मासेमारीवरील बंदी आजपासून उठली; पण समुद्रात न जाण्याचा इशारा

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 1 ऑगस्ट 2019

रत्नागिरी -  कोट्यवधींची उलाढाल असणारा मासेमारी व्यवसाय गेले ६१ दिवस बंद होता. बंदीचा कालावधी बुधवारी (ता. ३१) संपुष्टात आला आहे. त्यामुळे १ ऑगस्टपासून मासेमारी सुरू होणार असल्याने पुन्हा बंदरे गजबजणार आहेत; मात्र समुद्रातील वादळी वाऱ्यामुळे मासेमारी करण्यास समुद्रात न जाण्याचा इशारा मत्स्य विभागाने मच्छीमारांना दिला आहे. 

जिल्ह्यात १ जून ते ३१ जुलै या कालावधीत मासेमारी बंद होती. या बंदीच्या कालावधीत मासेमारी करणाऱ्या १३ मच्छीमारी नौकांवर मत्स्य विभागाने कठोर कारवाई केल्याचे समजते.

बंदीच्या काळात मच्छीमार सहकारी संस्थांच्या यांत्रिकी नौका मासेमारी करताना आढळल्यास योजनेचे लाभ दिले जाणार नाहीत. तसेच नौकेचा अपघात झाल्यास संबंधिताला नुकसानभरपाई मिळणार नाही, असेही सूचित केले होते. पावसाची उघडीप असल्याने आणि पोषक वातावरणामुळे जून महिन्यात जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात बेकायदेशीर मासेमारी सुरू होती. मत्स्य विभागाने त्यांच्यावर कारवाई करून बेकायदेशीर मासेमारीला लगाम घालण्याचा प्रयत्न केला. 

दोन हजार ५९८ नौका होत्या बंद 
रत्नागिरी जिल्ह्यामध्ये मिरकरवाडा हे सर्वांत मोठे बंदर आहे. जिल्हाभरात लहान आणि मध्यम स्वरूपाची अशी सुमारे ४० बंदरे आहेत.  या सर्व बंदरांमध्ये मासेमारी बंद ठेवण्यात आली होती. पावसाळ्यात मासेमारी नौका किनाऱ्यावर आणल्या होत्या, तर काही बंदरांत नौका सुरक्षित नांगरून ठेवल्या होत्या. जिल्ह्यात २ हजार ५९८ मासेमारी नौका आहेत. यामध्ये सर्वाधिक २ हजार ४५० नौका यांत्रिक असून उर्वरित २०० नौका बिगर यांत्रिक आहेत.

गुरुवारपासून (ता. १ ऑगस्ट) मासेमारीला सुरवात होणार आहे. मात्र, समुद्रातील वातावरण अनुकूल नाही. सोसाट्याचा वारा आणि समुद्राला उधाण असल्याने मासेमारीसाठी समुद्रात जाऊ नये, असा इशारा मच्छीमारांना दिला आहे.
- आनंद पालव, 

सहायक मत्स्य आयुक्त, रत्नागिरी

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: The ban on fishing removed from today