खारे पाणी शिरल्याने मंडणगड तालुक्यात शेकडो एकर नापिक होण्याचा धोका

सचिन माळी
गुरुवार, 19 जुलै 2018

मंडणगड - तालुक्यातील उंबरशेत, पेवे येथील सावित्री खाडी लगतच्या शेकडो एकर जमीनीत खारे पाणी शेतात शिरले आहे. त्यामुळे ही जमीन नापिक होण्याचा धोका आहे.

मंडणगड - तालुक्यातील उंबरशेत, पेवे येथील सावित्री खाडी लगतच्या शेकडो एकर जमीनीत खारे पाणी शेतात शिरले आहे. त्यामुळे ही जमीन नापिक होण्याचा धोका आहे. भरतीचे पाणी अडविण्यासाठी आवश्यक असणारा प्रतिबंधक बांध पूर्णपणे निकामी झाल्याने खारे पाणी शेतात घुसले. हमखास उपन्न देणारी शेते नापिक झाल्याने शेतकऱ्यांवर संकट कोसळले आहे. वेळीच धूपप्रतिबंधक बंधारा व्हावा, अशी मागणी येथील ग्रामस्थ करीत आहेत.

खाडीलगत असणार्‍या शेकडो एकर शेतीवर उंबरशेत गावाची उपजीविका अवलंबून आहे. पाणथळ क्षेत्र असल्याने येथील शेतकरी भात, पावटा, मुळा, उडीद, तूर अशी बारमाही उत्पादने घेत असे. मात्र मागील काही वर्षांपासून खाडीचे पाणी अडवणार्‍या बांधाला अनेक ठिकाणी भगदाड पडल्याने खारे पाणी या शेतात घुसले. त्यामुळे या ठिकाणची जमीन नापिक बनत चालली. उत्पादन घटले, शेती ओसाड पडू लागली. त्यातच जंगली श्वापदांचा त्रास होऊ लागला. यामुळे बळीराजा मेटाकुटीला आला आहे.

नापिक क्षेत्र दिवसेंदिवस वाढत असून उर्वरित शेतीही त्याला बळी पडणार आहे. यावर उपाययोजना म्हणून पेवे-उंबरशेत धूपप्रतिबंधक बंधारा अत्यावश्यक बनला आहे. खारभूमी विकास विभाग याकडे लक्ष देईल का असा प्रश्न शेतकर्‍यांना पडला आहे.

पावसात शेती पाण्याखाली

खाडी, ओढ्याचे पाणी कोंडगाव, पणदेरी, पेवेकोंड, पडवे या परिसरात घुसत असल्याने येथील शेतीलाही याचा फटका बसला आहे. मुसळधार पावसात शेती पाण्याखाली जात असल्याने पीक कुजते.

पेवे उंबरशेत खारभूमी धूपप्रतिबंधक बंधारा व्हावा यासाठी खारभूमी विकास विभागाकडे पत्रव्यवहार करण्यात आला आहे. त्यासंदर्भातले कार्यवाहीचे पत्र खासदार अनंत गीते यांनी संबंधित विभागाला दिले आहे.

- विश्वनाथ टक्के, युवासेना विभाग अधिकारी

 

Web Title: Belgaum News barren land issue in Mandangad Taluka