सरसकट पीककर्ज माफ करून सात-बारा कोरा करा

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 28 जून 2017

शेतकरी बागायतदार संघ - सावंतवाडी, दोडामार्गातील भरपाईची मागणी; आंदोलनाचाही इशारा

शेतकरी बागायतदार संघ - सावंतवाडी, दोडामार्गातील भरपाईची मागणी; आंदोलनाचाही इशारा
बांदा - शासनाने शेतकऱ्यांच्या ऐतिहासिक कर्जमाफीचा निर्णय घेतला आहे. हे शेतकऱ्यांच्या दृष्टीने चांगले आहे; मात्र केवळ दीड लाख रुपयेपर्यंतचे कर्ज माफ होणार असल्याने त्यावर असणाऱ्या शेतकऱ्यांच्या सात-बारावर बोजा तसाच राहणार आहे. तसेच मार्च २०१७ मध्ये शेतकऱ्यांकडून पीक कर्ज भरून घेण्यात आले आहे. यामुळे सावंतवाडी व दोडामार्ग तालुक्‍यातील सर्व शेतकऱ्यांवर लावण्यात आलेला थकबाकीदार हा शब्द वगळून ३० जून २०१७ पर्यंतच्या मुदतीत असणारी सरसकट येणे पीककर्ज माफ करून त्यांचा सातबारा कोरा करा व ज्या शेतकऱ्यांनी कर्जाची परतफेड केली त्यांना कर्जाची भरलेली रक्कम परत करा, अशी मागणी सावंतवाडी व दोडामार्ग शेतकरी बागायतदार संघाने पत्रकार परिषदेत केली.

सुकाणू समितीच्या निकषानुसार येथील शेतकऱ्यांनाही कर्जमाफी मिळायला हवी अन्यथा राज्यातील शेतकऱ्यांबरोबर आम्हीही आंदोलनात उतरू, असा इशाराही या पत्रकार परिषदेत देण्यात आला. शेतकऱ्यांच्या कर्जमाफीवरून अजूनही या दोन्ही तालुक्‍यातील शेतकरी द्विधा मनःस्थितीत आहेत.

शेतकऱ्यांना उद्‌भवलेल्या समस्या, चक्रीवादळाची नुकसानभरपाई, माकडताप समस्या या विषयांवर शासनाचे लक्ष वेधण्यासाठी येथे पत्रकार परिषदेचे आयोजन केले होते. या वेळी सावंतवाडी व दोडामार्ग शेतकरी फळबागायतदार संघाचे अध्यक्ष विलास सावंत, सचिव संजय देसाई, सल्लागार सुरेश गावडे आदी उपस्थित होते. सावंतवाडी व दोडामार्ग तालुक्‍यातील शेतकऱ्यांनी मार्च एंडिंगच्या रेट्यामुळे मार्च २०१७ मध्ये पीक कर्जाची परतफेड केली. केवळ दीड लाखाचे कर्जच माफ होणार असल्याने दीड लाखापेक्षा जास्त कर्ज असणाऱ्या शेतकऱ्यांचा सातबारावर बोजा तसाच राहणार असून तो कोरा न झाल्याने त्याला भविष्यात पीक कर्ज घेता येणार नाही. तसेच जून महिन्यात कर्जमाफीचा निर्णय झाल्याने जून २०१७ पर्यंतचे सर्व कर्ज माफ करण्यात यावे व सातबारा कोरा करावा, ज्या शेतकऱ्यांनी या महिन्यात कर्जाची रक्कम भरली असेल त्यांना ती परत देण्यात यावी, अशी मागणी या पत्रकार परिषदेत करण्यात आली.

सावंतवाडी तालुक्‍यात माकडतापाने धुमाकूळ घातला असून आतापर्यंत बारा बळी या माकडतापात गेले आहेत. त्यांना शासनातर्फे मदत जाहीर करण्यात आली. बळी गेलेल्या मृतांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी दोन लाख रुपये मदत देण्याचे पालकमंत्री दीपक केसरकर यांनी जाहीर केले होते. धनादेश तयार असल्याचेही सांगितले होते; मात्र अद्याप या कुटुंबीयांना ही मदत मिळाली नाही. त्यामुळे ही मदत तत्काळ मिळावी, अशी मागणी या संघाने केली. तालुक्‍यात माकडतापाची धास्ती एवढी आहे की बागायतींमध्ये काम करण्यास कामगारच मिळत नाही. त्यामुळे यावर्षी शेतकरी बागायतदारांचे कोट्यवधी रुपयांचे नुकसान झाले आहे. या शेतकरी बागायतदारांना नुकसानभरपाई देण्याची मागणीही केली. माकडताप रोगाच्या पार्श्वभूमीवर जोखीमग्रस्त भागातील शेतकरी बागायतदार व कामगार यांना प्रतिबंधात्मक लस देण्यासाठीची तजवीज आतापासूनच करा. ऐनवेळी संबंधित विभाग हात वर करत असल्याने ही लस मिळण्यासाठी शासनाने आतापासूनच प्रयत्न करावेत, अशी मागणीही संघाच्या वतीने करण्यात आली.

चक्रीवादळातील भरपाई मिळावी
गेल्या महिन्यात अवकाळी पावसाचा बसलेला तडाखा आणि झालेल्या चक्रीवादळामुळे मोठे नुकसान झाले आहे. या नुकसानीचा पंचनामाही करण्यात आला. या चक्रीवादळात ज्या घरांची हानी झाली होती, त्यांना तत्काळ मदत मिळावी यासाठी आम्ही पालकमंत्री दीपक केसरकर यांच्याकडे विनंती केली होती. त्या वेळी पालकमंत्र्यांनी आठ दिवसात मदत देण्याचे आश्वासन दिले होते; मात्र आता पावसाळा सुरू होऊनही पालकमंत्र्यांनी दिलेले आश्वासन पाळले नसल्याने संघाने नाराजी व्यक्त केली आहे. ज्या घरांची मोठी हानी झाली आहे त्यांनी पावसाळ्यात राहायचे कुठे हा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे. या नुकसानग्रस्तांना  तत्काळ शासकीय मदत मिळावी, अशी मागणीही करण्यात आली. तसेच आता भातशेतीबरोबरच बागायतदार नवीन लागवड करतात. या तालुक्‍यात वन्य प्राण्यांमुळे शेतीचे उत्पन्न मातीत मिळत आहे. यापासून झालेल्या नुकसानीचा पंचनामाही त्वरित करून त्याची भरपाई मिळण्यात यावी, अशीही मागणी सावंतवाडी व दोडामार्गशेतकरी  फळबागायतदार संघाने केली. 

Web Title: banda konkan news compulsory crop loan waiver 7/12 empty