हेवाळे ग्रामपंचायतीवर झाला पुरस्कारांचा वर्षाव

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 4 एप्रिल 2017

एकाच वर्षी चार वेळा सन्मान - ११ लाख ५१ हजारांची मिळणार बक्षिसे

दोडामार्ग - तालुक्‍यातील हेवाळे गावाने या वर्षी सरपंच संदीप देसाई यांच्या नेतृत्वाखाली पंचायत राज क्षेत्रात चमकदार कामगिरी बजावत चार पुरस्कारांवर नाव कोरण्यात यश मिळविले. 

एकाच वर्षी चार वेळा सन्मान - ११ लाख ५१ हजारांची मिळणार बक्षिसे

दोडामार्ग - तालुक्‍यातील हेवाळे गावाने या वर्षी सरपंच संदीप देसाई यांच्या नेतृत्वाखाली पंचायत राज क्षेत्रात चमकदार कामगिरी बजावत चार पुरस्कारांवर नाव कोरण्यात यश मिळविले. 

यात हागणदारीमुक्त ग्रामसह तालुक्‍यातील पहिले स्मार्ट ग्राम, संत तुकाराम वनग्राम आणि लोकराज्य ग्राम अशा चार पुरस्कारांवर हेवाळे ग्रामने नाव कोरले. सरपंच संदीप देसाई यांच्या नेतृत्वाखाली या वर्षी अत्यंत प्रतिष्ठेच्या अशा स्मार्ट ग्राम, संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता अभियानांतर्गत राष्ट्रसंत तुकडोजी महाराज स्वच्छता स्पर्धेत तालुक्‍यात प्रथम क्रमांक आणि वनसंवर्धन क्षेत्रातील संत तुकाराम वनग्राम हा जिल्हास्तरीय प्रथम क्रमांकाचा पुरस्कार पटकावीत हेवाळे ग्राम तालुक्‍यातील पहिला लोकराज्य ग्राम बनविण्याचा मान मिळविला आहे. हेवाळे ग्रामच्या या यशस्वी घोडदौडीची सर्व स्तरांतून कौतुक होत आहे. पालकमंत्री दीपक केसरकर, जिल्हाधिकारी उदय चौधरी, जिल्ह्याचे सीईओ शेखर सिंह, जिल्हा उपवनसंरक्षक एस. रमेशकुमार, येथील गटविकास अधिकारी सिद्धार्थ आजवेलकर, वनक्षेत्रपाल सचिन आठवले आदींनी हेवाळे ग्रामच्या या कामगिरीबद्दल खास अभिनंदन केले.

या वेळी सरपंच देसाई म्हणाले, ‘‘जे यश मिळाले त्यात ग्रामवासीयांचा विशेषतः महिला आणि युवावर्गाचा खऱ्या अर्थाने सिंहाचा वाटा आहे. म्हणूनच तळकोकणात अतिशय विकासाच्या बाबतीत बॅकफूटवर असलेले गाव आता विकासाचा राहिलेला बॅगलॉग भरून काढत आहे.’’

जिल्हा मुख्यालयापासून तब्बल १२० किलोमीटर अंतरावर असलेल्या या गावचा सांघिकतेमुळेच शासनाचे विविधांगी उपक्रम आणि अभियानातील उत्स्फूर्त सहभाग याची दखल घेत जिल्हा परिषदेचे सीईओ शेखर सिंह यांनी हेवाळे ग्रामला प्रत्यक्ष भेट देत येथील ग्रामवासीय व सरपंच यांच्या सकारात्मक प्रयत्नाचे कौतुक केले. 

३ पुरस्कार अन्‌ ११ लाख ५१ हजारांची बक्षिसे- हागणदारी मुक्त गाव हा मानाचा किताब पटकावल्यानंतर या वर्षीच तालुक्‍यातील पहिले स्मार्ट ग्राम १० लाख,  संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता अभियान तालुक्‍यात प्रथम १ लाख व संत तुकाराम वनग्राम जिल्हास्तरीय प्रथम पुरस्कार ५१ हजार अशी बक्षिसे मिळणार आहेत. हे सगळे श्रेय आमचे समस्त ग्रामवासीय, आम्हाला वेळोवेळी साथ देणारे प्रशासकीय अधिकारी आणि आमचे हितचिंतक व मित्रमंडळी यांच्याकडून वेळोवेळी मिळणाऱ्या प्रेरणेस जाते, असे सरपंच देसाई यांनी म्हटले आहे.

Web Title: award gives to hevale grampanchyat