बाभूळवाडीत दीड लाख कोटींची रिफायनरी, पेट्रोकेमिकल प्रकल्प

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 27 फेब्रुवारी 2017

बाभूळवाडीपासून दुसरा भाग सुमारे पंधरा कि.मी.वरील किनारपट्टीच्या भागात असेल. या दुसऱ्या भागात गोदाम, बंदर सुविधा उभारण्यात येणार आहेत. प्रोजेक्‍ट मॅनेजमेंट कन्सल्टंट इंजिनिअर इंडिया लि.ने यावर कामही करण्यास सुरवात केली आहे, अशी माहिती सूत्रांकडून मिळाली.

राजापूर : सुमारे दीड लाख कोटी खर्चाची रिफायनरी आणि पेट्रोकेमिकल संकुल राजापूर तालुक्‍यातील बाभूळवाडी (वावूळवाडी) येथे उभारण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. हा प्रकल्प सर्वांत मोठा ठरणार आहे. दोन ठिकाणी मिळून प्रकल्प उभारला जाईल. बाभूळवाडी येथे 14 हजार एकर क्षेत्रात प्रकल्पाचा एक भाग व दुसरा भाग एक हजार एकर क्षेत्रात असेल.

विजयदुर्ग खाडीपासून सुमारे पंधरा किमी अंतरावरील कुंभवडे-बाभूळवाडी (वावूळवाडी) येथील जागा प्रकल्प उभारणीसाठी निश्‍चित करण्यात आल्याचे संकेत या माहितीवरून मिळाले आहेत. या परिसरात प्रकल्पाला उपयुक्त अशी सपाट जागा एवढ्या मोठ्या प्रमाणावर उपलब्ध झाली आहे. या जागेबद्दल माहिती देताना ऑईल मार्केटिंग सूत्रांनी सांगितले की, निश्‍चित केलेली जागा आवश्‍यक तेवढी म्हणजे 14 हजार एकर आहे व बंदरापासून जवळ आहे.

या प्रकल्पाची घोषणा झाल्यापासून गुहागर, दापोली आणि राजापूर येथील ठिकाणांची पाहणी करण्यात आली. या पाहणीच्या दरम्यानच प्रकल्पाला तीनही ठिकाणांहून विरोध झाला होता. वरिष्ठ अधिकाऱ्यांचे पथक येऊन दोन महिन्यांपूर्वी पाहणी करून गेले होते. त्यानंतर फारशा हालचाली झाल्या नव्हत्या. आता बाभूळवाडी येथील जागा निश्‍चित करण्यात आली असून ही जागा प्रकल्पाला देण्यासाठी राज्य सरकार सर्वतोपरी मदत करणार असल्याचे सूत्रांनी सांगितले.

केंद्र शासनातर्फे इंडियन ऑईल, भारत पेट्रोलियम, हिंदुस्थान पेट्रोलियम या कंपन्यांनी संयुक्तरीत्या सुमारे साठ दशलक्ष टन प्रती हंगाम क्षमतेचा आणि दीड लाख कोटी रुपये गुंतवणुकीचा रिफायनरी प्रकल्प उभारण्याचा निर्णय घेतला. प्रकल्पासाठी कोयना धरणापासून पाणी आणण्यात येणार आहे.

नाणार परिसरातील ग्रामस्थांचा विरोध
नाणार परिसरातील सुमारे सात ते आठ गावांतील जमिनीची प्रशासनाने पाहणी केली होती. तेव्हापासूनच प्रकल्पाला विरोध आहे. नाणार, सागवे ग्रामसभांमध्ये प्रकल्पविरोधी ठरावही केले. रिफायनरी प्रकल्पाच्या उभारणीसाठी तालुक्‍यातील कुंभवडे-वावूळवाडी येथील जागा निश्‍चित केल्याची चर्चा वेग घेत आहे. वावूळवाडी हा परिसर विजयदुर्ग खाडी किनाऱ्यापासून सुमारे चौदा-पंधरा किमी अंतरावर आहे. रिफायनरी प्रकल्पाच्या उभारणीसाठी वावूळवाडीच्या जागेला "हिरवा कंदील' मिळाल्याचे समजते.

Web Title: babhulwadi to get big project of refinery, petrochemical