होडावडे महिला सरपंचासह दोघांवर हल्ला 

होडावडे महिला सरपंचासह दोघांवर हल्ला 

सावंतवाडी - होडावडे (ता. वेंगुर्ले) सरपंच आदिती अरविंद नाईक यांच्यासह अन्य एकाला कारिवडे येथे रस्त्यात अडवून गज, चॉपर व कोयत्याने मारहाण केल्याची घटना काल (ता.21) सायंकाळी उशिरा घडली. यात सौ. नाईक यांच्यासह गणेश जयराम पवार जखमी झाले. याप्रकरणी सरपंच अदिती नाईक यांनी दिलेल्या तक्रारीवरुन त्यांचे पती अरविंद गोपाळ नाईक, मंगेश परब व अन्य अनोळखी अशा सहा जणांविरुद्ध जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी येथील पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला. 

फिर्यादी या होडावडे गावच्या सरपंच असून यातील संशयित त्यांचे पती अरविंद नाईक हे ग्रामपंचायतच्या दैनंदिन कामकाजात हस्तक्षेप करीत असल्यामुळे त्यांच्यामध्ये वारंवार वाद होत होते. दरम्यान, त्या गणेश पवार यांच्या गाडीतून कारिवडे येथे बहिणीकडे जात असताना पती अरविंद नाईक यांनी त्यांना फोन करून गाडी थांबविण्यास सांगितले व आपली गाडी त्यांच्यासमोर आडवी थांबवत गाडीतून उतरुन हातातील गज फिर्यादी यांच्या गाडीच्या समोरील बाजूच्या काचांवर मारला. त्यानंतर गणेश पवार यांना चालक सीटवरुन बाहेर ओढून काढत त्यांच्या तोंडावर मारहाण करुन पाठीवर व डाव्या पायाच्या मांडीवर गजाने बेदम मारहाण केली. यावेळी संशयित मंगेश परब यानेही फिर्यादी व साक्षीदारांना मारहाण केली. त्यानंतर दोरीने जीवे मारण्याच्या उद्देशाने गळा आवळण्याचा प्रयत्न केला. यावेळी साक्षीदार पवार यांना मारहाण होत असताना सोडविण्यासाठी गेलेल्या फिर्यादी सौ. अदिती नाईक यांनाही बेदम मारहाण केली. 

याप्रकरणी सरपंच सौ. अदिती नाईक यांनी सावंतवाडी पोलीस ठाण्यात तक्रार दिली असून संशयित पती अरविंद गोपाळ नाईक (रा. होडावडे- देऊळवाडी), मंगेश परब (रा.वजराट) व अन्य अनोळखी सहा जणांविरोधात जीवे मारण्याचा प्रयत्न, गर्दी मारहाण केल्याप्रकरणी गुन्हा दाखल झाला. जखमींना उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले. मारहाणीत फिर्यादीच्या मोटारीचे मोठे नुकसान झाले आहे. घटनास्थळी कारिवडे येथे उपविभागीय पोलीस अधिकारी शिवाजी मुळीक यांनी भेट दिली. सहाय्यक पोलीस निरीक्षक योगेश जाधव अधिक तपास करीत आहेत. रात्री उशिरापर्यंत परस्परविरोधी तक्रार देण्यात आली नव्हती.  

 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com