मसाल्याच्या बेगमीला दरवाढीची फोडणी 

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 26 एप्रिल 2017

मिरचीचे दर गतवर्षी यावर्षी 
संकेश्‍वरी -- 170 -- 230 
बेडगी -- 170 --220 
काश्‍मिरी -- 170 -- 220 
पांडी -- 150 -- 160. 

कणकवली - पावसाळ्यातील गरम मसाल्याची बेगमी म्हणून गावठी आणि घाटी मिरची कुटून उत्कृष्ट, तिखट व रुचकर मसाले करण्याच्या तयारीला जिल्ह्यात सध्या वेग आला आहे. यात यंदा मिरचीच्या दरात सरासरी 30 ते 50 रुपयांची, तर मसाल्यामध्ये रुची निर्माण करणाऱ्या पदार्थांमध्येही सरासरी दहा टक्‍के वाढ झाली आहे. 

उन्हाळा आला, की गृहिणी वर्षभर पुरेल इतका मसाला बनवण्याच्या कामाला लागतात. हल्ली बाजारात मसाल्यासह सर्व वस्तू आयत्या मिळत असल्या तरी अनेक घरांत आजही कुटुंबाच्या पारंपरिक पद्धतीनुसार मसाला तयार करण्यात येतो. त्यासाठी कर्नाटक, आंध्रप्रदेश, मध्यप्रदेश भागांतील विविध जातींच्या लाल मिरच्या बाजारात दाखल झाल्या आहेत. या मिरच्यांचे दर किलोमागे 30 ते 50 रुपये वाढल्याने महिलावर्गाला मसाल्याचे बजेटदेखील वाढवावे लागले आहे. यंदा घाऊक बाजारातील उत्तम मिरचीचे दर 200 ते 300 रुपये किलोवर पोचले आहेत. गतवर्षी हेच दर 150 ते 200 रुपयांच्या आसपास होते. 

उत्तम दर्जाच्या मसाल्यासाठी जिल्ह्यात कर्नाटकमधून बेडगी, काश्‍मिरी या मिरचींची आवक होते, तर आंध्रप्रदेशमधून रेशमपट्टी, पांडी, बेडगी, लवंगी, मध्यप्रदेशातून गुंटूर आणि महाराष्ट्रातून पांडी जातीच्या मिरच्या आठवडा बाजारामध्ये दाखल होत आहेत. यात जिल्ह्यातील महिलावर्गाकडून संकेश्‍वरी, काश्‍मीर आणि बेडगी जातींच्या मिरच्यांना अधिक मागणी आहे, तर परप्रांतांमधून कामधंद्यासाठी आलेल्या नागरिकांकडून इतर जातींच्या मिरच्यांना मागणी आहे. 

चांगल्या दर्जाच्या मिरचीबरोबरच मसाला तयार करण्यासाठी लागणाऱ्या इतर साहित्याच्या दरातही सरासरी दहा टक्‍के वाढ झाली आहे. त्यांत धणे, जायफळ, खसखस, काळी मिरी, जिरे, लवंग, हळद, जायपत्री, रामपत्री, दालचिनी, शायजिरे, मसाला वेलची, तमालपत्री, दगड फूल, सफेद मिरी या पदार्थांचा समावेश आहे. आठवडा बाजारामध्ये गडहिंग्लज, कोल्हापूर, बेळगाव येथील व्यापाऱ्यांनी या मसाला जिन्नसांची दुकाने थाटली आहेत. 

Web Title: begami chilli