लयभारी ! सापशिडीतून नारळ लागवडीबाबत प्रबोधन

सकाळ वृत्तसेवा
Wednesday, 9 September 2020

काय उपाययोजना केल्या असता आपल्याला फायदा होईल व उपाययोजनांचा वापर केला नाही तर नुकसान कसे होते, याचे प्रात्यक्षिक या सापशिडीतून पाहावयास मिळते. अनेकांनी या सापशिडीची या प्रदर्शनाच्यावेळी माहिती घेतली. 

दाभोळ ( रत्नागिरी ) - डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ दापोलीने विकसित केलेल्या सुधारित तंत्रज्ञानाचा वापर जर नारळ उत्पादक बागायतदारांनी केला तर उत्पन्नात वाढ होते. वापरले नाही तर घसरण होते हे ठसविण्यासाठी सापशिडीचे रूपक वापरले आहे. याची प्रतिकृती कोकण कृषी विद्यापीठाने आयोजित केलेल्या नारळापासून तयार केलेल्या कलाकृतीच्या प्रदर्शनात ठेवली होती. 

कृषी विद्यापीठ दापोलीच्या कृषी तंत्रज्ञान व माहिती केंद्राचे व्यवस्थापक डॉ. संतोष वरवडेकर यांनी ती तयार केली. ते म्हणाले, बागायतदारांना नारळाचे जास्त उत्पन्न मिळावे यासाठी विद्यापीठाने विविध शिफारसी केल्या आहेत. नारळाला गिरीपुष्पांचे आच्छादन दिल्यास पाण्याची बचत होईल व गवताचीही वाढ होणार नाही. नारळाचे रोप लावण्यासाठी एक घनमीटरचा खड्डा मारल्यास रोपाच्या वाढीसाठी मुळांना खूप हवा मिळेल. नारळावर जर इरीओफाईड कोळ्याचा प्रादुर्भाव झाला तर अन्नद्रव्ये आणि निंबोळी द्यावी. 

उत्पन्नवाढीची शिडी 
"नारळाला द्या सुक्ष्म द्रव्य व खत, होईल त्यापासून भारी बरकत', "जर नारळबागेत मसाला मिश्रपिके, नारळाच्या उत्पन्नात होईल वाढ साठ टक्‍के', "ज्या रोपास पाच-सहा पाने, अशाच नारळ रोपांची वाढ जोमाने होते', "दोन नारळ रोपात अंतर साडेसात मीटर ठेवल्याने आंतरपिके घेता येतील', अशी उत्पन्नवाढीची शिडी आहे. 

सापातून घसरणीची उदाहरणे 
"जर नाही लावला पत्रा नारळाच्या झाडाला तर उंदीर पटकन चढणार झाडावर', "नाही नियंत्रण केले सोंड्या भुंग्यांचे तर नुकसान होईल नारळाच्या खोडाचे', "नाही वापरले नारळ बागेत बोर्डो मिश्रण, होईल कसे बरे नारळाच्या रोगांचे नियंत्रण' अशा वाक्‍यांद्वारे सापाचे म्हणजे घसरणीचे उदाहरण लिखाणातून दिले आहे. 

प्रदर्शनात ठरले मुख्य आकर्षण 
अनेकांना उत्पादनवाढीसाठी केवळ माहिती देऊन उपयोग होत नाही, ती त्यांच्या मनावर बिंबविण्यासाठी मनोरंजनाचा वापर करून उत्पन्नवाढीचा मार्ग सांगितला पाहिजे. काय उपाययोजना केल्या असता आपल्याला फायदा होईल व उपाययोजनांचा वापर केला नाही तर नुकसान कसे होते, याचे प्रात्यक्षिक या सापशिडीतून पाहावयास मिळते. अनेकांनी या सापशिडीची या प्रदर्शनाच्यावेळी माहिती घेतली. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Awareness About Coconut Cultivation From Sapshidi Ratnagiri Marathi News