उमेदवारीसाठी लायक असल्याचे दाखवण्याचा आटापिटा

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 25 जानेवारी 2017

सारे पक्ष बंडाळीमुक्त; सेनेकडून समीकरणांची जुळवाजुळव; उमेदवारांचा संपर्क सुरू

गुहागर - जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकांसाठी उमेदवार कोणत्याही क्षणी जाहीर होतील. इच्छुक उमेदवारांनी त्याआधीच मतदारांशी संपर्क सुरू केला आहे. उमेदवारीसाठी पक्षात आपणच किती लायक उमेदवार आहोत हे दाखवून देण्याचा प्रयत्न सुरू आहेत. उमेदवारी जाहीर करताना समर्थकांचे बळ पाहून तिकीट मिळावे यासाठी संपर्क दौऱ्यात पक्षाची निशाणी पोचवतानाच समर्थकांची मोट बांधण्याचा प्रयत्नही उमेदवार करीत आहेत.

आचारसंहिता सुरू झाल्याने आता विकासकामांचे कार्यक्रम थांबून पक्षप्रवेशाच्या जाहीर कार्यक्रमांना सुरवात झाली आहे. गुहागर तालुक्‍यावर वर्चस्व असलेला राष्ट्रवादी काँग्रेस, कार्यकर्त्यांच्या उत्साहातून पुढे सरकत असलेला भाजप आणि दोन गटातील दुरावा संपवून निवडणुकीच्या तयारीला लागलेली शिवसेना विविध प्रकारांच्या समीकरणांची जुळवाजुळव करीत आहेत.

गुहागर तालुक्‍यात काँग्रेसचे पारंपरिक मतदार आहेत. थोडे बहुत कार्यकर्तेही आहेत; पण त्यांना आधार देणारा नेता नाही. राष्ट्रवादीबरोबर आघाडी करायची की नाही याचा फैसलादेखील स्थानिकांच्या हातात नाही. आघाडी झाली तर पदरात पडतील त्या जागा जिंकून आणण्यासाठी मेहनत घ्यायची. स्वतंत्रपणे लढायचे ठरले तर वरिष्ठ देतील त्या उमेदवाराचा प्रचार करायचा अशी सध्याची काँग्रेसची भूमिका दिसते.

अनंत गीते यांनी गुहागर तालुक्‍यात युती झाली, तर सत्तेचा वनवास संपेल असे जाहीर केले. त्यामुळे शिवसैनिकांचे लक्ष महापालिकांसाठी युती होते वा नाही यावर आहे. युती झाली तर जिल्हा परिषद, पंचायत समितीतही त्याचा कित्ता गिरवला जाईल. भाजप स्वबळावर शतप्रतिशत जागा जिंकण्याच्या तयारीला लागला आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने आमदार भास्कर जाधव यांच्या नेतृत्वाखाली पक्षाच्या प्रचाराला सुरवात केली आहे. सध्यातरी स्वतंत्रपणे लढण्याचाच राष्ट्रवादीचा विचार दिसतो. वरिष्ठ पातळीवर आघाडी संदर्भातील बोलणी यशस्वी झाली, तर गुहागर विधानसभा मतदारसंघातील कोणते गट, गण काँग्रेसला द्यायचे याचा निर्णय राष्ट्रवादीतर्फे भास्कर जाधवच करतील.

पालपेणे, कोतळूक, अंजनवेल, पडवे गणात महिला आरक्षण असून तेथे सारे पक्ष उमेदवार शोधत आहेत. अंतर्गत बंडाळीची फारशी चर्चा कोणत्याही पक्षात नाही. दुसऱ्या पक्षाचा उमेदवार कोण याकडे सारे पक्ष लक्ष ठेवून आहेत. तोवर स्वतःचा उमेदवार जाहीर करणे लांबणीवर टाकले जात आहे.

गुहागर : गुहागर पंचायत समिती आरक्षण
पालपेणे    सर्वसाधारण महिला
अंजनवेल    नागरिकांचा मागास प्रवर्ग स्त्री
पाटपन्हाळे    नागरिकांचा मागास प्रवर्ग
पालशेत    सर्वसाधारण
कोतळूक    सर्वसाधारण स्त्री
वेळणेश्‍वर    सर्वसाधारण
पडवे    सर्वसाधारण महिला
खोडदे    सर्वसाधारण

जिल्हा परिषद आरक्षण
अंजनवेल    सर्वसाधारण
पालशेत    सर्वसाधारण
वेळणेश्‍वर    नामाप्र
पडवे    सर्वसाधारण

Web Title: To be able to show that candidature