दोडामार्ग उपनगराध्यक्षांची गाडी फोडण्याचा प्रयत्न 

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 17 जुलै 2019

दोडामार्ग - कसई-दोडामार्ग नगरपंचायतीचे उपनगराध्यक्ष चेतन चव्हाण यांच्या मोटारीवर अज्ञाताने दगड मारून समोरील काच फोडण्याचा प्रयत्न केल्याने शहरात खळबळ उडाली आहे. ही घटना सोमवारी (ता. 15) मध्यरात्री घडली. याप्रकरणी श्री. चव्हाण यांनी येथील पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.

दोडामार्ग - कसई-दोडामार्ग नगरपंचायतीचे उपनगराध्यक्ष चेतन चव्हाण यांच्या मोटारीवर अज्ञाताने दगड मारून समोरील काच फोडण्याचा प्रयत्न केल्याने शहरात खळबळ उडाली आहे. ही घटना सोमवारी (ता. 15) मध्यरात्री घडली. याप्रकरणी श्री. चव्हाण यांनी येथील पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. हा प्रकार राजकीय वैमनस्यातून घडला की, चोरट्यांकडून चोरीच्या उद्देशाने झाला, याबाबत निश्‍चित माहिती मिळू शकली नाही. 

कसई-दोडामार्ग नगरपंचायतीचे उपनगराध्यक्ष चेतन चव्हाण हे वेंटो मोटार बस स्थानकासमोरील ओम साई कृपा अपार्टमेंटमधील संपर्क कार्यालयासमोर उभी करून ठेवतात. त्यांनी सोमवारी (ता.15) नेहमीप्रमाणे मोटार नेहमीच्या ठिकाणी उभी केली होती; मात्र रात्रीच्या वेळी कोणी अज्ञाताने या मोटारीच्या समोरील काचेवर दगड मारून ती फोडण्याचा प्रयत्न केला. आज सकाळी हा प्रकार उघडकीस आला.

तत्पूर्वी, रात्री बाराच्या दरम्यान मोठा आवाज आल्याने श्री. चव्हाण यांनी संपूर्ण घरात आणि खिडकीबाहेर पाहिले; पण त्यांना काही कळले नाही. सकाळी मोटारीच्या बाजूच्या चार दुचाकी त्यांना पडलेल्या दिसल्या. तसेच मोटारीच्या समोरील बाजूच्या काचेला तडे गेले होते.

त्याबाबत दोडामार्ग पोलिस ठाण्यात त्यांनी तक्रार दाखल केली आहे. आज सायंकाळी उशिरापर्यंत पोलिसांकडून याबाबत कोणतीच कारवाई केली नव्हती. त्यामुळे पोलिसांच्या कार्यपद्धतीबाबत श्री. चव्हाण यांनी नाराजी व्यक्त केली. 

बंद सीसीटीव्हीकडे पोलिसांचे दुर्लक्ष 
पोलिसांकडून माहिती घेतली असता दोन दिवस बस स्थानकासमोरील सीसीटीव्ही बंद असल्याने काहीच फुटेज मिळू शकले नाहीत. श्री. चव्हाण यांचे संकुल आणि खोली बस स्थानकासमोर आहे. सीसीटीव्ही सुरू असते, तर संशयित सापडू शकले असते. जिल्ह्यात चोरीच्या घटना घडत असताना मुख्य ठिकाणचे सीसीटीव्ही बंद असूनही पोलिसांनी दुर्लक्ष केल्याबद्दल तीव्र संताप व्यक्त होत आहे.  


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Attempt to demolish of Dodamarg Deputy Municipal Chief Car