रत्नागिरी : जनजागृतीने 12 खवले मांजरांना जीवदान 

रत्नागिरी : जनजागृतीने 12 खवले मांजरांना जीवदान 

चिपळूण -  काही वर्षांपूर्वी शंभराच्या वर खवले मांजरांची असलेली संख्या आता केवळ हाताच्या बोटावर मोजण्याएवढी घसरल्याचे आढळले आहे. या प्राण्याचे अस्तित्व टिकवणे हेच खरे आव्हान निसर्गप्रेमींसमोर निर्माण झाले आहे. जगातील सर्वांत दुर्मिळ होत चाललेल्या प्राण्यांमध्ये खवले मांजराचा समावेश झाला आहे, अशी माहिती सह्याद्री निसर्ग मंडळाच्या सदस्यांनी दिली आहे. सह्याद्री निसर्ग मंडळाच्या या जनजागृती उपक्रमामुळे १२ खवले मांजरांना जीवदान मिळाले आहे. 

सह्याद्री निसर्ग मंडळाने नुकतेच खवले मांजराच्या पाहणीचे काम पूर्ण केले. जिल्ह्यात 40 ट्रॅप कॅमेराद्वारे ही पाहणी केली. कॅमेराद्वारे एक दिवस व एक रात्र या प्रमाणे "एक कॅमेरा दिवस' समजला जातो. याप्रमाणे एकूण 10 हजार कॅमेरा दिवसाची ही पाहणी पूर्ण झाली. या पाहणीचे निष्कर्ष धक्कादायक होते. खवले मांजर हा प्राणी केवळ मुंगी व वाळवीसारखे कीटक खाऊन जगतो.

निशाचर प्राणी असल्याने रात्रीच्या वेळी झाडांना लागलेली वाळवी व मुंग्यांच्या वारुळात लांब जीभ टाकून तो हे कीटक खातो. काही वर्षांपूर्वी या प्राण्यांची संख्या मोठी होती. मात्र आंतरराष्ट्रीय स्तरावर त्याची तस्करी होते. त्याच्या अंगावर असलेल्या खवल्यांसाठी ही तस्करी केली जाते. पुण्यात काही महिन्यांपूर्वी झालेल्या खुनाच्या तपासात याच तस्करीचे कारण आढळले. ठाणे जिल्ह्यात मागील सहा महिन्यांत चार गुन्ह्यांमध्ये खवले मांजर तस्करीची कारणे सापडली.

वनखात्याच्या मार्गदर्शनाखाली येथील सह्याद्री निसर्ग मंडळाने जिल्ह्यातील 1 हजार 530 गावात जनजागृतीची पत्रे पाठवून जनजागृती कार्यक्रम केले. त्याचा परिणाम म्हणून वर्षभरात मानवी वस्तीत आलेल्या 12 खवले मांजरांना ग्रामस्थांनी वनखात्याच्या ताब्यात देऊन पुन्हा नैसर्गिक अधिवास मिळवून दिला. 

नवीन संशोधन 
खवले मांजराच्या आहारात नेमक्‍या किती प्रकारच्या कीटकांचा समावेश होतो, याबद्दलचे संशोधन पंजाबमध्ये सुरू आहे. लवकरच हे संशोधन आंतरराष्ट्रीय स्तरावर जाहीर होणार आहे. 

खवले मांजरांची संख्या कमी होणे ही निसर्गाच्या संतुलनासाठी चिंताजनक बाब आहे. अन्यथा वाळवीसारखे कीटक वनसंपत्ती नष्ट करू शकतात. त्यासाठी खवले मांजरांची संख्या वाढणे गरजेचे आहे.

-  भाऊ काटदरे, सदस्य, इंटरनॅशनल युनियन फॉर कॉन्झरव्हेशन ऑफ नेचर स्वित्झर्लंड 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com