bapusaheb maharaj of sawantwadi institute malaria corona virus
bapusaheb maharaj of sawantwadi institute malaria corona virus

लढाई पुकारली आणि जिंकलीही; महाराजांनी नमविले होते महाभयानक रोगाला

सावंतवाडी - मलेरियाचे संकट आताच्या कोरोनाहूनही कदाचीत जास्त गंभीर होते. कारण विज्ञानाची, वैद्यकीय शास्त्राची फारशी साथ नव्हती. पण सावंतवाडी संस्थानचे तत्कालीन राजे पुण्यश्‍लोक बापूसाहेब महाराज यांनी मोठ्या निकराने मलेरियाविरूध्द लढा पुकारला आणि ही लढाई जिंकलीही. 


मलेरियाचा या भागात कहर सुरू होता तेव्हा संस्थानचे राजे बापूसाहेब महाराज पहिल्या महायुध्दावर गेले होते. 1919 मध्ये युध्द संपले आणि ते सावंतवाडीत परतले. राज्यातील आरोग्य आणिबाणी पाहून तेही हादरले. त्यांनी या तापाविरूध्द लढा निश्‍चित केला. यासाठी याचे नेमके निदान आणि नंतर प्रतिबंधात्मक उपाय शोधणे आवश्यक होते. यासाठी त्यांनी परदेशातून प्रसिध्द किटकतज्ञ डॉ. स्ट्रीकलंड यांना पाचारण केले. आताच्या बुर्डी पुलाजवळच्या विश्रामगृहावर त्यांचा मुक्काम होता. तेथेच तात्पुरती प्रयोगशाळा सुरू करून यावरील संशोधन सुरू झाले. त्यांनी रूग्णांचे रक्त तपासले. यात त्यांना मलेरीयाचे जंतू मिळाले. याचा उगम शोधण्यासाठी या भागातील अ‍ॅनाफेलीस डास पकडण्यात आले. याचे विच्छेदन करून संशोधन सुरू झाले. या डासांच्या तोंडातील ग्रंथींमध्ये मलेरियाचे जंतू शोधले जावू लागले. यासाठी सुक्ष्मदर्शक यंत्राखाली त्यांचे सहकारी पांगम हे डासांचे विच्छेदन करून त्याची स्केच काढायचे. बर्‍याच संशोधनानंतर अ‍ॅनाफेलिस क्युलिसिफेसीस डासामध्ये मलेरियाचे जंतू सापडले. त्यामुळे या तापाच्या निदानाबरोबरच मलेरिया होण्याची साखळी सापडली. 

यानंतर मलेरिया विरोधात खरी मोहीम सुरू झाली. यात बापूसाहेबांनी मलेरिया निर्मुलनासाठी वेगळे खाते निर्माण करून त्याचे प्रमुखपद डॉ. हळदणकर यांच्याकडे सोपवले. मलेरियाविरूध्दच्या लढाईसाठी अ‍ॅक्शन प्लान बनला. डास निर्मितीच्या जागा शोधून त्या नष्ट करण्यात आल्या. मोती तलावातील या डासांची उत्पत्ती थांबवण्यासाठी पाणीही सोडण्यात आले. पाण्यावर डासांची अळी आणि अंडी मारून टाकण्यासाठी विशिष्ट तेलाचा वापर सुरू झाला. मलेरिया पिडित भागात प्लासमोचीन गोळ्या देण्याची मोहीम आखण्यात आली. रूग्णांवर औषधोपचाराची व्यवस्था करण्यात आली.
 सावंतवाडी संस्थानची ही मलेरिया विरूध्दची मोहीम जागतिक स्तरावर कौतुकाचा विषय बनली. त्या काळात फोर्ड फाऊंडेशनचे डॉ. स्वीट आणि डॉ. कॉव्हेल हे ही मोहीम बघायला थेट अमेरिकेतून आले होते. त्यांनी या कामाचे कौतूक करत त्या काळात मलेरिया विभागाला आपल्या फाऊंडेशनतर्फे पैसे, उपकरणे, मलेरिया ऑफिसरला फिरण्यासाठी गाडी आदी मार्गाने मदत केली. बापूसाहेबांनी आपल्या कारकीर्दीत मलेरिया विरूध्द दिर्घ लढा दिला. ओस पडलेली गावे पुन्हा वसवण्यासाठी प्रयत्न केले.

पुढे दुसर्‍या महायुध्दाच्या काळात ब्रह्मदेशच्या आघाडीवर सैन्याला अशाच मलेरियाच्या साथीने जेरीस आणले होते. त्याकाळात डीडीटीचा शोध लागला. ब्रह्मदेशात डीडीटीचा फवारा विमानातून मारून मलेरिया आटोक्यात आणण्यात आला. या संशोधनाची माहिती सावंतवाडी संस्थानच्या तत्कालीन राणीसाहेबांना मिळाली. त्यांनी डीडीटी आपल्या राज्याच उपलब्ध केली. त्याच्या फवारणीसाठी उपकरणे आणली. याचा वापर 1945 च्या दरम्यान सावंतवाडीत व्यापक प्रमाणात करण्यात आला. यानंतर मलेरियाच्या साथीचा खर्‍या अर्थाने अंत झाला. यामुळे हळूहळू माणगाव खोर्‍यासह अनेक ओस पडलेली गावे पुन्हा वसली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com