वाहनांचा लेखाजोखा थेट पोर्टलवर 

तुषार सावंत
Thursday, 1 October 2020

इलेक्‍ट्रॉनिक माध्यमातून थेट दस्तऐवज प्रमाणित करण्यात येणार असून याचा वाहनचालकांना फायदा होणार आहे. 

कणकवली (सिंधुदुर्ग) - रस्ते वाहतुकीचे नियम कडक करत असताना वाहनांच्या कागदपत्रांचे डिजिटलायझेशन होत आहे. 1 ऑक्‍टोंबरपासून ड्रायव्हिंग लायसन आणि चलन यासारखा लेखाजोखा एका पोर्टलवर उपलब्ध होणार आहे. त्यामुळे इलेक्‍ट्रॉनिक माध्यमातून थेट दस्तऐवज प्रमाणित करण्यात येणार असून याचा वाहनचालकांना फायदा होणार आहे. 

केंद्रीय रस्ते वाहतूक तथा राज्यमार्ग मंत्रालयाने या संदर्भात नुकतीच अधिसूचना जारी केली होती. वाहतूक व्यवस्थेत माहिती तंत्रज्ञान तसेच इलेक्‍ट्रॉनिक माध्यमाचा वापर केल्याने वाहतुकीचे नियम तंतोतंत पालन करण्यास मदत होणार आहे. यातून वाहनचालकांना निष्कारण होणारा त्रास कमी केला जाणार आहे. परिवहन खात्यातील भ्रष्टाचारालाही आळा बसणार असून दलालीही कमी होणार आहे.

नव्या नियमानुसार वाहनासंबंधित कोणतेही कागदपत्र इलेक्‍ट्रॉनिक पद्धतीने पडताळणी करता येणार आहेत. नियम तोडल्यानंतर एखाद्या चालकाच्या वाहनासह कागदपत्राची जप्ती इलेक्‍ट्रॉनिक पद्धतीने केली जाईल, अशी माहिती त्या पोर्टलवर प्रदर्शित केली जाईल. मोटर वाहन कायद्याअंतर्गत ही नवी नियमावली 1 ऑक्‍टोबरपासून लागू होणार आहे.

अनावश्‍यक तपासणीला लागणारे कोणतेही कागदपत्र मागितल्यानंतर किंवा तपासणी केल्यानंतर तपासणीचा दिनांक, वेळ, शिक्का आणि गणवेशातील पोलिस अधिकाऱ्यांच्या ओळखीची नोंदणी पोर्टलवर ठेवली जाईल. त्याद्वारे अधिकृत अधिकारी तपशील जाहीर करतील. यामुळे वाहनांच्या अनावश्‍यक तपासणी किंवा तपासणीमुळे होणारा त्रास कमी होणार आहे. 

अशी असेल वेब नोंदणी 
केंद्रीय मोटार वाहन नियमात सुधारणा केल्याने वाहनाची संबंधित परवाना, नोंदणीची कागदपत्रे, फिटनेस प्रमाणपत्र आदी विषयी कागदपत्रे वेब पोर्टलवर नोंदविली जातील. याशिवाय कंपाऊंडींग, निलंबन व परवाना रद्द करणे ही नोंदणी ही सर्व कामे इलेक्‍ट्रॉनिक पोर्टलवर केली जातील. 

मोबाईलवर बोलाल तर... 
वाहन चालवताना मोबाईलवर बोलताना पकडल्यास एक ते पाच हजारापर्यंत दंड होऊ शकतो तसेच वाहन परवाना रद्द होऊ शकतो. याचीही माहिती आता पोर्टलवर रेकॉर्ड होणार आहे. मोबाईलचा वापर केवळ नेव्हिगेशनसाठीच असावा, अशाही सूचना करण्यात आली आहे. 

संपादन - राहुल पाटील


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Audit of vehicles directly on the portal