दोडामार्ग तहसीलदारांची गाडी पेटवण्याचा प्रयत्न

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 10 ऑगस्ट 2018

दोडामार्ग - येथील तहसीलदारांची गाडी पेटवण्याचा अज्ञाताने प्रयत्न केला. हा प्रकार काल (ता. ८) मध्यरात्री घडला. गस्तीवर असलेल्या पोलिसांच्या लक्षात आल्याने आग त्वरित आटोक्यात आणण्यात आली.

दोडामार्ग - येथील तहसीलदारांची गाडी पेटवण्याचा अज्ञाताने प्रयत्न केला. हा प्रकार काल (ता. ८) मध्यरात्री घडला. गस्तीवर असलेल्या पोलिसांच्या लक्षात आल्याने आग त्वरित आटोक्यात आणण्यात आली.

तहसीलदार राजेंद्र बिर्जे यांची शासकीय जीप मुख्यालयातील व्हरांड्यात (पोर्च) लावलेली होती. तेथेच पोलिस जीपही लावलेली असते. दोन्ही कार्यालये एकाच इमारतीत आहेत. मराठा आंदोलनाच्या पार्श्‍वभूमीवर रात्रभर तालुक्‍यात पोलिस गस्त सुरू होती. मध्यरात्री एकच्या सुमारास एस. एन. देसाई आणि श्री. टेळेकर पोलिस गस्तीवरून परतले. त्यावेळी त्यांना तहसीलदारांच्या जीपच्या पुढच्या टायर जवळ आग पेटत असल्याचे दिसले.

रॉकेल किंवा पेट्रोलसारख्या ज्वालाग्रही द्रवात टाकून ठेवलेल्या गोणपाटाला आग लावून टायर पेटवण्याचा प्रयत्न करण्यात आला होता. पोलिसांनी वेळीच आग विझवल्याने जीपचे केवळ बॉनेट तेवढे जळाले. टायर मात्र पूर्णतः पेटला नसल्याने इंजीन आणि गाडी वाचली.

या संदर्भात तहसीलदार बिर्जे यांच्याशी संवाद साधला. त्यांनी पोलिसांकडून चौकशी सुरू आहे आणि गाडीचे फार मोठे नुकसान झाले नसल्याची माहिती दिली. सीसीटीव्ही फुटेजमधून संशयित शोधून काढण्यात येणार असला तरी आज संबंधित सीसीटीव्ही ऑपरेटर नसल्याने चौकशीस विलंब होण्याची शक्‍यता आहे.

Web Title: attempt of fire the Tahsildar motor in Dodamarg