मच्छीमारांवर खराब हवामानाची संक्रांत

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 13 ऑगस्ट 2018

हर्णै - हर्णै बंदरात 1 ऑगस्टच्या मुहुर्तापासूनच मासेमारी उद्योगावर खराब हवामानाची जणू संक्रांतच आली आहे. बिघडलेल्या वातावरणामुळे बहुतांश नौका दिघी (रायगड) व जयगड (रत्नागिरी) खाडीमध्ये नांगर टाकून आहेत. यामुळे येथील मच्छीमारांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले. 

हर्णै - हर्णै बंदरात 1 ऑगस्टच्या मुहुर्तापासूनच मासेमारी उद्योगावर खराब हवामानाची जणू संक्रांतच आली आहे. बिघडलेल्या वातावरणामुळे बहुतांश नौका दिघी (रायगड) व जयगड (रत्नागिरी) खाडीमध्ये नांगर टाकून आहेत. यामुळे येथील मच्छीमारांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले. 

1 ऑगस्टपासून मासेमारी सुरु करायची म्हणून नौकांची डागडुजी, रंगरंगोटी आदीवर लाखो रुपये खर्च झाला आहे. खलाशी, त्यांना लागणारे अन्नधान्य साहित्य, मासळी मारण्यासाठी लागणारी विविध प्रकारची जाळी, डिझेल, बर्फ आदी सामान भरण्यासाठी खर्च केले आहेत. काहींनी जाण्याचे धाडस केले. मुहुर्त झाला परंतु खर्च सुटण्याइतपत मासळी पदरात पडली नव्हती. 1 तारखेला मासेमारीला निघाले आणि दुपारच्या काळात दक्षिणेकडील जोरदार वार्‍याने जयगड खाडीतल्या नौका पुन्हा जयगड व दाभोळ खाडीला आसर्‍याला गेला. हर्णैमधल्या नौकांनी आंजर्ले खाडी व दिघी खाडी गाठली. 

हवामानाच्या अंदाजाने जवळच जाऊन मासेमारी केल्यामुळे आवक कमी झाली. सात ऑगस्टपासून जोरदार पाऊस आणि वादळ सुरू झाले आहे. 15 ऑगस्टपर्यंत वातावरण खराब असल्याच्या सूचना आहेत. त्यामुळे हर्णै बंदरात मच्छीमारी तोट्यात गेली. नोकरपगार, बर्फ, डिझेल, भत्ता आदीचा खर्च नौकामालकांनाच सोसावा लागत आहे. 13 सप्टेंबरला गणेशोत्सव आहे. त्यापूर्वी दोन ते तीन दिवस खलाशी सुट्टीवर जातात. सणानंतरच मासेमारी सुरु होते. त्यामुळे आता हाती जेमतेम एकच महिना उरला आहे. वातावरण शांत झाले तरच उरलेला कालावधी फायद्यात पडू शकतो.

जयगड आणि दिघी खाड्यांचा परिसर पूर्णपणे सुरक्षित आहे. शासनाला आमची  फरफट केंव्हा कळणार ?, जिल्ह्यातील क्रमांक 2 चे हर्णै बंदर अजूनही असुरक्षितच आहे याची खंत वाटते. या बंदराला अच्छे दिन कधी येणार ?

- अंकुश दोरकुळकर, मच्छीमार

मच्छीमारांना हवे भरपाईचे पॅकेज 

गेले पंधरा दिवस खूप नुकसान झाले. सरकार दरबारी मच्छीमारांना कोणी वाली नाही. लाखो रुपये खर्चून आम्ही नौका उभ्या करतो आणि अचानक आलेल्या वादळसदृश्य परिस्थितीमुळे आमचं नुकसान होतंय. याची नोंद सरकारपर्यंत पोहचवून शेतकर्‍यांप्रमाणे मच्छीमारांना नुकसान भरपाईचे पॅकेज मंजूर करावे अशी  मागणी दापोली मंडणगड गुहागर मच्छीमार संघटनेचे उपाध्यक्ष रउफ हजवाने यांनी केली.

Web Title: bad weather affects fishing season