दीप अमावस्येनिमित्त फाटक हायस्कुलमध्ये प्रबोधन

मकरंद पटवर्धन
रविवार, 12 ऑगस्ट 2018

रत्नागिरी - दीप अमावस्येनिमित्त येथील फाटक हायस्कूलच्या विद्यार्थ्यांनी 10 प्रकारच्या तेलापासून दीप प्रज्वलित केले आणि विज्ञानवादी बनण्याचा अनोखा प्रयोग केला. दिवसभरात अनेक विद्यार्थ्यांनी हे दीप प्रदर्शन व प्रत्येक तेलाची माहिती घेतली. तसेच सौरउर्जेवर रोषणाईच्या माळा, टीव्ही, स्ट्रीट लाईट, एलईडी प्रज्वलित केल्या. कोकणातील पहिली अटल टिंकरिंग लॅब या शाळेत असून त्यामार्फत हा उपक्रम राबवला.

अटल लॅबमध्ये सौरपॅनेल आहे. त्यामार्फत विविध दिवे प्रज्वलित केले. फाटक प्रशालेने यंदा प्रथमच हा उपक्रम आयोजित केला. यामध्ये विद्यार्थ्यांनी तूप आणि शेंगदाणा, खोबरेल, तीळ, सोयाबीन, लसूण, एरंडेल, कडूनिंब आणि करडई तेलाची माहिती संकलित केली. यामध्ये त्याचे शास्त्रीय नाव, रंग, गंध व गुणधर्म यांची माहिती दिली. त्यासोबत समई, पणतीमध्ये हे तेल ठेवून ते दीप प्रज्वलित केले. आरोग्यासाठी कोणते तेल उपयुक्त आहे, याची माहिती या प्रदर्शनातून विद्यार्थ्यांना मिळाली.

विज्ञान शिक्षक मारोती खरटमोल, इंद्रजीत वळवी आणि सदानंद बोपर्डीकर यांच्या मार्गदर्शनाखाली हा उपक्रम राबवला. दैनंदिन जीवनात आपण विज्ञानाचा उपयोग करतो. त्याची अधिक माहिती विद्यार्थ्यांना मिळण्याकरिता शाळेत सातत्याने असे वैज्ञानिक प्रयोग अटल लॅबच्या माध्यमातून केले जात आहेत.

दि न्यू एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष अ‍ॅड. बाबा परुळेकर, कार्याध्यक्ष अ‍ॅड. सुमिता भावे, उपाध्यक्ष अ‍ॅड. विनय आंबुलकर, सचिव सौ. दाक्षायणी बोपर्डीकर, मुख्याध्यापिका सौ. शुभांगी वायकूळ यांनी या उपक्रमाचे विशेष कौतुक केले.

आम्ही शाळेत असा उपक्रम प्रथमच केला. तेलांच्या माहितीसह दीप लावले आहेत. आम्हाला खूप आनंद होत आहे. प्रत्येक तेलात कोलेस्टेरॉलचे प्रमाण कमी-जास्त असते. तेलाचे अनेक उपयोग आहेत, याची प्रथमच माहिती मिळाली.

- अनुष्का करमरकर, राधा टिकेकर

Web Title: Awakening in Phatak High school on Deep Amavasha