सिंधुदुर्ग : दोडामार्गावरील ५९ गावांमध्ये खाणकामाला मनाई

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 23 डिसेंबर 2018

मुंबई - राज्यातील वन्यजीवांचे अधिवास असलेल्या सिंधुदुर्ग जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात वृक्षतोड सुरू असल्याची चिंता व्यक्त करत, उच्च न्यायालयाने नुकतीच येथे वृक्षकटाईला मनाई केली आहे. यापाठोपाठ प्रशासन आणि वनखात्याने आता सिंधुदुर्ग-दोडामार्गावरील ५९ गावांमध्ये खाणकामाला मनाई केली आहे. 

मुंबई - राज्यातील वन्यजीवांचे अधिवास असलेल्या सिंधुदुर्ग जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात वृक्षतोड सुरू असल्याची चिंता व्यक्त करत, उच्च न्यायालयाने नुकतीच येथे वृक्षकटाईला मनाई केली आहे. यापाठोपाठ प्रशासन आणि वनखात्याने आता सिंधुदुर्ग-दोडामार्गावरील ५९ गावांमध्ये खाणकामाला मनाई केली आहे. 

राधानगरी वन्यजीव अभयारण्य कोल्हापूर ते कर्नाटकातील भीमगड अभयारण्याला जोडणारा सिंधुदुर्ग-दोडामार्ग वन्यजीवांसाठी महत्त्वाचा प्रभाग आहे. वन्यजीवांचा अधिवास असलेल्या या पट्‌ट्‌यातील प्राण्यांच्या सुरक्षेसाठी उच्च न्यायालयाच्या मुख्य न्या. नरेश पाटील आणि मकरंद कर्णिक यांच्या खंडपीठाने या ठिकाणी होत असलेल्या बेसुमार वृक्षतोड तत्काळ थांबविण्याचे आदेश दिले.

वनशक्ती या सामाजिक संस्थेने हा भाग पर्यावरण संवेदनशील प्रभाग म्हणून घोषित करण्यासाठी राज्य व केंद्र सरकारला आदेश द्यावेत, अशा मागणीची जनहित याचिका केली आहे. त्या याचिकेच्या सुनावणीदरम्यान, न्यायालयाने हे आदेश दिले. उच्च न्यायालयाने यापूर्वी दिलेल्या आदेशानुसार या प्रभागात ५० हजार हेक्‍टरवर वाळूउपसा आणि दगडफोडीला मनाई केली आहे; तसेच याबाबत नव्या परवानग्यांना मनाई केल्याचे सिंधुदुर्गचे जिल्हाधिकारी दिलीप पांढरपट्टे यांनी सांगितले. 

महाराष्ट्र गोवा सीमारेषेवरील ३८ किमीचा दक्षिण घाट पर्यावरण संवेदनशील नसल्याचे केंद्र सरकारने यापूर्वी जाहीर केले आहे. मात्र, नव्या मसुदा अधिसूचनेनुसार या पट्ट्यातील १९२ गावे पर्यावरण संवेदनशील प्रभागात येत असल्याचे नमूद केले आहे. सिंधुदुर्गातील ३७ ग्रामसभा घेऊन ५९ गावांत खाणकामाला मनाई करण्यात आली आहे. उच्च न्यायालयाच्या यापूर्वीच्या आदेशानुसार फक्त १३ गावांमध्ये मनाई करण्यात आली होती. परंतु आता संपूर्ण सिंधुदुर्ग जिल्हा पर्यावरण संवेदनशील म्हणून घोषित करण्यात आल्याने, सर्व ५९ गावांसाठी हा नियम लागू राहणार आहे.

पर्यावरण वाचणार
सिंधुदुर्गात प्रस्तावित सर्व खनिज प्रकल्प दोडामार्ग आणि सावंतवाडी तालुक्‍यात आहेत. या विरोधात मोठी आंदोलने झाली. मात्र खनिज लॉबीने केलेल्या मोर्चेबांधणीमुळे अगदी पश्‍चिम घाट अभ्यासासाठी नेमलेल्या कस्तुरीरंगन समिती अहवालातूनही दोडामार्ग तालुका वगळला गेला. मात्र स्टॅलिन दयानंद यांच्या वनशक्‍ती या संस्थेने उच्च न्यायालयात दाखल केलेल्या याचिकेमुळे पर्यावरण संरक्षणाच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण निर्णय झाला आहे. हे खनिज प्रकल्प झाले असते तर पश्‍चिम घाटातील सर्वाधिक संवेदनशील असलेल्या दोडामार्ग आणि सावंतवाडी तालुक्‍यातील सह्याद्रीच्या पट्ट्यामधील पर्यावरण धोक्‍यात येण्याची भीती होती. 

आंबोली ते मांगेली हा वाघाचा कॉरिडॉर असल्यामुळे तो इकोसेन्सिटिव्ह म्हणून जाहीर व्हावा, अशी आमची याचिका आहे. या भागातील पर्यावरण राखले जावे, यासाठी हा प्रयत्न आहे. हे होत असताना स्थानिकांचे दैनंदिन व्यवहार सुस्थितीत व सुरळीत राहावेत, अशी भूमिकाही मांडली आहे. यामुळे लोकांना कोणताच त्रास होणार नाही.
- स्टॅलिन दयानंद,
वनशक्‍ती संस्था

या भागातील जैवसंपन्नता

  •  वनस्पतीच्या प्रजाती - ३०३
  •  वृक्ष प्रजाती - १२७
  •  गवताच्या प्रजाती - १५
  •  बांबूच्या प्रजाती - ४
  •  वनऔषधींच्या प्रजाती - ९९
  •  पश्‍चिम घाटातील जैवसमृद्ध हॉटस्पॉटमध्ये दोडामार्ग, सावंतवाडीचा समावेश.
  •  भागात आढळणारे दुर्मिळ प्राणी ः शेकरू, बिबट्या, अस्वल, गवे, किंगकोबरा, हरणे, अनेक प्रकारचे पक्षी

 

Web Title: ban on Mining in 59 villages on Doda road