बांदा-शिरोडा मार्ग धोकादायक 

निलेश मोरजकर | Wednesday, 21 October 2020

सार्वजनिक बांधकाम विभागाचे दुर्लक्ष झाल्यामुळेच मार्ग धोकादायक बनत असल्याने महामार्गाच्या दुरवस्थेबाबत मडुरा पंचक्रोशीतील नागरिक आक्रमक झाले आहेत. तत्काळ रस्त्याची डागडुजीचे काम हाती न घेतल्यास याच ठिकाणी आंदोलन करण्याचा इशाराही त्यांनी दिला आहे.

बांदा (सिंधुदुर्ग) - ग्रामीण भागाला मुंबई गोवा महामार्गाशी जोडणारा बांदा-शिरोडा मार्ग खड्डेमय बनला आहे. मडुरा, शेर्ले येथे पडलेले भलेमोठे खड्डे वाहनचालकांसह प्रवाशांसाठी धोकादायक ठरत आहेत. सार्वजनिक बांधकाम विभागाचे दुर्लक्ष झाल्यामुळेच मार्ग धोकादायक बनत असल्याने महामार्गाच्या दुरवस्थेबाबत मडुरा पंचक्रोशीतील नागरिक आक्रमक झाले आहेत. तत्काळ रस्त्याची डागडुजीचे काम हाती न घेतल्यास याच ठिकाणी आंदोलन करण्याचा इशाराही त्यांनी दिला आहे. 

गेल्या दोन वर्षांपासून बांदा ते मडुरा किंवा बांदा-शिरोडा या मार्गावर मोठमोठे खड्डे पडले आहेत. हे खड्डे टाळताना आजपर्यंत अनेक वाहनचालकांना अपघाताला सामोरे जावे लागले आहे. अनेकदा दोन वाहनांची समोरासमोर धडकही झाली आहे. मात्र अपघात होऊनही याकडे कोणा अधिकाऱ्याचे लक्ष जात नसल्याने सार्वजनिक बांधकाम विभागाला याचे काहीच सोयरसुतक लागत नाही का, असा सवाल मडुरा पंचक्रोशीतील नागरिकांमधून केला जात आहे. 

दहा दिवसांपूर्वी झालेल्या मुसळधार पावसाने महामार्गावरील खड्ड्यांचा आकार मोठा झाला आहे. पूर्ण रस्त्याची चाळण झाली असून ठिकठिकाणी महाकाय खड्डे अपघाताला निमंत्रण देत आहेत. अशा धोकादायक खड्ड्यांत अपघात झाल्यास जबाबदार कोण, असा सवाल ग्रामस्थ प्रतिक वालावलकर यांनी केला आहे. 

हनुमान मंदिराजवळील पूल धोकादायक 
बांदा-शिरोडा मार्गावरील हनुमान मंदिराजवळील पूल वाहतुकीस धोकादायक बनले आहे. पुलाची दगडी व मातीचा भराव कोसळल्याने अपघात घडण्याची तीव्र शक्‍यता आहे. मडुरा उपसरपंच विजय वालावलकर यांनी पुलाच्या दुरूस्तीबाबत मागणी करूनही अद्याप याकडे दुर्लक्ष होत असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे. 

संपादन - राहुल पाटील