सिंधुदुर्ग : पावसाळ्यापूर्वी आरोग्य यंत्रणा अलर्ट

साथरोग नियंत्रणासाठी विभागाकडून सज्जता
doctor
doctorsakal media

सिंधुदुर्गनगरी: पावसाळ्यात उद्भवणाऱ्या विविध साथ रोगांच्या पार्श्वभूमीवर आरोग्य विभाग सतर्क झाला आहे. साथरोगांवर नियंत्रण मिळविण्यासाठी सर्व तयारीनिशी सज्ज ठेवण्यात आली आहे. आरोग्य अधिकारी, कर्मचाऱ्यांचे प्रशिक्षण पूर्ण करून आवश्यक औषधसाठा उपलब्ध करून ठेवला आहे. जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. महेश खलिपे यांनी आज पत्रकार परिषदेत ही माहिती दिली.

जून ते ऑक्टोबर या कालावधीत जिल्ह्यात लेप्टोस्पायरोसिस, डेंगी, हिवताप यासारख्या साथरोगांचा फैलाव होण्याची शक्यता असते. यासाठी जिल्हा परिषद आरोग्य विभाग, जिल्हा हिवताप विभाग साथ रोगांवर नियंत्रण ठेवण्यासाठी पूर्ण तयारीनिशी सज्ज झाला आहे. पावसाळ्यात साथ रोगाच्या कालावधीत सर्व आरोग्य कर्मचारी, आशा कर्मचाऱ्यांना आपल्या मुख्यालयाच्या ठिकाणी पूर्णवेळ उपलब्ध राहण्याबाबत सक्त सूचना देण्यात आल्या आहेत. तसेच सर्व समुदाय आरोग्य अधिकाऱ्यांसह आरोग्य कर्मचारी, आशा स्वयंसेविका यांचे साथ रोगाबाबतचे प्रशिक्षण पूर्ण करण्यात आले आहे. दैनंदिन सर्वेक्षण, गृहभेटी आणि साथ रोगाबाबतची जनजागृती याबाबतचे नियोजन करण्यात आले आहे, अशी माहिती डॉ. खलिपे यांनी दिली. यावेळी जिल्हा लसीकरण अधिकारी डॉ. संदेश कांबळे, जिल्हा हिवताप अधिकारी डॉ. रमेश कर्तस्कर उपस्थित होते.

डॉ. खलिपे पुढे म्हणाले, "पावसाळी कालावधीत लेप्टोस्पायरोसिस, डेंग्यू, हिवताप यासारख्या साथरोगाचा फैलाव होतो. यावर नियंत्रण ठेवण्यासाठी आवश्यक ती खबरदारी घेण्यात येत आहे. जिल्ह्यातील प्राथमिक आरोग्य केंद्र स्तरावर मुबलक प्रमाणात औषध साठा उपलब्ध करून ठेवण्यात आला आहे. जिल्ह्यात गेल्या तीन वर्षांत विविध साथीच्या आजाराचे रुग्ण सापडले, अशी जिल्ह्यातील २११ गावे साथरोगासाठी जोखीमग्रस्त म्हणून जाहीर करण्यात आली आहेत. या गावांवर विशेष लक्ष केंद्रित केले जाणार आहे.

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील हत्तीरोग रुग्णांचा शोध घेण्यासाठी जानेवारीपासून १०५६ रक्त नमुने तपासण्यात आले. त्यामध्ये एकही हत्तीरोग पॉझिटिव्ह रुग्ण सापडलेला नाही. गेल्या सात ते आठ वर्षांत हत्तीरोगाचा एकही नव्याने रुग्ण सापडलेला नाही. त्यामुळे जिल्हा हत्तीरोग मुक्तीच्या दिशेने वाटचाल करीत असून, ही सर्वांसाठी समाधानकारक बाब आहे.

-डॉ रमेश कर्तस्कर, जिल्हा हिवताप अधिकारी.

जिल्ह्यात दूषित पाण्याच्या स्रोतांचा शोध घेण्यासाठी मे अखेर पावसाळ्यापूर्वी पाण्याचे सर्वेक्षण करण्यात येणार आहे. या सर्वेक्षणानुसार लाल, पिवळा व हिरव्या रंगाचे कार्ड देऊन प्रत्येक गावाची वर्गवारी होणार आहे. लाल कार्डधारक, जोखिमग्रस्त असे सद्यस्थितीत एकही गाव नाही; मात्र खबरदारीचा उपाय म्हणून हे सर्वेक्षण होईल. त्यासाठी ग्रामपंचायतींना उत्तम दर्जाच्या ‘टीसीएल’चा साठा ठेवण्याच्या सूचना केल्या आहेत.

डॉ. महेश खलिपे, जिल्हा आरोग्य अधिकारी

४० हजार व्यक्ती जोखीमग्रस्त

ज्या व्यक्ती शेतीमध्ये, पाण्यामध्ये, बांधकाम क्षेत्रात काम करतात, अशा सुमारे जिल्ह्यातील ४० हजार व्यक्तींची जोखीमग्रस्त व्यक्ती म्हणून नोंद केली आहे. अशा सर्व व्यक्तींना आशा कर्मचाऱ्यांमार्फत साथरोग प्रतिबंधक डॉक्झिसायक्लीन गोळ्यांचा डोस देण्यात येणार आहे. तसेच जिल्ह्यातील साथरोगाबाबत नियंत्रण ठेवण्यासाठी जिल्हास्तरावर २४ तास संपर्क कक्ष सुरू ठेवण्यात येणार आहे.

‘शीघ्रमदत’ आरोग्य पथके

साथ रोगाचे निदान करण्यासाठी सर्व प्राथमिक आरोग्य केंद्राना ‘लेप्टो टेस्टकिट’ पुरविण्यात आली आहे. कोणत्याही गावात साथरोग उद्भवल्यास आरोग्य सेवा देता यावी, यासाठी आरोग्य केंद्र स्तरावर ‘शीघ्रमदत’ आरोग्य पथके स्थापन केली आहेत. तसेच एखाद्या रुग्णाचा साथीच्या आजाराने मृत्यू झाल्यास रोगाचे योग्य निदान करण्यासाठी जिल्हास्तरावर जिल्हा शल्यचिकित्सकांच्या अध्यक्षतेखाली सर्वेक्षण कमिटी स्थापन करण्यात आली आहे.’’

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com