अनोखे आंदोलन! वाजवल्या डफल्या, खुर्च्या खाली करण्याच्याही घोषणा

नागेश पाटील
Wednesday, 12 August 2020

सार्वजनिक वाहतुकीमधील एस. टी. बेस्ट व शहरातील सार्वजनिक वाहतूक सरकारने तातडीने सुरू करायला हवी. गणेशोत्सवासाठी खासगी बस बुकिंग मोठ्या प्रमाणात होते.

चिपळूण (रत्नागिरी) - कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर गेल्या 5 महिन्यांपासून सार्वजनिक वाहतूक सेवा ठप्प आहेत. या कालावधीत अनेक उद्योगधंद्यांसह विविध क्षेत्रात कोरोनाचे प्रतिकूल पडसाद उमटले आहेत. कोरोनाला रोखण्यासाठी उपाययोजनांमध्ये सुधारणा कराव्यात तसेच सार्वजनिक वाहतूक व्यवस्था तातडीने सुरू करावी. यासह विविध मागण्यांसाठी वंचित बहुजन विकास आघाडीच्या पदाधिकाऱ्यांनी शहरातील बस स्थानकात `डफली बजाव` आंदोलन केले. `आमच्या मागण्या मान्य करा नाहीतर खुर्च्या खाली करा`, अशा घोषणाही दिल्या. 

वाचा - आज परत सांगतो.. पार्थ लंबी रेस का घोडा है !!! थांबू नकोस मित्रा.

या वेळी वंचितचे पदाधिकारी म्हणाले, "कोरोनाचा फैलाव रोखण्यासाठी देशभर उपाययोजना राबवल्या. त्यातून सार्वजनिक वाहतूक बंद केली. खासगी कार्यालये, दुकाने, हॉटेल, बाजारपेठा काही महिने बंद राहिल्या. यातून अनेकांवर उपासमारीची वेळ आली; मात्र कोरोना प्रतिबंधात्मक उपाययोजनेत बदल करण्याची आवश्‍यकता आहे. 80 टक्के लोकांमध्ये कोरोनाविरूद्ध लढण्याची प्रतिकारशक्ती आहे. हे अभ्यासाअंती दिसून आले आहे. केवळ 20 टक्‍के रुग्णांवर सरकारला वैद्यकीय खर्च आणि सेवा द्यावी लागणार आहे.

गेल्या चार महिन्यांचा आढावा घेतल्यास सरकारने काही निर्णय तातडीने घेतले पाहिजेत. कोरोनाला रोखण्यासाठी जे आरोग्यविषयक सुरक्षिततेचे नियम आहेत, त्याचे काटेकोर पालन करून सर्व व्यवहार सुरू करावेत. सार्वजनिक वाहतुकीमधील एस. टी. बेस्ट व शहरातील सार्वजनिक वाहतूक सरकारने तातडीने सुरू करायला हवी. गणेशोत्सवासाठी खासगी बस बुकिंग मोठ्या प्रमाणात होते.

हेही वाचा - तुम्हाला माहित आहे का? या गावाला तूळशी वृंदावनाचे गाव का म्हणतात?

खासगी सेवा सुरू होत असतील तर सरकारला सार्वजनिक वाहतूक व्यवस्था सुरू करण्यास कोणत्या अडचणी आहेत? सध्या एसटी सेवा सुरू असली तरी त्या तुरळक प्रमाणात व अपुऱ्या आहेत. जिल्हाबंदी कायम असल्याने विविध व्यवसायावर विपरित परिणाम झाले आहेत. विविध मागण्यांचे पत्र नायब तहसीलदार तानाजी शेजाळ यांना देण्यात आले. चिपळूण आगारात डफली बजाव आंदोलन करताना विविध घोषणा दिल्या. या वेळी वंचितचे जिल्हाध्यक्ष महेश सावंत, विनोद कदम, सुशांत जाधव, विकास कदम, राजीव कांबळे, दीपक कदम, रमण मोहिते, वैभव सावंत, किशोर शिर्के, राजेश जाधव, अमोल जाधव, धर्मपाल पवार, संजय जाधव, राजन सुर्वे आदी उपस्थित होते. 

संपादन - राहुल पाटील


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Bahujan Aghadi Party Movement in Chiplun konkan ratnagiri