आयी हे गाव देशाच्या नकाशावर `या` नावाने झळकणार !

सकाळ वृत्तसेवा
Sunday, 6 September 2020

सुमारे दीड हजार लोकवस्तीच्या या गावातील विविध समाजाने विविध कला जोपासल्या आहे. यातून काही प्रमुख पारंपारिक व्यवसाय अजूनही गावात टिकून आहेत. त्या पार्श्‍वभूमीवर मानाचा तुरा गावाच्या शिरपेचात रोवण्यासाठी महाराष्ट्र वस्त्रोद्योग व हस्तशिल्प विभागाने पुढाकार घेतला. 

दोडामार्ग ( सिंधुदुर्ग ) - हस्तशिल्प कलेतील आदर्श गाव म्हणून आयी (ता. दोडामार्ग) गावाचा प्रस्ताव केंद्राकडे पाठविला आहे. त्यामुळे आयी गाव लवकरच देशाच्या नकाशावर हस्तकलेतील आदर्श गाव म्हणून नक्कीच झळकणार आहे. राज्य शासनाकडून तसा प्रस्ताव केंद्र शासनाकडे पाठविला आहे. 

तालुक्‍यातील आयी गावात माती कामाची पारंपरिक कला आजही मनोभावे जोपासली जात आहे. त्यामुळे राज्याच्या महाराष्ट्र वस्त्रोद्योग व हस्तशिल्प विभागामार्फत आयी गाव हस्तशिल्प कलेसाठी आदर्श गाव म्हणून प्रस्तावित केला आहे. प्रस्ताव केंद्राकडे पाठवला आहे. लवकरच तो प्रस्ताव मंजूर होईल, अशी आशा त्या विभागाचे समन्वयक मनोहर मिनानी यांनी आयी येथे व्यक्त केली. 

सुमारे दीड हजार लोकवस्तीच्या या गावातील विविध समाजाने विविध कला जोपासल्या आहे. यातून काही प्रमुख पारंपारिक व्यवसाय अजूनही गावात टिकून आहेत. त्या पार्श्‍वभूमीवर मानाचा तुरा गावाच्या शिरपेचात रोवण्यासाठी महाराष्ट्र वस्त्रोद्योग व हस्तशिल्प विभागाने पुढाकार घेतला. 

गावाचा आदर्श शिल्पकला ग्राम प्रस्ताव मंजूर झाल्यास तेथील हस्तशिल्पकलेसाठी मोठ्या प्रमाणात चालना मिळेल, असा विश्‍वास आयी येथे झालेल्या कार्यक्रमात बोलताना विभागाचे समन्वयक श्री. मिनानी व रितेश कुमार यांनी व्यक्त केला. भारत सरकारच्या वस्त्रोद्योग मंत्रालयाच्या हस्तशिल्प विभागाच्यावतीने हस्तशिल्प कारागिरांच्या आर्थिक समस्या व व्यावसायिक अडचणी जाणून घेण्यासाठी शुक्रवारी (ता. 4) सभेचे आयोजन केले होते.

सभेसाठी कोल्हापूर येथील विभागीय कार्यालयातील अधिकारी उपस्थित होते. हस्तशिल्प विभागामार्फत लवकरच मूर्तिकार म्हणून मूर्तिकारांना ओळखपत्र देण्यात येणार आहे. त्याचा उपयोग कलाकारांना व्यवसायासाठीच्या शासकीय कर्ज योजनांचा लाभ घेऊन आपला उद्योगव्यवसाय वाढवण्यासाठी होणार आहे. 

दोडामार्ग युवा कुंभार समाज आणि सिंधुदुर्ग जिल्हा कुंभार समाज यांनी कार्यक्रमाचे आयोजन केले होते. प्रकल्पाची सविस्तर माहिती श्री. मिनानी व रितेश कुमार यांनी दिली. कुंभार संघटनेचे जिल्हाध्यक्ष गणपत गिरोडकर उपस्थित होते. सूत्रसंचालन गोपाळ शेटकर यांनी तर तालुकाध्यक्ष अनिल शेटकर यांनी प्रास्ताविक केले. 

विविध समाजांचे योगदान 

  • मातीपासून वस्तू बनवण्यात कुंभार समाज पुढे 
  • हरिजन समाज बनवतो बांबूपासून विविध वस्तू 
  • गोसावी समाज अणशीपासून धागे तयार करतो 
  • कासार समाज करतो बांगड्या तयार 
  • गोधडी शिवणे, माशांची जाळी विणण्यास ठाकर समाज पुढे 
  • वाणी समाज करतो खाजे, लाडू तयार 

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Ayee Ideal Village For Hand Craft Coming Soon On Country Map