टोळीयुद्धातील ‘डॉन’ कोण हे दाखविण्यासाठी उबेदवर हल्ला?

टोळीयुद्धातील ‘डॉन’ कोण हे दाखविण्यासाठी उबेदवर हल्ला?

रत्नागिरी - उबेद होडेकरवरील हल्ला प्रकरणाने वेगळीच कलाटणी घेतली आहे. टोळी युद्धामध्ये ‘डॉन’ कोण या वर्चस्वाच्या लढाईतून हा हल्ला झाल्याचे समजते. पोलिसांकडूनही त्याला दुजोरा मिळाला आहे. मात्र पोलिसांनी संशयितांपैकी काही जणांवर एमपीडीए, मोक्का किंवा हद्दपारीची कारवाई करण्याच्या हालचाली सुरू केल्या आहेत. हल्ला प्रकरणी आणखी एक संशयित निष्पन झाला असून त्याला अटक केली आहे. 

होडेकर हल्ल्यातील आणखी एका संशयित शुभम रमेश सोळंकी (वय २४, रा. गवळीवाडा) याला अटक केली. त्याला न्यायालायने २६ तारखेपर्यंत पोलिस कोठडी सुनावली. या प्रकरणी बावा नाचणकर, मुन्ना देसाई, अल्ताफ संगमेश्वरी, विजय माने, अन्या वालम, हर्षल शिंदे, सिकंदर ऊर्फ काल्या खान, अभिजित दुड्ये यांना अटक केली आहे. 

आरोपींची संख्या अकरावर गेली आहे. उबेद होडेकर आणि संशयितांमध्ये अनेक वेळा खटके उडून हाणामाऱ्या झाल्या आहेत. मात्र खुनी हल्ल्यापर्यंत हा विषय गेला नव्हता. नेहमीच्या वादातून टोळीयुद्ध सुरू होते. 

गुन्हेगारी क्षेत्रातील दादा कोण? असा वर्चस्वाचा प्रश्‍न निर्माण होऊ लागला. याच दरम्यान १२ तारखेला उबेद होडेकर अल्ट्राटेक कंपनीच्या प्रवेशद्वारावर काही जणांबरोबर असताना अल्ताफ संगमेश्‍वरीला संपविण्याबाबत वक्तव्य केल्याचे संशयितांच्या जबाबामध्ये पुढे आले. 

याची खबर संगमेश्‍वरीला लागल्यानंतर टोळी युद्धातील ‘डॉन’ कोण हे सिद्ध करण्यासाठी हा खुनी हल्ला झाल्याचे समजते. 
अटक केलेल्या संशयितांमध्ये अनेकांवर वेगवेगळ्या प्रकारचे गुन्हे दाखल आहेत. त्यांची दहशत मोडीत काढण्यासाठी पोलिस ठोस पावले उचलत आहेत. झोपडपट्टी दादागिरी प्रतिबंद कायद्यानुसार (एमपीडीए) तसेच मोक्का कायदा लावण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. काहींवर हद्दपारीचे प्रस्ताव तयार करण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. शहरातील टोळीयुद्ध मोडीत काढण्याचा पोलिसांनी चंग बांधला आहे. 

संशयित सीसीटीव्हीत कैद
उबेद होडेकरवर हल्ला होण्यापूर्वी अल्ट्राटेक कंपनीसमोरील जागेतून हल्ल्याच्या तयारीने जाणारे संशयित सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाले आहेत. पोलिसांना हा एक मोठा पुरावा मिळाला आहे. त्यामुळे ही केस आणखी मजबूत झाली आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com