बाबूराव धुरींचे आंदोलन कोणासाठी? - गवस

बाबूराव धुरींचे आंदोलन कोणासाठी? - गवस

दोडामार्ग - आमदार नीतेश राणे आणि त्यांच्या कार्यकर्त्यांनी केलेले चिखलफेक आंदोलन जनतेसाठी होते; मग शिवसेनेचे तालुकाप्रमुख बाबूराव धुरी यांनी तहसील कार्यालयातील अंदाधुंद कारभारा विरोधात उचललेले पाऊल कोणासाठी होते, असा सवाल युवा सेनेचे तालुका उपप्रमुख भगवान गवस यांनी समर्थन करणाऱ्या तालुकावासियांना विचारला आहे. 

श्री. गवस यांच्या म्हणण्यानुसार - दोडामार्ग तहसीलमध्ये जनतेची कामे होत नाहीत, लोकांना एका कामासाठी अनेकदा खेटे घालावे लागतात, अधिकारी सर्वसामान्यांना जुमानत नाहीत, कुडासेत लोक महसूलच्या विरोधात उपोषणास बसलेले असताना त्यांना महसूलकडून उत्तर दिले जात नाही. म्हणून श्री. धुरी यांनी नायब तहसीलदारांना जाब विचारला होता.

त्यावेळी श्री.धुरी आणि त्यांच्यासोबत असलेल्या बबलू पांगम यांच्या विरोधात सरकारी कामात अडथळा आणि धक्काबुक्कीचा खोटा गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्याची ना व्हिडिओ क्‍लिप होती, ना सीसीटीव्ही फुटेज, तरीही त्यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल झाला होता आणि श्री. धुरी यांना तत्काळ अटक करा म्हणून स्वाभिमान आणि भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी पोलिस ठाण्यात जात सर्वपक्षीय आंदोलनाचा इशाराही पोलिस निरीक्षक राजेंद्र सावंत्रे यांना दिला होता.

त्यावेळी श्री.धुरी यांना तत्काळ अटक करा अशी मागणी करणारे; मात्र आज आमदार राणे आणि कार्यकर्त्यांचे समर्थन करताहेत. तालुक्‍यातील राजकीय पदाधिकाऱ्यांची ही भूमिका तालुक्‍यातील जनतेने समजून घेण्याची आणि आपल्यासाठी कोण अंगावर गुन्हे घेतो आणि कोण त्या गुन्ह्यांचे राजकारण करतो हे समजून घेण्याची गरज आहे.

दरम्यान, चिखलफेक आंदोलनानंतर दोडामार्गमध्ये एका त्रस्त नागरिकाच्या वतीने येथील चौकात फलक लावण्यात आला. आमचा आमदार असा हवा असं सांगून सर्वसामान्यांसाठी आक्रमक होणारा आमदार हवा असे म्हटले आहे. शिवसेनेचे तालुकाप्रमुख बाबूराव धुरी यांनीही तेच केले होते; मग इथली राजकीय मंडळी त्यांच्या विरोधात का होती असा प्रश्‍नही श्री. गवस यांनी केला आहे.  

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com