इतिहासातून भैरवगड हद्दपार होणार?

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 30 नोव्हेंबर 2016

देवरूख : संगमेश्‍वर, चिपळूण आणि सातारा तालुक्‍यांच्या हद्दीवर डौलाने उभा असलेला भैरवगड आजही पर्यटकांच्या नकाशावर नाही. या गडाकडे ना इतिहासकारांनी पाहिले ना राज्य सरकारने. यामुळे इतिहासाच्या पानातून या गडाचे स्थान हद्दपार झाल्यासारखी स्थिती आहे; मात्र येथे वर्षातून एकदा भरणाऱ्या यात्रेसाठी गर्दी होते. भाविकांनी गडावरील पुरातन भैरीभवानी मंदिराचा जीर्णोद्धार केला आहे. गडाला पर्यटनस्थळ म्हणून मान्यता मिळावी यासाठी सातगाव ग्रामस्थ मंडळ प्रयत्नशील आहे.

संगमेश्‍वर तालुक्‍यातील येडगेवाडी, रातांबी, तर चिपळूण तालुक्‍यातील गोवळ, पाते, मजुत्री व सातारा जिल्ह्यातील पाटण तालुक्‍यातील पाथरपुंज, गावडेवाडी या सात गावांतील ग्रामस्थ या मंदिरात सण, उत्सव साजरे करतात. गडावरील तलावातील पाणी बारमाही थंड असते. दोन जिल्ह्यांना एकत्र करणारी मोठी यात्रा पाडव्याच्या आदल्या दिवशी गडावर भरते. दोन्ही जिल्ह्यातील शेकडो भाविक या यात्रेत सहभागी होतात. गडावर मानकरी वस्तीला राहात नसल्याने भैरवगडावरील मंदिर हे फक्त सणांदिवशी खुले ठेवण्यात येते. गडावर जाण्यासाठी संगमेश्‍वर तालुक्‍यातील रातांबी येथून एक पायवाट आहे, तर चिपळूण तालुक्‍यातील पाते येथून अर्ध्या रस्त्यापर्यंत पाखाडी बांधण्यात आली आहे. पर्यटकांना गाडीने गडाजवळ जायचे असल्यास पाटण तालुक्‍यातील हेळवाक, कोळणे, पाथरपुंज असा प्रवास करून यावे लागते. हा रस्ता अवघड वळणांचा आणि कच्चा आहे; मात्र या रस्त्याने जंगलसफारीचा आनंद लुटता येतो. या गडाचा सर्वांगीण विकास व्हावा यासाठी सातगाव मंडळाने शासनाकडे पत्रव्यवहार केला; मात्र याला कोणीच दाद दिली नाही. गडावर जाण्यासाठी पक्‍का रस्ता व्हावा आणि याचा समावेश पर्यटनस्थळांमध्ये व्हावा एवढीच या ग्रामस्थांची अपेक्षा होती, मात्र तीही पूर्ण झालेली नाही.

वन खात्याच्या कात्रीत
ज्या रस्त्याने गडावर जाता येते तेथील जमीन ही वन विभागाच्या मालकीची आहे. परिणामी वन विभागाच्या जाचक अटी पूर्ण केल्याशिवाय गडावर गाडी घेऊन जाणे शक्‍य होत नाही. त्यापेक्षा पर्यटक मागे फिरणे पसंत करतात. शासनाने निदान या गोष्टीसाठी तरी पुढाकार घेऊन गडाला राज्याच्या पर्यटकांच्या नजरेत आणावे, अशी माफक मागणी येथील ग्रामस्थांनी केली आहे.

Web Title: bhairavgad out of history