'मनसे'चा दणका; 'बीओआय' नरमली

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 4 मे 2017

बॅंकेने मयूर पायरे यांचे झालेले नुकसान भरून दिले नाही, त्यांची जमीन व घर परत मिळवून दिले नाही, तर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने जिल्हाभरात उग्र आंदोलन छेडण्यात येईल.
- वैभव खेडेकर, मनसे नेते

खेड : बॅंक ऑफ इंडियाच्या अधिकाऱ्यांना धारेवर धरल्यानंतर त्यांनी उपोषणकर्ते पायरे यांच्यापर्यंत येऊन लेखी हमी दिली. त्यांच्या घराच्या लिलावाच्या प्रक्रियेची कागदपत्रे देण्यास कबूल केले. उद्यापर्यंत ती दिली नाही, तर बॅंक कारवाईस पात्र राहील, असेही सांगितले. त्यामुळे पायरे यांनी उपोषण सोडले.

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते व खेडचे नगराध्यक्ष वैभव खेडेकर, नगरसेवक भूषण चिखले, संभाजी देवकाते, नीलेश बामणे यांनी बॅंकेच्या अधिकाऱ्यांना धारेवर धरले. वरिष्ठ अधिकाऱ्यांशी फोनवरून वैभव खेडेकर यांनी थेट चर्चा केली. त्यानंतर बॅंकेची यंत्रणा तत्काळ जागी झाली. खवटीचे शाखाधिकारी रामधन उपोषणस्थळी आले. पाठोपाठ खेडचे शाखाधिकारीही आले. मयूर पायरे यांना ही कागदपत्रे उद्या सादर करण्यात येतील. सादर न केल्यास बॅंक व बॅंकेचे अधिकारी कारवाईस पात्र राहतील, अशा आशयाचे पत्र लिहून दिले व त्यानंतर पायरे यांनी उपोषण सोडले.

तालुक्‍यातील चिंचघर-प्रभूवाडी येथे राहणारे मयूर पायरे यांनी राष्ट्रीयकृत खवटी शाखेतून गृहकर्ज आणि काजू प्रक्रिया उद्योगासाठी कर्ज घेतले होते. त्या कर्जाचे हप्ते त्यांनी न चुकता भरले होते. सध्या ते मुंबईत नोकरी करतात. त्यांचे चिंचघर येथे सहा गुंठे जागेत तीन हजार स्क्वेअर फुटांचे घर होते. राष्ट्रीयकृत बॅंकेच्या खवटी शाखेने त्यांना व त्यांच्या जामिनदारांना कोणतीही पूर्वसूचना न देता त्यांचे घर परस्पर विकले. त्यातून त्यांच्या कर्जाची भरपाई करून घेतली. परंतु, या संदर्भात बॅंकेने कोणतीही पूर्वसूचना न देता घर विकलेच कसे, असा सवाल उपस्थित केला. मयूर पायरे व त्यांची पत्नी यांनी महाराष्ट्रदिनी उपोषण सुरू केले. कालही बॅंकेच्या अधिकाऱ्यांच्या सहीचे एक नाममात्र पत्र घेऊन खवटी शाखेचे शिपाई दळवी यांनी उपोषणस्थळी भेट दिली व उपोषण सोडण्याची विनंती केली होती.
 

Web Title: bank of india down after mns agitation