चक्क बॅंकेचीच केली फसवणूक ; १४ लाखाचे नकली दागिने ठेवले गहाण

सकाळ वृत्तसेवा | Saturday, 14 November 2020

बॅंकेच्या व्यवस्थापिका सुनेत्रा दुर्गोली यांच्या खून प्रकरणातील संशयित असून तो सध्या कोठडीत आहे.

गुहागर : वेलदूरच्या विदर्भ कोकण ग्रामीण बॅंकेत सोन्याचे खोटे दागिने ठेवून नऊ जणांनी १४ लाख ६३ हजार ७०३ रुपयांची फसवणूक केली, अशी तक्रार व्यवस्थापक मकरंद पत्की यांनी गुहागर पोलिस ठाण्यात केली. या प्रकरणी गुन्हा दाखल असलेल्यांपैकी संजय फुणगूसकर हा या बॅंकेच्या व्यवस्थापिका सुनेत्रा दुर्गोली यांच्या खून प्रकरणातील संशयित असून तो सध्या कोठडीत आहे.

बॅंकेत सोने गहाण ठेवणाऱ्यांनी दिलेले बनावट सोन्याचे दागिने खरे असल्याचे फुणगूसकर याने मूल्यांकन केले. पत्की यांनी गुहागर पोलिस ठाण्यात नोंदलेल्या तक्रारीत म्हटले आहे की, मिलिंद मदन जाधव (रा. तरीबंदर), मनोहर महादेव घुमे (रा. असगोली), गणेश शंकर कोळथरकर (रा. नवानगर), श्रीमती सुलोचना दत्ताराम पावसकर (रा. नवानगर), शबीया उमरखान परबुलकर (रा. नवानगर), विक्रांत महादेव दाभोळकर (रा. वेलदूर), राजेश गोपीनाथ भोसले (रा. खालचापाट) आणि श्रीमती विनया वसंत दाभोळकर (रा. वेलदूर) या ८ जणांनी संजय श्रीधर फुणगूसकर (रा. नवानगर) यांच्याशी संगनमत करून सोन्याचे म्हणून खोटे दागिने वेलदूरच्या बॅंकेत गहाण ठेवले.

हेही वाचा - सावंतवाडीत अज्ञाताने जाळली अल्टो कार

संजय श्रीधर फुणगूसकर (रा. नवानगर) यांनी याबाबतचे खोटे मूल्यांकन दाखले तयार करून स्वत:च्या आर्थिक फायद्यासाठी नकली सोन्याचे दागिने हे खरे आहेत, असे भासवले. त्यामुळे ५ जुलै २०१९ ते १७ जुलै २०२० या मुदतीत विदर्भ कोकण ग्रामीण बॅंक शाखा वेलदूरचे १४ लाख ६३ हजार ७०३ रुपये १० पैसे इतके आर्थिक नुकसान झाले आहे. या ९ जणांनी बॅंकेची फसवणूक केलेली आहे. गुहागर पोलिसांनी सदरच्या तक्रारीवरून गुन्हा नोंदवून घेतला आहे. अधिक तपास सहायक पोलिस निरीक्षक जाधव करीत आहेत.

 

संपादन - स्नेहल कदम