उपचाराला जात असताना दोघांना वाटेतच गाठले मृत्यूने

सकाळ वृत्तसेवा | Saturday, 28 November 2020

कुटुंबातील रिक्षाचालक आणि रिक्षातील तीन प्रवासी असे चौघे गंभीर जखमी आहेत.

कणकवली (सिंधुदुर्ग) : दुचाकी आणि तीनआसनी रिक्षा यांच्यात झालेल्या भीषण धडकेत दुचाकीवरील दोघे जण जागीच ठार झाले. कणकवली-नरडवे रस्त्यावरील सांगवे केळीचीवाडी येथील वळणावर दुपारी साडेबाराच्या सुमारास अपघात झाला. मृत हरकुळ बुद्रुक सुतारवाडी येथील आहेत. त्याच गावातील बोंडकवाडीतील घाडीगावकर कुटुंबातील रिक्षाचालक आणि रिक्षातील तीन प्रवासी असे चौघे गंभीर जखमी आहेत.

अमित प्रभाकर मेस्त्री (वय ४०) व परशुराम अनंत पांचाळ (वय ४८) अशी मृतांची नावे आहेत. रिक्षाचालक गणेश अशोक घाडीगावकर (३०), बाळकृष्ण सदाशिव घाडीगावकर (८०), मनोहर बाळकृष्ण घाडीगावकर (४२), माधवी मनोहर घाडीगावकर (३०, चौघे रा. हरकुळ बुद्रुक बोंडकवाडी) गंभीर जखमी आहेत. त्यांना १०८ रुग्णवाहिकेतून कणकवली उपजिल्हा रुग्णालयात आणले. प्राथमिक उपचारानंतर तेथून पडवे येथील खासगी रुग्णालयात दाखल केले. जखमींपैकी मनोहर आणि माधवी घाडीगावकर यांना अधिक उपचारासाठी मुंबईला हलविण्यात येणार आहे. 

हेही वाचा - धक्कादायक ; रत्नागिरीत कौटुंबिक हिंसाचार घटनांमध्ये होतीये वाढ -

Advertising
Advertising

याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी ः हरकुळ बुद्रुक येथील गणेश घाडी रिक्षा (एम. एच. ०७. एस.६८९८) घेवून कनेडी येथे जात होते. वाडीतीलच बाळकृष्ण घाडीगावकर यांना कनेडी येथे उपचारासाठी नेत होते. यावेळी सांगवे केळीचीवाडी येथे आले असता समोरून येणाऱ्या दुचाकी (एम. एच. ०७ एन ४३९०) चालकाने धडक दिली. धडक इतकी भीषण होती की, दुचाकीवरील दोघेही रस्त्यावर फेकले गेले. दोघांच्या डोक्‍याला गंभीर दुखापत झाली. दोघेही रक्ताच्या थारोळात पडले. त्यांचा जागीच मृत्यू झाला.

रिक्षामधील चौघेही गंभीर जखमी झाल्याने एकच आक्रोश झाला. जमलेल्यांनी तत्काळ १०८ रुग्णवाहिका आणि पोलिसांना पाचारण केले. कणकवली पोलिस घटनास्थळी दाखल झाले. काही वेळ वाहतूक थांबवण्यात आली होती. घटनास्थळी कनेडी येथे असलेले भाजपचे कार्यकर्ते गोट्या सावंत यांच्यासह पंचायत समिती सदस्य मंगेश सावंत, माजी पंचायत समिती सदस्य राजू पेडणेकर, हरकुळ बुद्रुक माजी सरपंच आनंद ठाकूर, वामन गोसावी, डॉ. श्रीकृष्ण आर्डेकर, ॲड. प्रकाश पावसकर, अतुल मेस्त्री, वामन मेस्त्री, नंदू मेस्त्री, दीपक मेस्त्री, सचिन मेस्त्री, लतेश कदम, लक्ष्मण मेस्त्री यांनी धाव घेतली.

हेही वाचा -  गुहागर : शृंगारतळीत वीजवाहिन्यांचे जाळे भूमिगत होणार -

मृत अमित मेस्त्री अविवाहित असून त्याच्या मागे आई व भाऊ असा परिवार आहे. अपघातात मृत्यू झालेले दोघेही शेजारी राहणारे असल्याने सुतारवाडीमध्ये शोककळा पसरली होती. अपघाताची माहिती मिळाल्यानंतर कणकवली उपविभागीय पोलिस अधिकारी डॉ. नितीन कटेकर, पोलिस निरीक्षक संजय धुमाळ, पोलिस उपनिरीक्षक जगदीश बांगर, अनमोल रावराणे, धनश्री पाटील, कनेडी दूरक्षेत्राचे पोलिस तसेच हरकुळ बुद्रुकचे पोलिसपाटील संतोष तांबे हे तातडीने अपघातस्थळी पोहोचले होते.
 

 

संपादन - स्नेहल कदम