साखळोलीत उभं राहतंय आयुर्वेदिक जंगल 

मयूरेश पाटणकर
मंगळवार, 21 मार्च 2017

गुहागर - दापोली तालुक्‍यातील साखळोली गावात रवींद्र प्रभुदेसाई यांनी आयुर्वेदिक उद्यानाची निर्मिती केली आहे. यामध्ये वृक्षवर्गीय 250, झुडुपवर्गी 300 आणि वेलवर्गीय 32 प्रजातींची लागवड करण्यात आली आहे. चार एकरांच्या परिसरातील हे आयुर्तेज उद्यान म्हणजे प्रभुदेसाई यांच्या संकल्पनेतून साकारलेले कृत्रिम जंगल आहे. 

गुहागर - दापोली तालुक्‍यातील साखळोली गावात रवींद्र प्रभुदेसाई यांनी आयुर्वेदिक उद्यानाची निर्मिती केली आहे. यामध्ये वृक्षवर्गीय 250, झुडुपवर्गी 300 आणि वेलवर्गीय 32 प्रजातींची लागवड करण्यात आली आहे. चार एकरांच्या परिसरातील हे आयुर्तेज उद्यान म्हणजे प्रभुदेसाई यांच्या संकल्पनेतून साकारलेले कृत्रिम जंगल आहे. 

जगामध्ये उत्पादनशील कृत्रिम जंगलांची संकल्पना मांडण्यात येत आहे. हीच संकल्पना दापोली तालुक्‍यातील साखळोलीतील पितांबरी ऍग्रो फार्ममध्ये साकारण्यात आली आहे. या उद्यानामध्ये आयुर्वेदात औषधी म्हणून सांगितलेली वृक्षवर्गीय, झुडुपवर्गीय आणि वेलवर्गीय 582 झाडे वाढवण्यात आली आहेत. रामायण, महाभारतामध्ये उल्लेख असलेले वृक्षही येथे पाहायला मिळतात. चार एकरांच्या परिसरात 70 चंदनाच्या झाडांचे वेगळे जंगल आहे. अशोक, सीताअशोक, वड, कृष्णवड, सप्तपर्णी, रुद्राक्ष, पिंपळ, हरडा, बेहडा, वृक्ष प्रजातीमधील सोनचाफा, कापूर, नोनी (पारतोंडी), आवळा, अर्जुन अशी 250 वृक्ष प्रजातींची झाडे आहेत. करवंद, अडुळसा, निर्गुडी, रुई, लवी, चिनी अननस, सर्पगंधा, अमेरिकन केशर आदी 300 झुडुपवर्गीय प्रजाती येथे पाहायला मिळतात. या उद्यानात अनेक कमानींवर कृष्णकमळ, लसुणवेल, बदक वेल, संक्रांत वेल, वेलवर्गीय गुलमोहर असे 32 प्रकार वाढवण्यात आले आहेत. त्याशिवाय या प्रकल्पात निशिगंध, मोगरा, गुलाब, अनंत, हजारी मोगरा, रातराणी, स्पायडर लिली, सोनचाफा अशी सुगंधी फुलझाडे, सुगंधी गवताची लागवड करण्यात आली आहे. या लागवडीला मुबलक पाणी मिळावे म्हणून दोन शेततळी तयार करण्यात आली आहेत. विशेष म्हणजे या प्रत्येक झाडाची माहिती देणारा फलक झाडासमोर लावण्यात आला आहे. त्यामुळे आपल्याला बोलीभाषेतील नाव, प्रचलित नाव, शास्त्रीय नाव, त्याचा उपयोग हे सारे कळते. 

काही ना काही उत्पादनांची निर्मिती 
येथील प्रत्येक झाडाद्वारे काही ना काही उत्पादनांची निर्मिती करण्यात येणार आहे. सध्या सुंगधी फुलांपासून अर्क काढण्यात येतो. या अर्काचा उपयोग करून पितांबरी प्रॉडक्‍टच्या "देवभक्ती' या ब्रॅंण्डअंतर्गत 10 प्रकारच्या उदबत्त्या बाजारात आल्या आहेत. या उद्यानाची देखभाल पराग साळवी (एम.एस्सी फॉरेस्ट्री) व गुरप्रसाद बेर्डे (बी.एस्सी, हॉर्टिकल्चर) यांच्या मार्गदर्शनाखाली केली जाते. पितांबरी ऍग्रो फॉम्स्‌ने उभ्या केलेल्या या आयुर्वेदिक जंगलातून पर्यावरण संवर्धनाबरोबर रोजगार आणि उत्पादकता असा सुरेख मेळ घातला आहे. शिवाय कृषी पर्यटनाची जोडही दिली आहे. 

Web Title: Ayurvedic forest develop in sakholi