गोव्यात पकडलेल्या अमलीपदार्थांचे बांदा कनेक्‍शन ?

निलेश मोरजकर
मंगळवार, 5 नोव्हेंबर 2019

कळंगुटजवळ कारवाईत तब्बल तीन कोटी रुपयांचे अमलीपदार्थ जप्त करण्यात आले. यात एका नायजेरियन व्यक्तीला अटक करण्यात आली. याचा तपास करत असताना अमली पदार्थांचे कनेक्‍शन सीमा भागातील बांद्याशी असल्याची माहिती तपासातून पुढे आली.

बांदा ( सिंधुदुर्ग ) - चार दिवसांपूर्वी गोवा पोलिसांच्या अमलीपदार्थ विरोधी पथकाने  कांदोळी - कळंगुट (गोवा) येथे कारवाई करून तीन कोटींचे अमलीपदार्थ पकडले. याचे कनेक्‍शन बांद्यातील एका संशयिताशी असल्याची चर्चा आहे. गोव्यातील तपास यंत्रणेने त्यादिशेने तपास सुरू केल्याचेही समजते; मात्र स्थानिक पोलिस याबाबत अनभिज्ञ आहेत. 

कळंगुटजवळ कारवाईत तब्बल तीन कोटी रुपयांचे अमलीपदार्थ जप्त करण्यात आले. यात एका नायजेरियन व्यक्तीला अटक करण्यात आली. याचा तपास करत असताना अमली पदार्थांचे कनेक्‍शन सीमा भागातील बांद्याशी असल्याची माहिती तपासातून पुढे आली. उपलब्ध माहितीनुसार गोव्याच्या तपास यंत्रणेने त्यादिशेने गुप्तपणे तपासही केला आहे. 

बांदा हे गोवा सीमेलगत असल्याने ड्रग माफियांनी या भागात जाळे पसरल्याचा संशय आहे. गोवा स्वतंत्र राज्य असल्याने येथे सुरक्षा यंत्रणा जास्त संख्येने आहेत. तुलनेत सिंधुदुर्गात पोलिस यंत्रणेव्यतिरिक्त फारशी प्रभावी यंत्रणा नाही. यामुळे अमलीपदार्थ साठवणूक आणि वाहतुकीसाठी सिंधुदुर्गाच्या सीमा भागाचा वापर होत असल्याचा संशय याआधीच तपास यंत्रणांना होता. या प्रकरणामुळे त्याला बळकटी मिळाली आहे. त्या छाप्यातील मुख्य सुत्रधारांपैकी एकजण बांदा परिसरातील असल्याचा तपास यंत्रणेचा संशय आहे. येथूनच सर्व व्यवहार सुरू आहेत. 29 ऑक्‍टोबरला कलंगुटजवळ ही कारवाई झाली होती. 

सुत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार अमली पदार्थांचा मुख्य पुरवठादार बेळगाव (कर्नाटक) व पुणे येथील आहे. तेथून नियमित ठरलेल्या खासगी बसमधून या ड्रगचा साठा बांदा परिसरात पोहोचवला जातो. तेथून ठराविक एजंट मार्फत या ड्रगचा सिंधुदुर्ग व गोवा राज्यात पुरवठा करण्यात येतो.

आठवड्यातून तीन दिवस पुरवठा करण्यात येतो. कारवाई होऊ नये, यासाठी प्रत्येकवेळी आठवड्यातील दिवस हे आलटून-पालटून बदलण्यात येतात. बांदा-गोवा सीमेवरील एका सदनिकेतून संपूर्ण व्यवहार चालतो, अशी संबंधित यंत्रणेला माहिती मिळाल्याचे समजते. त्यादिशेने तपासही झाला आहे. 
गोवा पोलिसांचे पथक बांद्यात येऊन गुप्त पद्धतीने चौकशी करून गेले आहेत. बांदा पोलिस निरीक्षक अनिल जाधव यांना याबाबत विचारले असता आपल्याला माहिती नसल्याचे त्यांनी सांगितले. 

समुद्र किनाऱ्याची धूप थांबविण्यासाठी  हे तंत्र 

बांदा बनलंय सोयीचे ठिकाण 

गोवा पर्यटनाच्या जागतिक नकाशावर आहे. पर्यटन हंगामात गोव्यात 10 लाखांहून अधिक विदेशी पर्यटक येतात. यामध्ये नायजेरियन पर्यटकांची संख्या ही 40 टक्‍क्‍यांहून अधिक आहे. नायजेरियन पर्यटकांची ड्रगला मोठी मागणी असते. त्यामुळे येथून गोव्यात मोठ्या प्रमाणात ड्रगचा पुरवठा होतो. गोव्यात अमली पदार्थांची साठवणूक करणे जोखमीचे असल्याने त्यादृष्टीने व्यावसायिकांना बांदा हे सोयीचे व कमी धोका असलेले ठिकाण आहे. 

सुरक्षा यंत्रणेची करडी नजर 

ख्रिसमस व नवीन वर्षाच्या स्वागतासाठी गोव्यात मोठ्या प्रमाणात पार्ट्यांचे आयोजन होते. या पार्ट्यांमध्ये दारू बरोबरच अमलीपदार्थाना मोठी मागणी असते. कोकेन, चरस, गांजा, एमडीएमए, इन्फेटामाईन या अमलीपदार्थाना सर्वाधिक मागणी आहे. त्यासाठी येत्या महिन्याभरात ड्रगची मागणी ही कितीतरी अधिक पटीने वाढणार आहे. गोव्यातील तपास यंत्रणा सतर्क झाली असून सीमेवर लक्ष केंद्रित केले आहे.  

रस्ताकामाचे ठेके घेणारेच करतात आंदोलन; राष्ट्रवादीचा आरोप 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Banda connection of drug addicts in Goa