
जिल्ह्यात 71.12 टक्के मतदान; 71, 760 जणांनी बजावला हक्क
ओरोस (सिंधुदुर्ग): जिल्ह्यातील 66 ग्रामपंचायतच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी काल (ता.15) मतदान प्रक्रीया झाली. यावेळी 1 लाख 906 मतदारांपैकी 71 हजार 760 जणांनी मतदान केले. 71.12 टक्के एवढे मतदान झाले. जिल्ह्यात चुरशीने मतदान झाले असले तरी सर्वाधिक ग्रामपंचायती असलेल्या देवगड तालुक्यात त्या तुलनेत मतदान झालेले नाही. देवगड तालुक्यात 21 ग्रामपंचायती असून 68.70 टक्के मतदान झाले आहे. राजकीय विश्लेषकांच्या मते, याच तालुक्यातील निकालावर जिल्ह्यातील ग्रामपंचायतींवर भाजपचे कमळ फुलणार, की शिवसेनेचा भगवा फडकणार, हे ठरणार आहे.
जिल्ह्यातील 70 ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुका 15 रोजी जाहीर झाल्या होत्या. यातील चार ग्रामपंचायती बिनविरोध झाल्याने प्रत्यक्ष मतदान प्रक्रियेसाठी 66 ग्रामपंचायती शिल्लक होत्या. 70 ग्रामपंचायतींच्या एकूण 600 सदस्यांपैकी 106 सदस्य बिनविरोध झाल्याने 494 सदस्य पदांसाठी प्रत्यक्ष मतदान प्रक्रिया पार पडली. एकूण 226 प्रभागांसाठी 207 मतदान केंद्रावर मतदान प्रक्रीया पार पडली. एकूण 50 हजार 690 स्त्री मतदारांपैकी 34 हजार 824 मतदारांनी मतदान केले तर 50 हजार 216 पुरुष मतदारांपैकी 36 हजार 936 मतदारांनी मतदान केले आहे.
वैभववाडीत महिलांची टक्केवारी जास्त
देवगड पाठोपाठ वैभववाडी तालुक्यात सर्वाधिक 12 ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी मतदान प्रक्रिया पार पडली. यासाठी एकूण 11 हजार 732 मतदार होते. यातील 8 हजार 140 मतदारांनी 68.70 टक्के एवढे मतदान केले. यामध्ये 4 हजार 11 पुरुष मतदारांनी मतदान केले तर 4 हजार 129 महिला मतदारांनी मतदान केले आहे. पुरुषांपेक्षा 118 महिला मतदारांनी जास्त मतदान केले आहे. अन्य सात तालुक्यात पुरुष मतदार मतदान टक्केवारी जास्त आहेत.
कणकवलीत सर्वाधिक मतदान
कणकवली तालुक्यात एकूण तीन ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुका होत्या. यातील एका ग्रामपंचायतीची निवडणूक बिनविरोध झाली. केवळ दोन ग्रामपंचायतींसाठी मतदान झाले. यासाठी एकूण 2 हजार 107 मतदार होते. यातील 1 हजार 650 एवढे मतदान झाले आहे. 78.31 टक्के एकूण मतदान झाले असून जिल्ह्यात सर्वाधिक मतदान कणकवली तालुक्यात झाले आहे.
दोडामार्गात सर्वांत कमी
जिल्ह्यात सर्वात कमी मतदान दोडामार्ग तालुक्यात 68.31 टक्के झाले आहे. देवगड 68.70 टक्के, मालवण 69.02 टक्के, वैभववाडी 69.38 टक्के, कुडाळ 71.44 टक्के, सावंतवाडी 73.79 टक्के, वेंगुर्ले 74.69 टक्के, कणकवली 78.31 टक्के अशाप्रकारे मतदान झाले आहे.
तालुक्यातील मतदानावर एक नजर
तालुका मतदान होणाऱ्या ग्रा. पं. एकूण अंतिम टक्केवारी
सावंतवाडी 11 22986 73.79
दोडामार्ग 3 2250 68.31
वेंगुर्ला 2 2519 74.59
कुडाळ 9 9198 7 1.44
संपादन- अर्चना बनगे