esakal | सावधान ! "कॉंगो फिव्हर'  जनावरांमधील आजार माणसात फैलावण्याची भीती
sakal

बोलून बातमी शोधा

Be Careful Fear Of Spreading Congo fever Animal Disease To Humans

पशुधन विभागाने केलेल्या आवाहनात कॉंगो हा झुन्यास्टिक स्वरूपाचा जनावरांपासून मानवात होणारा रोग असून या रोगाचा प्रादुर्भाव दक्षिण आफ्रिका, कांगो, हंगेरी, चीन, इराण या देशात झाला आहे. हा विषाणू हायलोमा या जातिच्या गोचडीद्वारे एका जनावरापासून दुसऱ्या जनावरात व बाधित जनावरापासून मानवांमध्ये संक्रमित होतात.

सावधान ! "कॉंगो फिव्हर'  जनावरांमधील आजार माणसात फैलावण्याची भीती

sakal_logo
By
सकाळवृत्तसेवा

सावंतवाडी ( सिंधुदुर्ग ) - जनावरांतील कॉंगो फिव्हर हा एक इंडिमिक रोग असून तो जनावरांतील गोचिडमार्फत मनुष्यातही संक्रमित होतो. या विषाणूजन्य आजाराचे गुजरात व राजस्थानमध्ये काही रुग्ण सापडले आहेत. जिल्ह्यात जनावरांमध्ये लक्षणे आढळल्यास त्याची माहिती पशुसंवर्धन विभागाला देण्याचे आवाहन केले आहे. जिल्ह्यातील सावंतवाडी व वेंगुर्ले तालुक्‍यात अलीकडेच देवी सदृश्‍य लम्पिस स्किन डिसिस या आजारानेही बाधीत जनावरे आढळली असून त्यांच्यावर यशस्वी उपचार पशुसंवर्धन विभागाकडून केले आहेत. 

पशुधन विभागाने केलेल्या आवाहनात कॉंगो हा झुन्यास्टिक स्वरूपाचा जनावरांपासून मानवात होणारा रोग असून या रोगाचा प्रादुर्भाव दक्षिण आफ्रिका, कांगो, हंगेरी, चीन, इराण या देशात झाला आहे. हा विषाणू हायलोमा या जातिच्या गोचडीद्वारे एका जनावरापासून दुसऱ्या जनावरात व बाधित जनावरापासून मानवांमध्ये संक्रमित होतात. या रोगामुळे गाय, म्हैस, शेळ्या, मेंढ्या सारख्या पाळीव जनावरांमध्ये या रोगाची लक्षणे सहसा दिसून येत नाहीत. त्यामुळे बाधित जनावरे व पक्षी विषाणूचे वाहक म्हणून कार्य करतात. अशा जनावरांच्या संपर्कामध्ये आलेल्या मानवांना प्रादुर्भाव होण्याची दाट शक्‍यता असते.

या रोगाचा प्रादुर्भाव मानवामध्ये अत्यंत घातक असल्याचे दिसून आले आहे. ताप डोकेदुखी, अंगदुखी, पोटदुखी, उलटी, डोळे लाल होणे, त्वचेखाली रक्तस्त्राव, कावीळसारखी लक्षणे दिसून येतात. गुजरातमध्ये काही ठिकाणी याचा प्रादुर्भाव झाला असल्याने राज्यात याचा प्रादुर्भाव होण्याची शक्‍यता नाकारता येत नाही. यासाठी जनावरावरील गोचीड यांचे निर्मूलन गोचीडनाशक, औषधांची फवारणी करून घेणे आवश्‍यक आहे.

गोचीड बाधित जनावरावरील गोचीड हाताने काढणे, हाताने मारणे टाळावे, असे आवाहन पशुसंवर्धन विभागामार्फत केले आहे. सावंतवाडी, वेंगुर्ले तालुक्‍यात पशुधनावर देवी सदृश आजाराची (लम्पिस स्किन डिसिस) लागण झाल्याचे प्रकार 15 दिवसांपूर्वी समोर आले होते. गुजरातमधून गडचिरोली व नंतर सिंधुदुर्गात या आजाराची लागण लागल्याचे पशुसंवर्धन विभागाकडून सांगण्यात येते. 
सध्या या आजाराचा प्रभाव विदर्भ-मराठवाड्यात मोठ्या प्रमाणात आहे. सावंतवाडी तालुक्‍यात मळगाव, नेमळे, तळवडे तर वेंगुर्ले तालुक्‍यातील पेंडुर, होडावडे परिसरात गुरांना या आजाराची लागण झाली होती. प्रतिबंधात्मक लस व नियमित औषोधोपचार केल्यानंतर सात दिवसात या आजाराचा प्रभाव कमी होतो. हा संसर्गजन्य आजार डास, बोचिड, माशी आदींच्या प्रादुर्भावामुळे होतो. या आजाराची लागण झाल्यानंतर गुरांच्या त्वचेवर फोड येऊन ताप, गळ्याच्या त्वचा व पायांना सूज येते. पशुसंवर्धन विभागाकडून देण्यात येणाऱ्या अँटिबायोटिक औषधे व ताप कमी होण्याच्या गोळ्या दिल्यानंतर हा आजार पूर्णतः बरा होतो असे मत पशुसंवर्धन विभागाच्या अधिकाऱ्यांनी व्यक्त केले. ज्या ठिकाणी या आजाराची जनावरे सापडली त्यांच्यावर यशस्वीरित्या उपचार करण्यात आल्याची माहिती पशुसंवर्धन विभागाचे जिल्हा पशुसंवर्धन विकास अधिकारी डॉ. दिलीप शिंपी यांनी सांगितले. 


"" देवीसदृश्‍य लम्पिस स्किन डिसिस या आजाराबाबत शेतकऱ्यांनी घाबरून न जाता गुरांना या आजाराची लागण झाल्यास तात्काळ पशुसंवर्धन विभागाशी संपर्क साधावा. गुरांना काही दिवस गोठ्यातच बंदिस्त ठेवावे.'' 
- डॉ. सचिन धारवडकर, पशुधन विकास अधिकारी 


"" सर्वांनी कॉंगो हा रोग कसा होतो?, कसा पसरतो?, याची अचूक व तंतोतंत माहिती जमवणे, जाणून घेणे, समजावून घेणे गरजेचे आहे. ही माहिती वेळोवेळी प्रदान करणे आवश्‍यक आहे. आपआपल्या वाडी, गाव, ग्रुप ग्रामपंचायत येथे जनजागृती करणे ही काळाची गरज आहे. '' 
- विद्यानंद देसाई, पशुधन विकास अधिकारी, वेंगुर्ले 

 

असे करा गोचिड नियंत्रण 
गोचिड निर्मूलन, नियंत्रण हा महत्वाचा भाग आहे. त्यासाठी मेटारिझियम या बुरशीचा वापर करू शकतो. ह्यामुळे गोचीड मरत नाही पण गोचिडातील अंडीचा जीवनक्रम केव्हाही मोडू शकतात. सोयाबीन तेलाऐवजी इतर कोणत्याही खाण्याच्या तेलाचा वापर केल्यास सुद्धा गोचिड नियंत्रण होते.