बबन साळगावकरांचे ठरलंय..; सावंतवाडीतून राष्ट्रवादीची उमेदवारी? 

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 28 सप्टेंबर 2019

सावंतवाडी - येथील नगराध्यक्ष बबन साळगावकर यांनी पालकमंत्री दीपक केसरकर यांच्या विरोधात राष्ट्रवादीच्या उमेदवारीवर निवडणूक लढवण्याचे जवळपास निश्‍चित केले आहे. त्यांनी आज राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांची मुंबईत भेट घेतली. या वेळी उमेदवारीबाबत सकारात्मक चर्चा झाल्याचे समजते. साळगावकर यांच्या बंडामुळे सावंतवाडी मतदारसंघातील चुरस वाढणार आहे. 

सावंतवाडी - येथील नगराध्यक्ष बबन साळगावकर यांनी पालकमंत्री दीपक केसरकर यांच्या विरोधात राष्ट्रवादीच्या उमेदवारीवर निवडणूक लढवण्याचे जवळपास निश्‍चित केले आहे. त्यांनी आज राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांची मुंबईत भेट घेतली. या वेळी उमेदवारीबाबत सकारात्मक चर्चा झाल्याचे समजते. साळगावकर यांच्या बंडामुळे सावंतवाडी मतदारसंघातील चुरस वाढणार आहे. 

सावंतवाडी मतदारसंघाकडे जिल्ह्यासह संपूर्ण कोकणचे लक्ष आहे. दोन वेळा आमदार झालेले केसरकर यावेळीही शिवसेनेचे उमेदवार आहेत. शिवसेनेच्या उमेदवारीवर निवडून आलेले साळगावकर त्यांच्या विरोधात बंडाच्या पवित्र्यात आहेत. ते राष्ट्रवादीमधून लढतील, अशी चर्चा होती. त्यांनी आज श्री. पवार यांची भेट घेत त्यांच्याशी चर्चा केली. यामुळे त्यांचे बंड जवळपास निश्‍चित मानले जात आहे. 

प्रदेश राष्ट्रवादीकडून ही भेट निश्‍चित करण्यात आली होती. यावेळी राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष अमित सामंत, या मतदार संघातून इच्छूक असलेले एम. के. गावडे हेही उपस्थित होते. राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, धनंजय मुंडे, जितेंद्र आव्हाड आदी वरिष्ठ पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत साळगावकर व श्री. पवार यांच्या उमेदवारीबाबत चर्चा झाल्याचे समजते. पवार यांनी साळगावकरांच्या सावंतवाडीतील उमेदवारीला हिरवा कंदील दिल्याचेही समजते. 

याबाबत श्री. साळगावकर यांच्याशी संपर्क साधला असता ते म्हणाले, ""शरद पवार मोठे नेते आहेत. ही माझी सदिच्छा भेट होती. पुढचा निर्णय आणि बैठकीतील तपशील सावंतवाडीत आल्यावर जाहीर करू; मात्र ही अतिशय सकारात्मक चर्चा झाली.'' 

..तर नगराध्यक्षपदाचा राजीनामा देणार 
श्री. साळगावकर गेल्या पालिका निवडणुकीत शिवसेनेच्या उमेदवारीवर निवडून आले. ते थेट जनतेतून नगराध्यक्ष झाले आहेत. राष्ट्रवादीकडून विधानसभा लढवण्याचा निर्णय घेतल्यास त्यांना नगराध्यक्ष पद सोडवे लागणार आहे. 

साळगावकरांचा प्रवास 
श्री. साळगावकर गेली 35 हून अधिक वर्षे राजकारणात आहेत. त्यांच्या राजकीय कारकीर्दीची सुरूवात शिवसेनेतून झाली. सावंतवाडी तालुक्‍यात शिवसेना वाढविण्यात त्यांचा सिंहाचा वाटा होता. शिवसेनेकडूनही ते विधानसभा उमेदवारीचे दावेदार होते; मात्र शिवसेनेने शिवराम दळवींना उमेदवारी दिली. नंतरच्या काळात शिवसेनेशी झालेल्या मतभेदामुळे ते राष्ट्रवादीत आले. केसरकर यांच्या समवेत शहराच्या राजकारणात सक्रिय झाले. सावंतवाडीत नगरसेवक ते नगराध्यक्ष असा राजकीय प्रवास त्यांनी केला. ते केसरकरांसोबत शिवसेनेत यायला उत्सुक नव्हते; मात्र गेल्या पालिका निवडणुकीत राजकीय आग्रहामुळे त्यांनी शिवसेनेच्या उमेदवारीवर निवडणूक लढवली; मात्र केसरकर यांच्याशी निर्माण झालेल्या मतभेदामुळे गेली दोन वर्षे ते त्यांच्यापासून दुरावत गेले. त्याचेच रुपांतर या सर्व राजकीय घडामोडीत झाले.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Baban Salgaonkar will fight form NCP Sawantwadi seat