन कायम कटिबध्द असल्याची ग्वाही मेंगडे यांनी दिली. अन्याय अत्याचाराच्या घटना रोखण्यासाठी मानसिकतेत बदल होणे गरजेच असल्याचे मत सुरेश मेंगडे यांनी यावेळी व्यक्त केले. यावेळी सुरेश मेंगडे यांनी शैक्षणिक चळवळीबरोबरच ऍट्रॉसिटी कायद्यासह जादुटोना, अंधश्रध्दा, कर्मकांड, तसेच जमीन फसवणुकीसह अन्य गुन्हे व कायद्याच्या तरतुदींची सोप्या भाषेत मांडणी करुन आदिवासी समाजबांधवांचे प्रबोधन केले.

यावेळी पाली पोलिस निरिक्षक दशरथ पाटील म्हणाले की आदिवासी कातकरी समाजबांधवांनी व्यसनमुक्त होवून शिक्षणाची कास धरावी, तसेच स्थलांतर थांबवून स्थानिक उपलब्ध रोजगारावर उपजिवीका करावी. या करीता पाली पोलिसांनी आदिवासीवाड्यावस्तीत जावून लोकशिक्षणाची व प्रबोधनाची चळवळ गतीमान केली जात आहे. या उपक्रमाचा चांगला परिणाम दिसून येत असून आदिवासी बांधवांमध्ये परिवर्तन होत असल्याचे पाटील म्हणाले.

यावेळी आनंद पवार म्हणाले की आदिवासी बांधवांनी स्वयंरोजगार निर्मीतीच्या माध्यमातून प्रगती साधली पाहिजे. येथील स्थलांतर रोखण्यासाठी शेतीबरोबरच मच्छीमारी, पशुपालन, दुग्धव्यवसाय, कुकूटपालन,विटभट्टी आदी व्यवसाय करुन रोजगार निर्माण करावा.

या कार्यक्रमास पाली पोलिस निरक्षक दशरथ पाटील,सहाय्यक पोलीस निरिक्षक श्रीमती पवार (ना.ह.सं.पथक रायगड), वीर योध्दा आदिवासी कातकरी सामाजीक संस्थेचे अध्यक्ष रवी पवार, आदिवासी विकास परिषद नवी दिल्लीचे कोकण संघटक रमेश पवार, सुधागड तालुका अध्यक्ष दगडू वाघमारे, परळी सरपंच गुलाब वाघमारे, आनंद पवार, मानव अधिकार संघटनेच्या कार्याध्यक्षा जानवी मेस्त्री, सुभाष कांबळे, सहाय्यक फौजदार शाम पाटील, पो.कॉ. अमोल म्हात्रे, पो.ना.विनोद पाटील, पो.ह. प्रफुल चांदोरकर, आदि मान्यवरांसह आदिवासी बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक रवि पवार यांनी केले. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन प्रतिभा काळभोर यांनी केले. तर आभार प्रदर्शन रमेश पवार यांनी केले.

देशातील अनुसुचीत जाती व अनुसुचीत जमातींवर होणारे अत्याचार, शोषण व हिंसा थांबवून त्यांना सामाजिक न्याय व प्रतिष्ठा मिळवून देणेकरीता ऍट्रॉसिटी ऍक्ट 1989 अधिनियम कायदा लागू करण्यात आला आहे. ऍट्रॉसिटी कायदा अनुसुचीत जाती जमातींसाठी वरदान ठरलेला आहे. त्यामुळे या कायद्याचा योग्य वापर करुन जातीय सलोखा राखण्याच्या दृष्टीने प्रयत्न केला पाहिजे. - सुरेश मेंगडे, नागरी हक्क संरक्षण पोलिस अधिक्षक (कोकण परिक्षेत्र)

 

Web Title: The Atropicity Law is good for scheduled castes