esakal | वन्यजीव सप्ताहनिमित्त जनजागृती
sakal

बोलून बातमी शोधा

kokan

वन्यजीव सप्ताहनिमित्त जनजागृती

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

रत्नागिरी : खवल्या मांजराच्या खवल्या, कासव, घुबड आदींवर अघोरी कृत्य करून पैशाचा पाऊस पाडला जातो, या सर्व गोष्टी म्हणजे निव्वळ अंधश्रद्धा आहेत. नागरिकांनी पैशाच्या आमिषाला बळी पडून अशाप्रकारे बिबट्या, डुक्कर, सांबर आदी प्राणी, पक्षांची शिकार किंवा हत्या करू नये. याला कायद्याने सात वर्षे शिक्षा आणि १० हजाराच्या दंडाची तरतूद आहे. गेल्या काही दिवसांपासून आम्ही रात्रीची गस्त वाढवल्यापासून हे गंभीर प्रकार पुढे येऊ लागले आहेत. याला आळा घालण्यासाठी वनविभागाने गस्त अधिक कडक केली असून हे प्रकार हाणून पाडण्यासाठी तत्पर आहोत, अशी माहिती रत्नागिरी परिक्षेत्र वनाधिकारी प्रियंका लगड यांनी दिली.

वन्यजीव सप्ताहानिमित्त पत्रकारांशी झालेल्या अनौपचारिक चर्चेवेळी त्या बोलत होत्या. त्या म्हणाल्या, गेल्या काही दिवसांपासून जिल्ह्यात बिबट्याच्या कातड्याची तस्करी, जिवंत खवल्या मांजर आणि खवल्यांची तस्करी, सील माशाच्या दाताची तस्करी, सांबराच्या शिंगाची तस्करी असे अनेक गंभीर प्रकार उघडकीस आले. यावरून ग्रामीण भागातील गरीब लोकांना पैशाचे आमिष दाखवून अशा प्रकारे शिकार किंवा वन्य प्राण्यांची हत्या करताना दिसत आहेत. या लोकांना कोणीतरी पैशाचा पाऊस पाडण्यासाठी लाखो रुपये मोजून खवल्या मांजराच्या खवल्या घेतल्या जातील, अशा जाहिराती व्हायरल केल्या जात आहेत.

त्यामुळे ग्रामीण भागातील माणून सहज बक्कळ पैसा मिळावा यासाठी ही कृत्य केली जात आहेत; मात्र पैशाचा पाऊसवगैरे ही सर्व अंधश्रद्धा आहे, असे कुठेही होत नाही. छोट्या आमिषाला बळी पडून आपण प्राणी, पक्ष्यांची शिकार करून मोठा गुन्हा करीत आहोत. त्यासाठी कायद्यामध्ये ७ वर्षे आणि त्या पेक्षा जास्त शिक्षेची आणि दंडाची तरतूद आहे. नागरिकांनी याला बळी पडू नये, असे आवाहन प्रियंका लगड यांनी केले.

पैशाच्या पावसाचा प्रकार यापूर्वी सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये घडला होता. त्यासाठी नरबळी देण्यात आले होते. त्यानंतर अठरा नख्याचे कासव, काही किलोमध्ये वजन भरणारे घुबड यांच्यावर अघोरी कृत्य करून पैशाचा पाऊस पाडला जातो, अशी अनेकांची धारणार आहे. त्यासाठी काहींनी कासव, घुबड पाळल्याचे प्रकारही उघड झाले आहेत; मात्र वनविभागाने हा मोठा गुन्हा असल्याचे सांगितल आहे. या सर्व अंधश्रद्धा असल्याचे स्पष्ट केले आहे.

ग्रामीण भागात अजूनही बिबट्या, डुक्कर, सांबर, मोर, ससा आदींची मोठ्या प्रमाणात शिकार सुरू आहे. म्हणून आम्ही ज्या भागामध्ये जास्त जंगल आहे त्या भागामध्ये गस्त वाढवली आहे. काही भाग तयार करून ही गस्त सुरू ठेवली आहे. म्हणून गेल्या काही दिवसांमध्ये जिल्ह्यात प्राण्यांच्या तस्करीचे प्रकार उघडकीस आले आहेत. शिकार रोखण्यासाठी यापुढे आम्ही आणखी गस्त कडक करून हे प्रकार हाणून पाडण्याचा आमचा प्रयत्न आहे, असेही लगड यांनी सांगितले. समुद्री संरक्षित प्रजातींमध्ये अनेक मासे, कासव आदींना कायद्याचे मोठे संरक्षण आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले. चार तारखेपासून सुरू होणाऱ्या वन्यजीव सप्ताहानिमित्त लोकांमध्ये जनजागृती होण्यासाठी ही माहिती दिली.

loading image
go to top