बाळशास्त्री जांभेकरांचे कर्तृत्व देशव्यापी - डॉ. श्रीपाल सबनीस

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 7 जानेवारी 2017

देवगड - आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांचा जन्म खेड्यात झाला असला तरी त्यांचे कर्तृत्व देशव्यापी आहे. आजच्या नव्या पिढीने त्यांचे चरित्र अभ्यासण्याची गरज असल्याचे मत ८९ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष डॉ. श्रीपाल सबनीस यांनी आज पोंभुर्ले (ता. देवगड) येथे व्यक्‍त केले. सुदृढ लोकशाहीसाठी पत्रकारितेची धार बोथट होणार नाही याची पत्रकारांनी काळजी घेणे आवश्‍यक असल्याचेही त्यांनी सांगितले.

देवगड - आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांचा जन्म खेड्यात झाला असला तरी त्यांचे कर्तृत्व देशव्यापी आहे. आजच्या नव्या पिढीने त्यांचे चरित्र अभ्यासण्याची गरज असल्याचे मत ८९ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष डॉ. श्रीपाल सबनीस यांनी आज पोंभुर्ले (ता. देवगड) येथे व्यक्‍त केले. सुदृढ लोकशाहीसाठी पत्रकारितेची धार बोथट होणार नाही याची पत्रकारांनी काळजी घेणे आवश्‍यक असल्याचेही त्यांनी सांगितले.

फलटण (जि. सातारा) येथील महाराष्ट्र पत्रकार कल्याण निधीतर्फे आज पोंभुर्ले येथील दर्पण सभागृहात ‘पत्रकार दिन’ साजरा करण्यात आला. या वेळी प्रमुख पाहुणे म्हणून डॉ. सबनीस बोलत होते. महाराष्ट्र पत्रकार कल्याण निधीतर्फे देण्यात येणाऱ्या विविध ‘दर्पण’ पुरस्कारांचे वितरण त्यांच्या हस्ते झाले. पुरस्काराचे यंदाचे २४ वे वर्ष होते. या वेळी मंचावर पत्रकार कल्याण निधीचे अध्यक्ष रवींद्र बेडकिहाळ, उपाध्यक्ष बापूसाहेब जाधव, कार्यकारी विश्‍वस्त विजय मांडके, तहसीलदार वनिता पाटील, सुधाकर जांभेकर, शांताराम गुरव आदी उपस्थित होते. त्यांच्या हस्ते स्मरणिकेचे प्रकाशन करण्यात आले. 

डॉ. सबनीस म्हणाले, ‘‘काही वेळा प्रतिकूल परिस्थितीमध्ये पत्रकार वार्तांकनाचे काम करीत असतात. गावोगावच्या समस्या मांडणारे पत्रकार आज काहीसे समस्याग्रस्त आहेत. पत्रकाराची लेखणी कमकुवत नसली तरी त्यांना मिळणाऱ्या सोयीसुविधा तुलनेत कमीच आहेत. लोकशाही जिवंत राहण्यासाठी पत्रकार खंबीर राहायला हवा. व्यवसायातील धोके अंगावर झेलून सतीचे वाण घेऊन ते पुढे जात आहेत. वृत्तपत्राच्या प्रत्येक टप्प्यावर टिकणे ही काळाची गरज आहे. लोकशाहीचा चौथा स्तंभ कमकुवत होणार नाही याची काळजी घेतली पाहिजे.’’

श्री. बेडकिहाळ यांनी, बाळशास्त्रींचे चरित्र पुढील पिढीकडे जाण्यासाठी त्याचा शालेय पाठ्यपुस्तकात समावेश व्हावा यासाठी आपण प्रयत्नशील आहे, यासाठी स्थानिक पत्रकारांनीही पाठपुरावा करण्याची गरज असल्याचे सांगितले. अमर शेंडे यांनी सूत्रसंचालन केले. या वेळी पांडुरंग भाबल, सुरेश साबळे तसेच जिल्ह्यासह राज्याच्या विविध भागातील पत्रकार उपस्थित होते. विजय मांडके यांनी प्रास्ताविक केले व आभार मानले. 

पुरस्काराचे मानकरी
ज्येष्ठ संपादक पुरस्कार - मधुकर सामंत, दर्पण पुरस्कार - मराठवाडा विभाग - लक्ष्मण राऊत (जालना), कोकण विभाग - भालचंद्र दिवाडकर (चिपळूण), पश्‍चिम महाराष्ट्र विभाग - सुभाष धुमे (गडहिंग्लज), विदर्भ विभाग - श्रीपाद अपराजित (नागपूर), उत्तर महाराष्ट्र विभाग - रमेश पडवळ (नाशिक), विशेष दर्पण पुरस्कार - एम. रमजू (सातारा), गोरख तावरे (कऱ्हाड), बृहन्महाराष्ट्र जिल्हा वृत्तपत्र संपादक संघ पुरस्कृत पत्रमहर्षी वसंतराव काणे पत्रकार साहित्यिक पुरस्कार - देवदत्त साने (नांदेड), ज्येष्ठ पत्रकार शंकरराव पाटील कऱ्हाड पुरस्कृत धाडसी पत्रकार दर्पण पुरस्कार - देवेंद्र गावंडे (चंद्रपूर).

Web Title: Balshastri Jambhekar capability nationwide