राजापुरात जागवल्या बालगंधर्वांच्या आठवणी

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 20 डिसेंबर 2016

राजापूर - दैवी देणगी लाभलेल्या सुरेल आवाजाच्या जोरावर रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजविणाऱ्या बालगंधर्वांची विविध अशी गाणी सादर करून पं. आनंद भाटे यांनी राजापूरवासीयांना बालगंधर्वांचा सहवास घडविला. बालगंधर्व आणि पं. भीमसेन जोशी यांची विविध अशी शास्त्रीय आणि नाट्यसंगीताची गाणी सादर करून पं. भाटे यांनी ‘आनंद गंधर्व’ मैफल रंगविली. या वेळी त्यांनी रसिकांशी संवाद साधताना गायक म्हणून आजपर्यंत झालेला रंजक प्रवास उलगडला. चांगला गायक होण्यासाठी चांगला गुरू, सातत्याने रियाज आणि नशिबाची साथ अशी त्रिसूत्री एकत्रितरीत्या जुळून येणे गरजेचे असल्याचे त्यांनी सांगितले.

तालुक्‍याच्या सांस्कृतिक चळवळीला चालना देण्याच्या उद्देशाने कार्यरत असलेल्या मित्रमेळातर्फे शहरातील राजापूर हायस्कूलच्या पटांगणावर पं. भाटे यांचा ‘आनंद गंधर्व’ हा कार्यक्रम झाला. स्वयंवर नाटकातील ‘नरवर कृष्णा समान’ या गाण्याने या मैफलीचा प्रारंभ झाला. त्यानंतर ‘अवघाची संसार’ हा कान्होपात्रांचा अभंग सादर करून साऱ्यांना संसारामध्ये रमविताना विठ्ठल चरणी लीन केले. ‘नाथ हा माझा’, ‘दिल बेकरार’, ‘जाऊ कुणाला शरण’ आदी एकापेक्षा एक सरस गाणी गाऊन पं. भाटे यांनी साऱ्यांना मंत्रमुग्ध केले. दुसऱ्या सत्रामध्ये बालगंधर्व आणि  पं. भीमसेन जोशी यांनी आपापल्या शैलीमध्ये गाऊन गाजवलेले ‘कान्होबा तुझी घोंगडी चांगली’ हे गाणे पं. आनंद भाटे यांनी सादर केले. ‘जोहर मायबाप जोहर’ या गाण्यावर त्यांनी साऱ्यांना डोलविले. राष्ट्रीय पारितोषिक विजेत्या ‘चिन्मया सकल हृदया’ या भैरवीने या मैफलीची सांगता केली. याप्रसंगी त्यांनी रसिकांशी संवाद साधताना गायक म्हणून कसे घडलो हे सांगून आजपर्यंतचा रोमांचकारी प्रवास उलगडला. नव्याने तयार करण्यात आलेल्या बालगंधर्व चित्रपटातील १७ गाणी गाताना घडलेले विविध किस्सेही त्यांनी सांगितले. पं. भाटे यांना आदित्य ओक यांनी हार्मोनियमची, निखिल फाटक यांनी तबल्याची, तर प्रथमेश तारळकर यांनी पखवाजची साथ केली. सुरवातीला पं. भाटे आणि सहकाऱ्यांचा मित्रमेळातर्फे सत्कार करण्यात आला.

Web Title: BalGandharva memories